धुरंधर चित्रपटात रहमान डकैतच्या स्वयंपाकीची भूमिका साकारणाऱ्या नदीम खान याला अटक करण्यात आली आहे. घरकाम करणाऱ्या महिलेला लग्नाचे खोटे आश्वासन दिल्यानंतर त्या महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. जवळपास दहा वर्षे लग्नाचे खोटे आश्वासन देत वारंवार बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. त्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे.
धुरंधर चित्रपटात नदीमने रहमान डकैतचा (अक्षय खन्ना यांनी साकारलेली भूमिका) स्वयंपाकी अखलाख ही भूमिका केली होती. मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला गुरुवारी तुरुंगात पाठवण्यात आले. तक्रारदार ही ४१ वर्षीय घरकाम करणारी महिला असून ती अनेक अभिनेत्यांच्या घरी काम करत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
तक्रारीतील माहिती
पोलिस तक्रारीनुसार, महिलेची नदीमशी २०१५ मध्ये ओळख झाली आणि कालांतराने दोघे जवळ आले. महिलेचा आरोप आहे की, नदीमने तिला लग्नाचे आश्वासन देत तिच्या घरी तसेच वर्सोवा येथील त्याच्या घरी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. लग्न होईल या विश्वासामुळे ती जवळपास दहा वर्षे संबंधात राहिली. मात्र नंतर त्याने लग्नास नकार दिल्यानंतर तिने या महिन्याच्या सुरुवातीला वर्सोवा पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, “पहिला कथित शारीरिक संबंध तक्रारदाराच्या घरी, मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला आणि पीडिता त्याच भागात राहते. त्यामुळे वर्सोवा पोलिसांनी शून्य एफआयआरद्वारे प्रकरण मालवणी पोलिसांकडे वर्ग केले.”
हे ही वाचा :
यशस्वी भारत जगाला अधिक स्थिर, समृद्ध आणि सुरक्षित करतो!
गणतंत्र दिवस २०२६: कर्तव्यपथावर भारताची ताकद
भारताच्या आरोग्य अर्थसंकल्पाचा २,००० कोटींपासून ते १ लाख कोटींपर्यंतचा प्रवास
मोदींच्या बहुरंगी साफ्याने वेधले लक्ष
नदीम खान कोण?
अभिनेता नदीम खान लहान पण लक्षवेधी भूमिकांसाठी ओळखले जातात. धुरंधर चित्रपटात त्यांनी अखलाखची छोटी भूमिका केली होती, परंतु त्यांच्या अभिनयाकडे प्रेक्षकांचे लक्ष गेले. चित्रपटात अखलाख (नदीम) हा रहमान बलोचचा विश्वासघात करून एसपी चौधरीला (संजय दत्त) मदत करतो. सत्य उघड करण्यासाठी रणवीरचा हमजा मझहारी त्याची बोटे कापतो, असे दृश्य दाखवले आहे. पुढे रहमानचा चुलतभाऊ उजैर बलोच त्याला मुखबिर असल्याने ठार मारतो.
नदीमने संजय मिश्रा, आदिल हुसेन, असरानी आणि अमिताभ बच्चन यांसारख्या कलाकारांसोबत काम केले आहे. अटकेनंतर या बॉलिवूड कलाकारांसोबतचे त्याचे जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
तो लवकरच नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या वध २ चित्रपटात दिसणार आहे. २०२२ मधील गाजलेल्या चित्रपटाचा हा पुढील भाग असून तो ६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी अलीकडेच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.
