रेल्वेत झालेल्या वादानंतर कॉलेज शिक्षकाचा भोसकल्याने मृत्यू, आरोपीला अटक

आरोपी ओमकार शिंदेला १२ तासांच्या आत केले जेरबंद

रेल्वेत झालेल्या वादानंतर कॉलेज शिक्षकाचा भोसकल्याने मृत्यू, आरोपीला अटक

मुंबई: मालाड स्थानकावर शनिवारी संध्याकाळी लोकल ट्रेनमध्ये सहप्रवाशासोबत झालेल्या वादानंतर ३३ वर्षीय ज्युनिअर कॉलेज शिक्षकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मृत शिक्षकांची ओळख आलोक कुमार सिंग अशी झाली असून ते कांदिवली येथील रहिवासी होते. ते विलेपार्ले येथील नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये गणिताचे शिक्षक म्हणून कार्यरत होते. आरोपीची ओळख पटली असून त्याचे नाव ओमकार शिंदे असे आहे. त्याला पोलिसांनी १२ तासांच्या आत अटक केली आहे. तो सीसीटीव्हीमध्ये रेल्वे पुलावरून धावताना दिसत आहे.

सिंग हे आणखी एका शिक्षकासोबत चर्चगेट–बोरिवली स्लो लोकलच्या सेकंड क्लास डब्यातून प्रवास करत होते. मालाड स्थानकावर उतरतानाच त्यांच्यात आणि आरोपीमध्ये वाद झाला. हा वाद ट्रेनमध्ये सुरू झाला आणि प्लॅटफॉर्मवर वाढला, असे पोलिसांनी सांगितले.

ही घटना संध्याकाळी सुमारे ५.३० वाजता मालाड स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर घडली. वादाच्या दरम्यान आरोपीने धारदार शस्त्र बाहेर काढून सिंग यांच्या पोटात वार केला आणि त्यानंतर तेथून पळ काढला. सीसीटीव्हीत सदर हल्लेखोर पळताना दिसत आहे.

हे ही वाचा:

घर सजावटीसाठी ‘मिनिमल व नॅचरल’ थीम

अवेळी म्हातारपण येऊ नये असं वाटतंय, मग खा आवळा…

ट्रम्पवादळानंतर अमेरिकेत हिमवादळ; १३ हजार उड्डाणे रद्द

कात्रीत सापडलेल्या युरोपला आठवले आर्क्टीकचे लष्करीकरण

“त्यांचे सहकारी शिक्षक आणि पोलिसांनी त्यांना तत्काळ शताब्दी रुग्णालयात दाखल केले, मात्र अतिरक्तस्रावामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले,” अशी माहिती पोलिस उपायुक्त सुनीता साळुंखे-ठाकरे यांनी दिली.

पोलिसांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत, जेणेकरून आरोपीची ओळख पटवता येईल. बोरिवली जीआरपी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक तपासात हा क्षणिक रागातून झालेला हल्ला असल्याचे दिसते.

“प्राथमिक माहितीनुसार, मालाड स्थानकावर उतरतानाच दोन प्रवाशांमध्ये वाद झाला. त्या वादात आरोपीने आलोक सिंग यांच्यावर धारदार शस्त्राने पोटात वार केला. या प्रकरणाचा पुढील तपास जीआरपी करत आहे,” असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Exit mobile version