मैत्रिणीशी बोलल्यामुळे विद्यार्थ्याचा कोयता घेऊन पाठलाग

घाटकोपरमध्ये घडलेली घटना...

मैत्रिणीशी बोलल्यामुळे विद्यार्थ्याचा कोयता घेऊन पाठलाग

मैत्रिणीशी बोलल्याचा राग मनात धरून एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याचा भरदिवसा कोयता घेऊन पाठलाग करत हल्ल्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घाटकोपर पूर्व येथे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी आदित्य गांगुर्डे याच्याविरोधात शस्त्र अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार १६ वर्षीय विद्यार्थी घाटकोपर येथील शिवाजी शिक्षण संस्था मल्टिपर्पज टेक्निकल हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीत शिकतो. ३० जुलै रोजी मराठी विषयाचा तास रद्द झाल्याने सकाळी दहाच्या सुमारास कॉलेज सुटले. त्यानंतर तो आपल्या मित्रासोबत महाविद्यालयाबाहेर उभा होता. त्याचवेळी वर्गातील एक मैत्रीण तेथे आली आणि फोन करण्यासाठी तिने विद्यार्थ्याकडे मोबाइल मागितला.

विद्यार्थी आणि त्याची मैत्रीण बोलत असतानाच आदित्य गांगुर्डे तेथे आला. ‘तू तिच्याशी का बोलत आहेस?’ अशी विचारणा करत त्याने विद्यार्थ्याची कॉलर पकडली. मैत्रिणीने मध्यस्थी करत आरोपीला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा राग अनावर झाला. त्याने आपल्या स्कूटरमधून सुमारे एक फूट लांबीचा धारदार कोयता बाहेर काढला.

हे ही वाचा:

दिल्लीत १६ ऑगस्टपर्यंत ‘नो-ड्रोन झोन’

पीओके हिंसाचाराबद्दल पाकिस्तानविरोधात ब्रिटनची हस्तक्षेपाची मागणी

मेलोनी यांनी इटली प्रवेशास स्थलांतरिताना केली बंदी

माझ्याकडेही बघा !

हातात कोयता घेतल्यानंतर आरोपीने विद्यार्थ्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांचा पाठलाग सुरू केला. अचानक कोयता पाहून घाबरलेल्या तक्रारदार आणि त्याच्या मित्राने तेथून धूम ठोकली. आरोपी पाठलाग करत असल्याने दोघांनी जवळच्या एका शेडमध्ये लपून आपला जीव वाचवला. काही वेळ परिसरात शोध घेतल्यानंतर आरोपी तेथून निघून गेला.

घटनेनंतर विद्यार्थ्यांनी संबंधित मैत्रिणीकडे आरोपीने हल्ल्याचा प्रयत्न का केला, याबाबत विचारणा केली. तिच्याशी बोलल्याचा राग मनात धरून आरोपीने हा प्रकार केल्याचे तिने सांगितले. त्यानंतर परिसरातील एका रिक्षाचालकाच्या मदतीने तक्रारदार आणि त्याचा मित्र पंतनगर पोलिस ठाण्यात पोहोचले. विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीविरोधात पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version