पायधुनी परिसरातील एका इमारतीतील सात वर्षांच्या चिमुरडीवर सुरक्षा रक्षकाने कथित लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (१२ जुलै) सकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी पायधुनी पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केला. पोलिसांनी आरोपी सुरक्षा रक्षकाला तातडीने अटक केली असून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रविवारी सकाळी संबंधित मुलगी इमारतीतील सार्वजनिक स्वच्छतागृहात गेली असता तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. दुपारच्या सुमारास शेकडो नागरिक आणि मुलीचे नातेवाईक पायधुनी पोलीस ठाण्याबाहेर जमले. त्यांनी पोलीस ठाण्यासमोरील मुख्य रस्ता रोखून आंदोलन केले. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढून रस्ता मोकळा केला.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस ठाण्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. “आरोपीला अटक करण्यात आली असून पीडित मुलीच्या कुटुंबीयांना कठोर कारवाईचे आश्वासन देण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे,” अशी माहिती पायधुनी पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिली.
हे ही वाचा:
बँकॉकमध्ये पबला भीषण आग; २७ जणांचा मृत्यू
यास्तिकाच्या शतकाने इतिहास रचला
ब्रह्मपुत्रावर चीनचा ‘टाईम बॉम्ब’?
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पायधुनी पोलीस ठाण्याला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्यांना घेराव घालत आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण असून आरोपीविरुद्ध जलदगतीने खटला चालवून कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
