मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने शिवडी परिसरात मोठी कारवाई करत चार सशस्त्र आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी शहरात देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करण्याच्या तयारीत होते. त्यांच्याकडून ४ पिस्तूल आणि १८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
भाऊ खरे (३६), दशरथ बरोलिया (३०), सुलतान बरोलिया (२६) आणि धर्मेंद्र भाटी (३५) असे अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. हे चौघेही मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी आहेत. प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी ही पिस्तूल आणि काडतुसे झारखंड येथून मुंबईत विक्रीसाठी आणली होती. खंडणीविरोधी पथकाला गुप्त माहितीदाराकडून शिवडी परिसरात शस्त्र विक्रीसाठी काही इसम येणार असल्याची खबर मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वडाळा-शिवडी चार रस्ताजवळ मुख्य रस्त्यावर सापळा रचला. संशयास्पद हालचालीवरून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्या सामानाची झडती घेतली असता हा शस्त्रसाठा उघड झाला.
कायदेशीर कारवाई आणि पुढील तपास
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या चौघांपैकी तिघांचे पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहेत. शस्त्रे विकण्यासाठी हे आरोपी मुंबईत आले होते हे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र, ही शस्त्रे नेमकी कोणाला पुरवायची होती आणि या गटाचा संघटित गुन्हेगारी किंवा अन्य टोळीशी काही संबंध आहे का, याचा कसून तपास खंडणीविरोधी पथक करत आहे.अद्याप खरेदीदारांची ओळख पटलेली नसून, आरोपींच्या मुंबई भेटीचा नेमका उद्देश आणि त्यांचे आंतरराज्यीय कनेक्शन तपासले जात आहे.
