देशांतर्गत शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने आयात निर्बंध लादले असतानाही, परदेशातून छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात टरबूज बिया आणि हिरव्या वाटाण्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) पर्दाफाश केला आहे. न्हावा शेवा बंदरातून तब्बल १३९ कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी मुख्य आयातदाराला अटक करण्यात आली आहे.
मुंबई ‘डीआरआय’च्या पथकाला न्हावा शेवा बंदरात मोठ्या प्रमाणात तस्करी होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी सापळा रचून १३२ कंटेनरची तपासणी केली. कागदपत्रांवर या कंटेनरमध्ये ‘तूर डाळ’ (Pigeon Peas) असल्याचे भासवले होते. मात्र, प्रत्यक्षात तपासणी केली असता त्यामध्ये टरबूज बिया आणि हिरव्या वाटाण्याचा साठा आढळला.
हे ही वाचा:
जागतिक ॲथलेटिक्स रिले चॅम्पियनशीपसाठी हर्ष राऊतची निवड
पनवेल आणि आसपासच्या परिसरात क्रिकेटची प्रचंड गुणवत्ता!
६५ जागा ठरवणार पश्चिम बंगालचे भवितव्य
घरून काम, फक्त सहा आठवड्यांचे जेट इंधन शिल्लक
२,७१० मेट्रिक टन टरबूज बिया टांझानिया आणि सुदानमधून आयात आणि ३१९ मेट्रिक टन हिरवा वाटाणा कॅनडातून आयात करण्यात आला होता,या मालाचे बाजारमूल्य सुमारे १३९ कोटी रुपये असल्याची माहिती डीआयआरच्या अधिकारी यांनी दिली.
भारतीय शेतकऱ्यांना स्वस्त आयातीचा फटका बसू नये, यासाठी केंद्र सरकारने जून २०२४ पासून टरबूज बियांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले आहेत. तसेच, हिरव्या वाटाण्याच्या आयातीसाठी किमान २०० रुपये प्रति किलो (CIF) किंमत आणि केवळ कोलकाता बंदरातूनच आयातीची परवानगी असे नियम आहेत. हे नियम डावलून मुंबईच्या न्हावा शेवा बंदरातून ही तस्करी सुरू होती.
या संघटित तस्करीमागे असलेल्या संबंधित आयातदार कंपनीच्या मालकाला ‘डीआरआय’ने रविवारी (१९ एप्रिल २०२६) अटक केली. या रॅकेटमध्ये आणखी काही बड्या तस्करांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, त्या दिशेने तपास सुरू आहे.
