कर्नाटकातील कारवार किनाऱ्यावर, आयएनएस कदंबा नौदल तळाजवळ, चिनी बनावटीचे जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइस बसवलेला एक स्थलांतरित सीगल आढळल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील तिम्मक्का गार्डनजवळ स्थानिकांना पक्ष्याच्या पाठीशी जोडलेले एक उपकरण दिसले. संशयास्पद वाटल्याने स्थानिकांनी याची माहिती तातडीने वन विभागाच्या सागरी विभागाला दिली.
प्राथमिक तपासणीनंतर, अधिकाऱ्यांना असे आढळून आले की हा जीपीएस ट्रॅकर चायनीज अकादमी ऑफ सायन्सेस अंतर्गत रिसर्च सेंटर फॉर इको-एनव्हायर्नमेंटल सायन्सेसचा आहे. वन अधिकाऱ्यांनी सांगितले की संशोधक सामान्यतः सीगल्ससारख्या स्थलांतरित पक्ष्यांच्या हालचालींचे नमुने, खाद्य वर्तन आणि स्थलांतर मार्गांचा अभ्यास करण्यासाठी अशा ट्रॅकिंग उपकरणांचा वापर करतात. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की हे उपकरण एखाद्या संशोधन प्रकल्पाचा भाग असू शकते.
कारवारचे वरिष्ठ पोलिस अधिकारी दीपन एमएन म्हणाले की ते जीपीएस ट्रॅकरशी संबंधित तपशीलांची पडताळणी करत आहेत. वन विभागाच्या किनारी सागरी पथकाला हा पक्षी सापडला आणि सध्या ते चौकशी करत आहेत. आम्ही त्यांच्याशी समन्वय साधत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. जीपीएस उपकरणावरून मिळालेल्या माहितीनुसार, असे दिसून आले की सीगलने कर्नाटक किनाऱ्यावर पोहोचण्यापूर्वी आर्क्टिक प्रदेशांसह १०,००० किमी पेक्षा जास्त उड्डाण केले.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरुवातीच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की हे उपकरण एखाद्या संशोधन प्रकल्पाचा भाग असू शकते आणि कोणत्याही हेरगिरीच्या प्रयत्नाचे सध्या कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. तथापि, इतर कोणत्याही शक्यता नाकारण्यासाठी जीपीएस उपकरण तांत्रिक तपासणीसाठी पाठवले जाईल. सविस्तर पडताळणीनंतरच निष्कर्षांची पुष्टी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अधिकाऱ्यांनी उपकरणावरील माहितीच्या आधारे, चिनी संस्थेशी संपर्क साधला आहे. ज्या ठिकाणी हा पक्षी आढळला तो भाग संवेदनशील असल्याने अधिक चिंता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा..
माणिकराव कोकाटेंकडील सर्व खाती काढून घेतली
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ घडवणारे शिल्पकार राम सुतार यांचे निधन
‘इजू बाई’ ठरल्या देशाचा अभिमान
पीओकेमध्ये असंतोष; वारंवार वीज खंडित होत असल्याने जनता रस्त्यावर
आयएनएस कदंबा नौदल तळ हा भारतीय नौदलाच्या सर्वात मोक्याच्या ठिकाणांपैकी एक आहे आणि त्यात विमानवाहू जहाजे आणि पाणबुड्यांसह प्रमुख युद्धनौका आहेत. चालू विस्ताराचे काम पूर्ण झाल्यानंतर, आयएनएस कदंबा हा पूर्व गोलार्धातील सर्वात मोठा नौदल तळ असणार आहे. तथापि, या प्रदेशातील ही पहिलीच घटना नाही. नोव्हेंबर २०२४ मध्ये, कारवारमधील बैथकोल बंदराजवळ ट्रॅकिंग डिव्हाइस बसवलेला एक गरुड आढळला होता. त्यावेळी, काहीही संशयास्पद आढळले नाही. हे प्रकरण वन्यजीव संशोधनाशी जोडलेले असल्याचे कालांतराने समोर आले.
