उत्तर प्रदेशातील नोएडाच्या फेज-2 होजरी कॉम्प्लेक्समध्ये हजारो गारमेंट आणि फॅक्टरी कामगारांचे आंदोलन सोमवारी (१३ एप्रिल) चौथ्या दिवशीही सुरूच राहिले. किमान वेतनवाढ आणि इतर कामगार सुविधांच्या मागण्यांसाठी कामगार रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या आंदोलनामागचे मुख्य कारण म्हणजे शेजारील हरियाणामध्ये नुकतीच किमान वेतनात करण्यात आलेली वाढ. कामगारांचे म्हणणे आहे की, हरियाणामध्ये ३५% पर्यंत वेतनवाढ झाल्यानंतर दैनंदिन मजुरी सुमारे ५८० ते ७५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे, तर नोएडामध्ये असंघटित कामगारांना अद्यापही केवळ ३५० ते ४३५ रुपये दररोज मिळतात.
आंदोलनकर्त्या कामगारांची प्रमुख मागणी म्हणजे त्यांचा मासिक पगार ११,०००–१३,००० रुपयांवरून किमान १८,००० ते २०,००० रुपयांपर्यंत वाढवावा. सध्याचा पगार महागाईच्या तुलनेत अत्यंत कमी असून, रेशन, एलपीजी यांसारख्या गरजेच्या वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे उदरनिर्वाह कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, कामगारांनी ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन, साप्ताहिक सुट्टी, वैद्यकीय सुविधा आणि वेळेवर बोनस देण्याच्या मागण्या केल्या आहेत. सध्या वार्षिक वेतनवाढ फक्त २५० ते ३५० रुपयांच्या दरम्यान होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सोमवारी चौथ्या दिवशी फेज-2 आणि सेक्टर-60 मधील काही भागांमध्ये आंदोलन हिंसक झाले. यावेळी जाळपोळ, दगडफेक आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. एका वाहनाला आग लावण्यात आली, तर इतर मालमत्तेचेही नुकसान झाले. त्यामुळे रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गौतमबुद्ध नगर पोलिसांनी औद्योगिक भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून सतत लक्ष ठेवले जात आहे. शांतता राखण्यासाठी आवश्यक तेवढ्याच शक्तीचा वापर केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा:
आत्मनिर्भर भारताची झेप; लखनऊत तयार ब्रह्मोस सैन्याच्या ताफ्यात
पाकव्याप्त काश्मीर आणि अफगाण सीमेजवळ चीनचा नवा प्रांत
२००२ गुजरात दंगल प्रकरणात नऊ हिंदू निर्दोष
स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना आज दादरच्या हिंदू स्मशानभूमीत अखेरचा निरोप
आंदोलन हिंसक झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नोएडाहून दिल्लीकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर आणि सीमेवरील तपासणी नाक्यांवर कडक नजर ठेवली जात आहे, जेणेकरून कोणतेही असामाजिक घटक राजधानीत प्रवेश करू शकणार नाहीत. दरम्यान, नोएडा प्रशासन आणि उत्तर प्रदेश कामगार विभागाने कामगारांच्या मागण्यांबाबत तातडीने काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत. औद्योगिक युनिट्सना साप्ताहिक सुट्टी देणे, ओव्हरटाईमवर दुप्पट वेतन देणे, वैद्यकीय सुविधा आणि वार्षिक बोनस देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या प्रशासन आणि कामगार यांच्यात चर्चा सुरू असून लवकरच तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
