नागपाड्यात दोन गटांत हाणामारी; पाच जखमी, १२ जणांना अटक

७०० रुपयांच्या वादातून हा संघर्ष उफाळला

नागपाड्यात दोन गटांत हाणामारी; पाच जखमी, १२ जणांना अटक

दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसरात गुरुवारी रात्री दोन गटांत झालेल्या जोरदार हाणामारीत पाच जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करत एकूण १२ जणांना अटक केली आहे.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात काहीजण लोखंडी रॉड व बांबू घेऊन एकमेकांचा पाठलाग करताना दिसत आहेत. घटनेनंतर नागपाडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधितांना ताब्यात घेतले व परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

पोलिसांच्या माहितीनुसार, अब्दुल हन्नान असद सिद्दीकी (२६) यांच्या तक्रारीवरून पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. ते वस्त्रव्यवसायासाठी मित्रांसह पुण्यात गेले होते. हॉटेल भाड्याच्या पैशांवरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर उर्वरित पैशांबाबत फोनवरून वाद वाढत गेला. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, कामाठीपुरा परिसरात जात असताना गौसिया मशिदीजवळ झाकीर व त्याच्या साथीदारांनी लोखंडी रॉड व बांबूने हल्ला केला.

हे ही वाचा:

“आसामच्या लोकसंख्येत बदल; सात जिल्ह्यांमध्ये ६४ लाख घुसखोर!”

साकिनाक्यात ‘आई-बाबा फाऊंडेशन’च्या नावाखाली खंडणी

येत्या रविवारी संस्कार भारती भरतमुनी सन्मान सोहळा रंगणार

कनिष्ठ न्यायालयांतील ४६ टक्के न्यायाधीश अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय

दुसरीकडे, झाकीर सिद्दीकी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अब्दुल व त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे नमूद केले आहे. सुमारे ७०० रुपयांच्या वादातून हा संघर्ष उफाळून आला, असे पोलिसांनी सांगितले. या हाणामारीत अब्दुल कादरी आफताब सिद्दीकी यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

दोन्ही तक्रारींनुसार भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले असून अटक आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Exit mobile version