दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटासंदर्भात तपास सुरू असतानाच आता दिल्ली पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी दिल्लीतील सर्व खाजगी रुग्णालयांना नोटीस बजावली आहे. ज्यामध्ये पाकिस्तान, बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती आणि चीनमधून एमबीबीएस पदवी मिळवलेल्या आणि राजधानीत प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची माहिती मागवण्यात आली आहे. दरम्यान, तपास संस्था एनआयए आत्मघाती बॉम्बर उमर नबी आणि अल फलाह विद्यापीठातील डॉक्टर यांच्यातील संबंधांची देखील अधिक चौकशी करत आहे.
पोलिसांनी रुग्णालय प्रशासनाला विशेषतः पाकिस्तान, बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती आणि चीन या देशांमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि सध्या दिल्लीतील खाजगी वैद्यकीय सुविधांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांची नावे आणि प्रमाणपत्रे शेअर करण्यास सांगितले आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अल-फलाह विद्यापीठातील ३० डॉक्टरांचे जबाब नोंदवले आहेत. डॉक्टरांना उमर आणि त्याच्या वर्तनाबद्दल चौकशी करण्यात आली. सहकारी डॉक्टरांनी सांगितले की, उमर याने कायम काही निवडक लोकांनाच त्याच्या खोलीत प्रवेश दिला होता. याव्यतिरिक्त, २६ नोव्हेंबर रोजी, एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) ने आरोपी शोएबला १० दिवसांची कोठडी दिली. शोएबला फरीदाबादमध्ये अटक करण्यात आली. त्याला पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले, जिथे एनआयएने त्याची कोठडी मंजूर केली. या प्रकरणातील आणखी एक आरोपी आमिर रशीद अली, ज्याची एनआयए कोठडी त्याच दिवशी संपत होती, त्यालाही न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्याची कोठडी आणखी ७ दिवसांनी वाढवण्यात आली.
हेही वाचा..
अल फलाह विद्यापीठात शाहीनच्या खोलीत सापडले १८ लाख
आधी डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन द्या, मगच कफ सिरप
इस्रायलच्या हल्ल्यात सीरियामधील १३ जणांचा मृत्यू; दहशतवादी मारले गेल्याचा दावा
गायीचे निकृष्ठ तूप विकणाऱ्या पतंजलीला दंड
१० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ कार बॉम्बस्फोट झाला होता, ज्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले होते आणि अनेक जण जखमी झाले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेला शोएब हा सातवा आरोपी आहे. यापूर्वी, एनआयएने उमरच्या सहा जवळच्या सहकाऱ्यांना अटक केली होती.
