मुंबईच्या दादर पूर्व परिसरात सहा महिन्यांपूर्वी घरकाम करणाऱ्या मोलकरणीने केलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा छडा माटुंगा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत लावला आहे. या प्रकरणी कविता शिंदे (नाव बदललेले) या मोलकरणीला अटक करण्यात आली असून तिच्या ताब्यातून सुमारे १० लाख २४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जून २०२५ रोजी तक्रारदाराच्या वडिलांनी त्यांच्या पत्नीचे सोन्याचे दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी मुलाकडे दिले होते. हे दागिने दादर पूर्वेतील घरातील लॉकरमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र काही दिवसांनी लॉकरची चावी घरात सापडली नाही. कामाच्या व्यापामुळे तक्रारदाराने जवळपास सहा महिने लॉकर उघडला नव्हता.
हे ही वाचा:
आयएनएसव्ही कौंडिण्य: भारताच्या प्राचीन सागरी सफरीचे पुनरुज्जीवन
भारत खेळ, प्रतिभेच्या बाबतीतही जागतिक स्तरावर आघाडीवर
टेम्पोमध्ये गाणी वाजवण्याचा वाद : युवकाची हत्या
गोव्यात मित्रांसोबत ‘धुरंधर’ पाहायला गेले अर्जुन रामपाल
दरम्यान, तक्रारदाराच्या घरात तीन मोलकरणी काम करत होत्या. चावीबाबत विचारणा केली असता तिघींनीही अज्ञान व्यक्त केले. अखेर ३ जानेवारी २०२६ रोजी चावी बनवणाऱ्याला बोलावून लॉकर उघडण्यात आला. तेव्हा त्यातून सुमारे १० लाख ९८ हजार २९९ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे उघड झाले.
घरात मोलकरणींशिवाय अन्य कोणाचाही प्रवेश नसल्याने तक्रारदाराने माटुंगा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपास करत तिन्ही मोलकरणींची चौकशी केली. तपासादरम्यान कविता शिंदे हिनेच चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
