साताऱ्यातील कोरेगाव-जावळी तालुक्यातील एमडी (MD) ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या (युनिट ७) पथकाने मोठी कारवाई केली आहे. या ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार फैयाज शेख याला जेलमधून रॅकेट चालवण्यास मदत केल्याप्रकरणी सोलापूर कारागृहात तैनात असलेला पोलीस कर्मचारी बालू चव्हाण याला अटक करण्यात आली आहे.
जेलमधून चालत होते ड्रग्जचे साम्राज्य
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी फैयाज शेख हा गेल्या दीड वर्षांपासून सोलापूर कारागृहात बंदिस्त आहे. मात्र, तुरुंगात असूनही तो आपले ड्रग्ज सिंडिकेट सक्रियपणे चालवत होता. पोलीस कर्मचारी बालू चव्हाण हा फैयाजला स्वतःचा मोबाईल फोन वापरण्यास देत असे. या फोनच्या माध्यमातून फैयाज तुरुंगातूनच बाहेरच्या नेटवर्कवर नियंत्रण ठेवत होता. या बदल्यात चव्हाणला मोठी लाच मिळत असल्याचे तपासात समोर आले आहे.
११५ कोटींचे ड्रग्ज जप्त
९ डिसेंबर २०२५ रोजी साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील सावरी गावातील एका शेतात ही एमडी ड्रग्जची फॅक्टरी सुरू करण्यात आली होती. मुंबई गुन्हे शाखेने १३ डिसेंबर २०२५ रोजी धाड टाकून या फॅक्टरीचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ११५ कोटी रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज आणि कच्चा माल जप्त केला होता. मुंबईच्या मुलुंड परिसरात एका आरोपीला ड्रग्जसह पकडल्यानंतर या साखळीचा दुवा साताऱ्यापर्यंत पोहोचला होता.
हे ही वाचा:
“फ्रान्स हा भारताचा सर्वात जुना धोरणात्मक भागीदार”
केरळ स्टोरी २ येतोय…’लव्ह जिहाद’मुळे तीन मुलींच्या उद्ध्वस्त आयुष्याची कथा!
मेरठमध्ये सापडली पाकिस्तानी हेर महिला
किंगपिनचा मुलगा दुबईतून सूत्रे हलवतोय
या प्रकरणातील मुख्य आरोपी फैयाज शेखचा मुलगा फहाद हा सध्या दुबईत लपून बसला आहे. पोलिसांनी त्याला या गुन्ह्यात ‘वॉन्टेड’ घोषित केले आहे. फहाद दुबईतून ड्रग्ज व्यापाराचे समन्वय साधणे आणि आर्थिक व्यवहारांची देवाणघेवाण पाहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
२१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
अटक करण्यात आलेला पोलीस कर्मचारी बालू चव्हाण याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या ड्रग्ज रॅकेटमध्ये कारागृहातील इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का, याचा तपास आता गुन्हे शाखा करत आहे.
