आसाम रायफल्सने गुप्त माहितीच्या आधारे मणिपूरच्या कामजोंग जिल्ह्यात शोधमोहीम राबवली. भारत- म्यानमार सीमेच्या जवळ काही ठिकाणी शस्त्रास्त्रे आणि स्फोटके लपवून ठेवण्यात आली असून ती हलवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. ही कारवाई ११ आणि १२ एप्रिल २०२६ च्या मध्यरात्रीदरम्यान करण्यात आली. शोधमोहीमेदरम्यान जवानांनी मेटल डिटेक्टर आणि विशेष प्रशिक्षित श्वानाची मदत घेतली. यावेळी एका संशयास्पद ठिकाणाची ओळख पटली, जिथे जमिनीखाली लपवून ठेवलेला शस्त्रास्त्रांचा मोठा साठा आढळून आला. यात विविध प्रकारची शस्त्रे, दारुगोळा, स्फोटके आणि इतर युद्धसामग्रीचा समावेश होता. जप्त करण्यात आलेला सर्व साहित्य पुढील तपासासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
यानंतर आणखी एका मोठ्या कारवाईत आसाम रायफल्सने राज्य पोलीस कमांडो आणि टेरिटोरिअल आर्मीच्या सहकार्याने संयुक्त मोहीम राबवली. ही कारवाई १६ ते १९ एप्रिल २०२६ दरम्यान थौबल, तेंगनौपाल आणि काकचिंग जिल्ह्यांत करण्यात आली. या मोहिमेत तीन उग्रवादी कॅडरना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले आरोपी प्रतिबंधित संघटना PREPAK (प्रो) आणि KYKL (सोरेपा) यांच्याशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. तपासात हेही उघड झाले की, या व्यक्तींनी म्यानमारमध्ये प्रशिक्षण घेतले होते. त्यांच्याकडून मोबाईल फोन आणि परदेशी चलनही जप्त करण्यात आले. अटकेनंतर सर्वांना त्यांच्या जप्त मालासह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
हे ही वाचा:
३० दिवसांत ‘धुरंधर २’ ची १,७८३ कोटींची कमाई
अमरावती व्हिडीओ प्रकरणातील १९ वर्षीय आरोपीकडे महिंद्रा थार, शस्त्रे, आयफोन आले कुठून?
महिलेवर अत्याचार करणाऱ्या मौलवीसह एकाला ठोकल्या बेड्या
पाकिस्तानमधील चर्चेसाठी इराणची पाठ!
दरम्यान, मिझोरममध्येही स्वतंत्र कारवाई करण्यात आली. येथे आसाम रायफल्सने कस्टम विभाग, आयझॉल यांच्या सहकार्याने जेमाबावक परिसरात संयुक्त मोहीम राबवली. या कारवाईत परदेशी सिगारेटचा मोठा साठा जप्त करण्यात आला. एकूण ९९ बॉक्स परदेशी सिगारेट जप्त करण्यात आले असून त्यांची बाजारमूल्य सुमारे ₹२.३७ कोटी असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून जप्त माल आणि आरोपीला पुढील तपासासाठी कस्टम विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
