महिलांच्या आरोपानंतर आमदाराचा केरळ युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा!

मल्याळम अभिनेत्री आणि लेखिकेकडून छळाचा आरोप  

महिलांच्या आरोपानंतर आमदाराचा केरळ युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा!

केरळ काँग्रेसचे युवा नेते आणि पळक्कडचे आमदार राहुल मामकुटाथिल यांच्यावर दोन महिलांनी अश्लील वर्तनाचे गंभीर आरोप केल्यानंतर त्यांनी युथ काँग्रेसच्या राज्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. अडूर येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत पलक्कडच्या आमदाराने पत्रकारांसमोर राजीनामा जाहीर केला. हे प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.

आमदार राहुल ममकुताथिल यांनी राजीनामा जाहीर करताना म्हटले आहे की ते काही चुकीचे केले म्हणून राजीनामा देत नाहीत, तर पक्षाला त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी ते राजीनामा देत आहेत. “युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचा आणि पक्ष कार्यकर्त्यांचा विचार केला तर, पुढील विधानसभा आणि पंचायत निवडणुकांपूर्वी त्यांना खूप काम करायचे आहे. ते माझे समर्थन करण्यात वेळ वाया घालवू शकत नाहीत. मी त्यांच्या वेळेचा आदर करतो. आम्ही माकप सरकारविरुद्ध जोरदार लढू आणि निवडणुकांना सामोरे जाऊ,” असे ते म्हणाले. पक्षाच्या कोणत्याही नेत्याने त्यांना राजीनामा देण्यास सांगितले नव्हते आणि ही त्यांची वैयक्तिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार म्हणाले की, आरोप करणाऱ्या कोणत्याही महिलांनी त्यांचे नाव घेतले नाही किंवा कोणतीही तक्रार दिली नाही. “माझ्याविरुद्ध बनावट तक्रारही दाखल झालेली नाही,” असे राहुल म्हणाले. जे आरोप करतात ते योग्य तक्रार दाखल करू शकतात आणि न्यायालयात जाऊ शकतात. जर एखाद्या व्यक्तीने तक्रार केली तरच मी आरोपांबद्दल उत्तरदायी असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा: 
योगींच्या जीवनावर बनलेल्या चित्रपटावर बॉम्बे हायकोर्ट स्वतः पाहून देणार निकाल
जन्मस्थान मुंबई, पत्ता नवी मुंबईचा, अफगाण नागरिकाला अटक!
राज्यसभेतही पारित झाले ऑनलाइन गेमिंग विधेयक
“ऑनलाइन गेमिंग विधेयक २०२५’ चा उद्देश अपायकारक परिणामांवर नियंत्रण”

प्रकरण नेमकं काय?

मल्याळम अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या रिनी अ‍ॅन जॉर्ज यांनी सर्वप्रथम सोशल मीडियावर एक पोस्ट करत नाव न घेता एका ‘तरुण राजकीय नेत्याकडून’ वाईट अनुभव आल्याचे सांगितले. त्यांनी नंतर स्पष्टपणे राहुल मामकुटाथिल यांच्यावर अश्लील मेसेजेस पाठवण्याचा आरोप केला.  त्यानंतर लेखिका हनी भास्करन यांनीही तशाच स्वरूपाचे आरोप करत त्याच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, मोठा वाद होण्यापूर्वीच त्यांनी राजकीय नैतिकतेच्या आधारावर आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते अद्याप विधानसभा सदस्य (MLA) म्हणून कार्यरत आहेत. पक्षाने याप्रकरणाची आंतरिक चौकशी सुरू केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणाले की, महिला संबंधित मुद्द्यांवर पक्ष शून्य सहनशीलतेची भूमिका घेतो. प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.

Exit mobile version