लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांचा स्फोट

दोघे जखमी

लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांचा स्फोट

गोरेगाव परिसरात मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली. गोरेगाव येथील अनमोल टॉवर या इमारतीच्या लिफ्टमध्ये फुग्यांमधील गॅसमुळे अचानक आग लागून स्फोट झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एक तरुणी आणि एक तरुण जखमी झाले. सुदैवाने दोघांनाही गंभीर इजा न होता उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण व तरुणी लिफ्टमधून वरच्या मजल्यावर जात असताना फुग्यांचा एक गुच्छ घेऊन तरुण लिफ्टमध्ये आला. अचानक लिफ्टमध्ये फुग्यांमधील गॅसने पेट घेतला आणि जोरदार आग लागली. या आगीत दोघांचेही चेहरे भाजले गेले. प्रसंगावधान राखत इमारतीतील नागरिकांनी तात्काळ जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

हे ही वाचा:

गोवा विशेष : आता काही महिने नाही, वर्षभर पर्यटन!

एक अर्धवट देखणी, एक अर्धवट…

एलन मस्क…एकदम मस्त, ८०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक संपत्ती

एकनाथ शिंदेंवरील टिप्पणीबद्दल कुणाल कामराला समन्स

या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून फुगे विकणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात फुग्यांमध्ये हायड्रोजन गॅस भरलेला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी संबंधित फुग्यांचे नमुने फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल)कडे तपासासाठी पाठवले आहेत.

दरम्यान, इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लिफ्टसारख्या बंद जागेत ज्वलनशील गॅस असलेले फुगे नेणे किती धोकादायक ठरू शकते, याचे हे जिवंत उदाहरण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या फुग्यांपासून दूर राहण्याचे तसेच संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ प्रशासनाला कळवण्याचे आवाहन केले आहे.

या घटनेमुळे फुगे विक्री करताना वापरल्या जाणाऱ्या गॅसवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

Exit mobile version