एसआरए घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांची चौकशी

अटक झालेल्या चौघांपैकी एक संशयित किशोरी पेडणेकर यांच्या जवळचा आहे.

एसआरए घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांची चौकशी

ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची आज चौकशी करण्यात येणार आहे. एसआरएमध्ये किशोरी पेडणेकर यांनी घोटाळा केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सौमय्या यांनी त्यांच्यावर केला आहे. याप्रकरणी शुक्रवार, २८ ऑक्टोबर रोजी सुद्धा दादर पोलिसांकडून पेडणेकर यांची चौकशी करण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी एसआरए घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी याप्रकरणी काही आरोपींनाही अटक केली होती. यादरम्यान एसआरए घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांवर सौमय्या यांनी गंभीर आरोप केले होते. त्यामुळे दादर पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले असून, दादर पोलिसांनी किशोरी पेडणेकर यांना याप्रकरणी समन्सही बजावला आहे. शुक्रवारी दादर पोलिसांनी किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली होती. आजही चौकशीसाठी पोलिसांनी त्यांना हजर राहण्यास सांगितले आहे.

एसआरए घोटाळा जूनमध्ये नोंदवण्यात आला होता. सुरुवातीला या एफआयआरमध्ये किशोरी पेडणेकर यांचे नाव नव्हते. याप्रकरणी चौकशीनंतर चार लोकांना अटक करण्यात आली होती. अटक झालेल्या चौघांपैकी एक संशयित किशोरी पेडणेकर यांच्या जवळचा आहे. तसेच एक संशयित महापालिकेचा कर्मचारीही असून आपल्या जबाबात माजी महापौरांचे त्याने नाव घेतले आहे. एसआरए घोटाळाप्रकरणी एकूण नऊ लोकांनी तक्रार केली होती. एसआरएमध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले होते, मात्र त्यांना फ्लॅट मिळालेच नाहीत. या प्रकरणात ज्या दोन लोकांनी पेडणेकर यांचा नाव घेतले आहे. त्यामुळे दादर पोलिसांनी पेडणेकर यांची चौकशी सुरु केली आहे.

हे ही वाचा:

राज्यात बसणार सायबर गुन्ह्यांना आळा

आता वैद्यकीय शिक्षण घेता येणार मराठीत

समाजवादी पक्षाचे आमदार आझम खान यांची आमदारकी रद्द

‘एअरबस टाटा’ प्रकरणात भाजपाकडून मोठा खुलासा

दरम्यान, किरीट सौमय्यांनी सुद्धा यासंदर्भात ट्विट केले आहे. भाऊबीजेला किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानतो, पण माझ्यासाठी नेहमीच राष्ट्र प्रथम आहे. किशोरी पेडणेकर यांनी अनधिकृतरित्या वरळी गोमाता जनता एसआरए मध्ये सहा गाळे/ सदनिका हस्तगत केल्या आहेत. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली की या सदनिकांचा ताबा घ्यावा, असे सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.

Exit mobile version