आसामच्या लखीमपूर जिल्ह्यात पोलिसांवर नियोजित हल्ल्याप्रकरणी १० बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. या व्यक्तींनी पोलिस पथकावर हल्ला केला आणि सोशल मीडियावर दहशतवादी हल्ल्यांना समर्थन देणारी पोस्ट करणाऱ्या एका आरोपीला जबरदस्तीने सोडवल्याचा आरोप आहे.
संबंधित घटना २७ डिसेंबर रोजी लखीमपूर जिल्ह्यातील बोंगलमोरा गावात घडली. यामुळे परिसरात तणाव आणि संताप निर्माण झाला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी बहरुल इस्लाम हा बनावट सोशल मीडिया अकाउंटद्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याला समर्थन देणारी माहिती शेअर करत होता. या प्रकरणात त्याच्याविरुद्ध आधीच गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तेव्हापासून तो फरार होता. पोलिस पथकाने त्याला सोनापूर परिसरात शोधून ताब्यात घेतले.
पोलिस पथक आरोपीला घेऊन परतण्याच्या तयारीत असताना, तिथे आधीच जमलेल्या लोकांच्या एका गटाने अचानक पोलिसांवर हल्ला केला. या दरम्यान त्यांनी बहरूल इस्लामला पोलिसांच्या ताब्यातून जबरदस्तीने सोडवले. या हल्ल्यात उपनिरीक्षक गोकुल जयश्री आणि पोलिस वाहनाचा चालक गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लखीमपूरचे पोलिस अधीक्षक गुणेंद्र डेका म्हणाले की, ही अपघाती घटना नव्हती, तर सुनियोजित हल्ला होता.
हे ही वाचा:
पुतिन यांच्या निवासस्थानावर ९१ ड्रोन्सचा हल्ला; ट्रम्प काय म्हणाले?
बस रिव्हर्स घेत असताना भांडूपमध्ये अपघात; चार मृत
सोन्यावरून युरोपमध्ये हाणामारी; सोने जनतेचे त्याला हात लावू नका, जॉर्जिया मेलोनी कडाडल्या
भारत २०३० पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल
अटक केलेल्या आरोपींमध्ये अफाजुद्दीन, इकरामुल हुसेन, फखरुद्दीन अहमद, नूर हुसेन, गुलजार हुसेन, नजरुल हक, काझिमुद्दीन, मोहम्मद अब्दुल हमीद, बिलाल हुसेन आणि अताबुर रहमान यांचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की या आरोपींपैकी अनेकांचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहेत. हल्ल्यात सहभागी असलेल्या लोकांचा संबंध आसाममध्ये बंगाली भाषिक स्थलांतरित मुस्लिम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मिया’ समुदायाशी जोडला जात आहे.
