बीएसएफची कारवाई; सियालकोटमधील लूनी येथील दहशतवादी लाँच पॅड उध्वस्त

व्हिडीओ शेअर करत कारवाईची दिली माहिती

बीएसएफची कारवाई; सियालकोटमधील लूनी येथील दहशतवादी लाँच पॅड उध्वस्त

पाकिस्तानच्या बाजूने उल्लंघन करण्यात आलेल्या शस्त्रसंधीला प्रत्युत्तर भारताने दिले असून शुक्रवारी रात्री सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जम्मूच्या अखनूर सेक्टर समोरील पाकिस्तानच्या सियालकोट जिल्ह्यातील लूनी येथे असलेल्या दहशतवादी लाँच पॅडचा नाश केल्याची माहिती समोर आली आहे. याचा व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे.

शुक्रवारी रात्री ९ वाजता सुरू झालेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला दिलेल्या प्रतिसादात बीएसएफकडून हा हल्ला करण्यात आला. लूनी येथील दहशतवादी लाँच पॅड पूर्णपणे उध्वस्त करण्यात आला, अशी माहिती बीएसएफने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच सीमापलीकडील धोक्यांना निष्प्रभ करण्याच्या वचनबद्धतेवर भर देण्यात आला आहे. पाकिस्तानच्या कुरापती सुरू असल्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमेवरील तणावात लक्षणीय वाढ झाली आहे. “९ मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानने जम्मू सेक्टरमधील बीएसएफ चौक्यांवर विनाकारण गोळीबार सुरू केला. बीएसएफने योग्य पद्धतीने प्रत्युत्तर दिले. याला उत्तर म्हणून अखनूर क्षेत्रासमोरील सियालकोट जिल्ह्यातील लूनी येथील दहशतवादी लाँच पॅड बीएसएफने पूर्णपणे उध्वस्त केला. भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याचा आमचा निर्धार अढळ आहे,” असे बीएसएफने निवेदनात म्हटले आहे.

यापूर्वी शुक्रवारी, भारत- पाकिस्तान सीमेवर एका मोठ्या सुरक्षा मोहिमेत बीएसएफने जम्मू सीमेवरील सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न उधळून लावला. या कारवाईत सात दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. हे जैशचे सदस्य असल्याची माहिती समोर आली होती. बीएसएफच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांच्या एका मोठ्या गटाने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. बीएसएफने हा प्रयत्न हाणून पाडला. सतर्क असलेल्या बीएसएफ जवानांनी घुसखोरांवर जोरदार गोळीबार केला. त्यानंतर झालेल्या गोळीबारात, किमान सात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, असे बीएसएफने शुक्रवारी म्हटले होते.

हे ही वाचा : 

पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीच्या अतिरिक्त जिल्हा आयुक्तांचा मृत्यू

उत्तर, पश्चिम भारतातील ३२ विमानतळांवरील नागरी उड्डाणे स्थगित; कधीपर्यंत राहणार बंदी?

जम्मू काश्मीरच्या कर्तव्यावर असलेले घाटकोपरचे मुरली नाईक हुतात्मा

“भारतीय ड्रोन रोखले नाहीत कारण…” पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे अजब स्पष्टीकरण

याव्यतिरिक्त, बीएसएफने केलेल्या प्रत्युत्तर कारवाईमुळे धंधार चौकीचे मोठे नुकसान झाले होते. बीएसएफने पाक पोस्ट धंधारच्या विध्वंसाची हँड-हेल्ड थर्मल इमेजर (एचएचटीआय) क्लिप देखील जारी केली होती. दरम्यान, शनिवारी पाकिस्तानने भारतातील २६ ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारताने लगेचच प्रत्युत्तरात्मक हल्ले सुरू केले. शनिवारी पहाटे भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील किमान चार हवाई तळांवर हल्ला केला, अशी माहिती आहे.

Exit mobile version