समाजातील दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची व नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सात जणांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दिंडोशी पोलीस ठाणे यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सखोल तपास करत आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे.
७ फेब्रुवारी रोजी मालाड पूर्व येथील राणी सती मार्ग परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना एका संशयिताकडून बनावट झोपडपट्टी धारकांचे ओळखपत्र, एमएमआरडीएचे बनावट अलॉटमेंट लेटर व शिधापत्रिका आढळून आल्या. त्यानंतर अधिक तपासात आरोपींच्या ठिकाणांहून एकूण ३४३ बनावट शिधापत्रिका, ३ एमएमआरडीए अलॉटमेंट लेटर, १ लॅपटॉप, २ प्रिंटर, ९ मोबाईल फोन व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
हे ही वाचा:
ट्रम्प यांच्या टॅरिफविरुद्ध युक्तिवाद करणारे भारतीय वंशाचे वकील; कोण आहेत नील कात्याल?
लाल किल्ला परिसरावर लष्कर-ए-तैयबाचे लक्ष्य?
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा भारतावर काय होणार परिणाम?
उन्हाळ्यात आरोग्य सांभाळा, तंदुरुस्त राहा
ही टोळी बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फायदा घेत असल्याचे तपासात उघड झाले आहे. तसेच काही एजंट व विविध रुग्णालयांशी संबंधित व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता तपासात व्यक्त करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशंकर भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
