बांगलादेशात २८ वर्षीय हिंदू रिक्षा चालकाची हत्या

पोलिसांकडून तपास सुरू; अद्याप कोणालाही अटक नाही

बांगलादेशात २८ वर्षीय हिंदू रिक्षा चालकाची हत्या

बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. माहितीनुसार, गुंडांनी ११ जानेवारी रोजी सायंकाळी फेनीच्या दागोनभुइयान येथे २८ वर्षीय समीर कुमार दास याची हत्या केली. ऑटोरिक्षा चालवून आपली उपजीविका समीर चालवत होता. देशाच्या विविध भागात हिंदू कुटुंबांवर हिंसाचार झाल्याच्या वारंवार बातम्या येत असताना या घटनेने सुरक्षा आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत चिंता अधिक वाढविली आहे.

बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांना धमकावणे, हिंसाचार अशा गोष्टींचा सातत्याने सामना करावा लागत आहे. अशातच समीर दास याची हत्या करण्यात आली. अलिकडच्या वर्षांत, हिंदूंची घरे आणि धार्मिक स्थळांवर हल्ले, तोडफोड आणि लक्ष्यित हल्ल्यांसह वारंवार हिंसक घटना बांगलादेशमध्ये घडल्या आहेत.

समीर दास हा फेनी जिल्ह्यातील दागोनभुईयान भागात रिक्षा चालविण्याचे काम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर दासची हत्या करून हल्लेखोर आपापल्या वाहनांमधून पळून गेले. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाबाहेर समीर दासचा मृतदेह आढळून आला. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, सदर प्रकरण जबरी चोरी आणि हत्येचे असल्याचे सांगितले जात आहे. तपास सध्या सुरू असून अद्याप कुणालाही अटक केलेली नाही.

गेल्याच आठवड्यात हिंसाचारादरम्यान दोन हिंदू पुरूषांचा मृत्यू झाला होता. बांगलादेशच्या सिल्हेट येथील रुग्णालयात जॉय महापात्रा या व्यक्तीला मोबाइल फोनच्या वादातून मारहाण करण्यात आली होती. तसेच त्याला विष पाजून मारण्यात आले, असा आरोप जॉयच्या कुटुंबियांनी केला होता. अमिरुल इस्लाम नावाच्या दुकानदाराने ५०० रुपयांच्या हप्त्यासाठी जॉय महापात्राला मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच दुसऱ्या एका घटनेत मिथुन सरकार नावाच्या व्यक्तीला जमावाने मारहाण केली, या मारहाणीपासून वाचण्यासाठी त्याने कालव्यात उडी घेतली. मात्र त्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.

हे ही वाचा..

बांगलादेशमध्ये अवामी लीगच्या हिंदू नेत्याचा पोलिस कोठडीत मृत्यू

खामेनी विरोधी निदर्शनांमधील सहभागानंतर २६ वर्षीय तरुणाला फाशीची शिक्षा

इराणशी व्यापार करणाऱ्यांवर अमेरिकेकडून २५% कर; भारतावर काय होणार परिणाम?

जर्मन चान्सलरांनी भारताला ‘पसंतीचा भागीदार’ म्हटले

बांगलादेशचा बंडखोर विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याच्यावर १२ डिसेंबर गोळीबार करण्यात आला होता. १९ डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. डिसेंबर महिन्यात हिंदूंविरोधात हिंसाचारास सुरूवात झाली. १८ डिसेंबर रोजी बांगलादेशातील मैमनसिंग जिल्ह्यात २७ वर्षीय दीपू चंद्रा दास याची जमावाने बेदम मारहाण करून हत्या केली होती. त्यानंतर सुरू झालेले हत्येचे सत्र अजूनही थांबलेले नाही. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने अल्पसंख्याकांच्या हत्येचा निषेध केला असला तरी ठोस कारवाई झालेली नाही.

Exit mobile version