महिला अकाउंटंटचे अपहरण, मारहाण, धमकी प्रकरणात ‘आप’चे उपाध्यक्ष अटकेत

गुजरातच्या गांधीनगरमधून धक्कादायक प्रकरण उघडकीस

महिला अकाउंटंटचे अपहरण, मारहाण, धमकी प्रकरणात ‘आप’चे उपाध्यक्ष अटकेत

गुजरातच्या गांधीनगरमधून एक गंभीर गुन्हेगारी प्रकरण समोर आले आहे. आम आदमी पार्टी (AAP) चे उपाध्यक्ष हसमुख पटेल यांना एका महिला अकाउंटंटचे अपहरण, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात इतर आरोपींविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अहवालानुसार, पीडिता अहमदाबादच्या गोटा परिसरातील रहिवासी असून सेक्टर-२५ GIDC मधील HBC लाइफ सायन्सेस या खासगी कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होती. ही कंपनी हसमुख पटेल यांची असल्याचे सांगितले जाते. तसेच त्यांच्या भाऊ हिमांशु पटेल यांनी तिला ‘मॅक्सिम्स हॉलिडे प्रायव्हेट लिमिटेड’च्या ऑडिटचे काम दिले होते. कामादरम्यान पीडितेला सुमारे ८० ते ८५ लाख रुपयांच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांचा शोध लागला, ज्यामध्ये बिलशिवाय करण्यात आलेल्या पेमेंट्सचाही समावेश होता. या खुलाशानंतर संबंधितांमध्ये खळबळ उडाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

संबंधित घटना २६ मार्च रोजी दुपारी घडल्याचे सांगितले जाते. आरोपानुसार, महिलेला कंपनीच्या पार्किंगमधून जबरदस्तीने एका हिरव्या रंगाच्या SUV मध्ये बसवून अपहरण करण्यात आले. चालत्या गाडीत दोन महिलांनी तिला मारहाण केली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिचे केस ओढण्यात आले, तिला मारहाण करण्यात आली आणि गंभीर परिणामांची धमकी देण्यात आली.

पीडितेने आरोप केला आहे की, “जर तिने ही घटना कोणाला सांगितली तर तिला मारून पुरून टाकले जाईल,” अशी धमकी देण्यात आली. घटनेनंतर तिने हसमुख पटेल यांच्याशी संपर्क साधला असता मदत करण्याऐवजी त्यांनी तक्रार दाखल करू नये असा दबाव टाकल्याचा आरोप आहे. एफआयआरमध्ये अपहरण आणि हल्ल्याची योजना त्यांच्या सूचनेवरून रचल्याचा दावा करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

बांगलादेशमध्ये अवामी लीगच्या नेत्यावर गोळीबार

हल्ल्यात जखमी झालेल्या इराणचे नेव्ही कमांडर तंगसीरी यांचा मृत्यू

दोन आमदारांची हत्या करणारा नक्षलवादी सुरेश शरण

श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती; प्रेयसीचे अवयव ठेवले फ्रिजमध्ये

यानंतर पीडितेने सेक्टर-२१ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू करून हसमुख पटेल यांना अटक केली. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. लक्षात घेण्यासारखे म्हणजे, हसमुख पटेल हे यापूर्वी आपचे राज्य संघटन मंत्री देखील राहिले आहेत. पोलिसांनी सांगितले की सर्व आरोपांची सखोल चौकशी केली जात असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल.

Exit mobile version