मुंबईच्या बोरीवली पूर्व परिसरात मानवतेला हादरवून टाकणारी घटना समोर आली असून, पत्नीच्या उपचारासाठी मुलीने पाठवलेली अडीच लाख रुपयांची रक्कम ७७ वर्षीय वृद्धाकडून दिवसाढवळ्या लुटण्यात आली आहे. ही घटना ओंकारेश्वर मंदिराजवळ घडली असून, या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे.
हे ही वाचा:
केंद्र खत अनुदानावर ३७,९५२ कोटी करणार खर्च
जोगेश्वरीकरांवर शोककळा, प्रवीण शिंदे गेले
केंद्र खत अनुदानावर ३७,९५२ कोटी करणार खर्च
उत्तर प्रदेशातील २.८९ कोटी मतदारांची नावे वगळली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिद्धीश गुलाबचंद शाह (७७) हे बोरीवली पूर्व येथील वीणा बिल्डिंगमध्ये वास्तव्यास असून गेली ३८ वर्षे याच परिसरात राहतात. सेवानिवृत्त जीवन जगणाऱ्या शाह यांच्या पत्नी दक्षाबेन या अंशतः पक्षाघाताने त्रस्त असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या उपचारासाठी सूरत येथे राहणाऱ्या त्यांची मुलगी जिग्ना झवेरी हिने कूरियरद्वारे २ लाख ५० हजार रुपये बोरीवलीला पाठवले होते.
५ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास शाह हरीओम प्लाझा येथील कूरियर कार्यालयातून रोख रक्कम घेऊन घराकडे निघाले होते. पैसे त्यांनी एका पिशवीत ठेवले होते. कूरियर कार्यालयापासून काही अंतरावर ओंकारेश्वर मंदिराजवळील भिंतीजवळ पोहोचताच मागून आलेल्या एका अज्ञात तरुणाने अचानक त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून महामार्गाच्या दिशेने धूम ठोकली.
वय आणि अशक्तपणामुळे शाह काही प्रतिक्रिया देण्याआधीच आरोपी पसार झाला. लुटलेल्या पिशवीत २.५० लाख रुपये रोख रक्कम तसेच औषधांचे १० ते १५ मोजमाप कप होते. घटनेनंतर शाह यांनी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांकडून घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
