गोरगावमध्ये बनावट ‘बॉम्बे डाईंग’चा पर्दाफाश

७० बनावट बेडशीट्स जप्त, एक अटकेत

गोरगावमध्ये बनावट ‘बॉम्बे डाईंग’चा पर्दाफाश

मुंबई : नामांकित ‘बॉम्बे डाईंग’ कंपनीच्या नावाखाली बनावट उत्पादने विक्री करणाऱ्या रॅकेटचा गोरगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गोरगाव पश्चिमेतील मोतीलाल नगर परिसरात करण्यात आलेल्या छाप्यात पोलिसांनी तब्बल ७० बनावट बेडशीट्स जप्त केल्या असून याप्रकरणी ३१ वर्षीय शहनवाज सरफराज अली याला अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या बेडशीट्सची अंदाजे किंमत २ लाख ४४ हजार ९३० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बे डाईंग कंपनीचे विक्री व्यवस्थापक व अधिकृत प्रतिनिधी अजाज हनीफ काझी यांना २१ जानेवारी २०२६ रोजी गोरगाव परिसरात बनावट बेडशीट्स विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खात्री केल्यानंतर त्यांनी झोन-११चे पोलीस उपायुक्त यांची पूर्वपरवानगी घेऊन गोरगाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.
हे ही वाचा:
जानेवारीत खासगी क्षेत्राला मिळाली उभारी

माजी NIA प्रमुखांच्या नावाने ७५ वर्षीय वृद्धाला १६.५ लाखांचा गंडा

काजा कालास भारत दौऱ्यावर

बांगलादेशच्या जमात-ए-इस्लामीशी अमेरिकेचे गुलुगुलु
तक्रारीनंतर गोरगाव पोलिसांच्या पथकाने सेठिया सी व्ह्यू इमारतीजवळील बिग मशीद परिसरात छापा टाकला. या ठिकाणी तात्पुरत्या स्टॉलमधून ‘बॉम्बे डाईंग’ या ब्रँड नावाखाली पॅक करण्यात आलेल्या बनावट बेडशीट्स आढळून आल्या. तपासादरम्यान या बेडशीट्सचा कापड हलक्या आणि निकृष्ट दर्जाचा असल्याचे स्पष्ट झाले. पॅकेजिंग, रंगसंगती व डिझाइन हे मूळ उत्पादनासारखे दिसत असले, तरी छपाई, फॉन्ट आणि फिनिशिंगमध्ये फरक आढळून आल्याने त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
प्रत्येक बेडशीटची बाजारातील किंमत ३ हजार ४९९ रुपये दर्शविण्यात आली होती. मात्र, या मालाचा स्रोत विचारला असता तसेच खरेदीची बिले सादर करण्यास सांगितले असता आरोपी शहनवाज अली कोणतीही वैध कागदपत्रे सादर करू शकला नाही.
या प्रकरणी बॉम्बे डाईंग कंपनीच्या तक्रारीवरून ब्रँड उल्लंघन, बनावटगिरी आणि बनावट मालाची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आता या बनावट मालाच्या पुरवठा साखळीचा शोध घेतला जात असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.

Exit mobile version