पश्चिम बंगाल पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) पूर्व बर्दवान जिल्ह्यात मोठी कारवाई करत जैश-ए-मोहम्मद (JeM) दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या एका संशयिताला अटक केली आहे. हमीद मंडल असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो जम्मू-काश्मीरचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, त्याने बनावट नाव किंवा बनावट ओळखपत्रांचा वापर केला होता का, याचाही तपास सुरू आहे.
एसटीएफने बर्दवानमधील दुर्गापूर एक्स्प्रेसवेजवळील ‘रेनेसां कॉम्प्लेक्स’ या गृहनिर्माण संकुलातील भाड्याच्या फ्लॅटमधून त्याला ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे. प्राथमिक चौकशीत हमीद मंडल यापूर्वी कोलकात्याच्या न्यू टाऊन परिसरातही भाड्याच्या घरात राहत असल्याचे समोर आले आहे. तपासादरम्यान त्याच्या ताब्यातून पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या दैनंदिन कार्यक्रमाशी संबंधित काही कागदपत्रे, तसेच इतर काही व्हीव्हीआयपींच्या दौऱ्यांची माहिती जप्त करण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.
तपास अधिकाऱ्यांच्या मते, हमीदने पाकिस्तानमध्ये काही काळ वास्तव्यास राहत तेथील आयएसआयकडून प्रशिक्षण घेतले असण्याची शक्यता आहे. तसेच तो पश्चिम बंगालमध्ये जैश-ए-मोहम्मदचा स्थानिक ‘हँडलर’ म्हणून कार्यरत होता, असा संशय आहे. मुस्लिम तरुणांना कट्टरतावादी विचारांकडे वळवून त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी प्रवृत्त करणे आणि प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात पाठवणे, हे त्याचे प्रमुख काम असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा:
ममतांच्या काळातील जमीन लीज व्यवहारांची होणार छाननी
मुंबई उच्च न्यायालयातील कँटीनला ‘स्टॉप बिझनेस’ नोटीस
पाकिस्तानातील ब्रॉड पीकवर हिमस्खलन; चार गिर्यारोहकांचे मृतदेह सापडले
मोरोक्कोतून ३००० लोक स्पेनमध्ये घुसले
या प्रकरणाच्या अनुषंगाने एसटीएफने न्यू टाऊन आणि बर्दवान येथील त्याला घर भाड्याने देणाऱ्या मालकांची चौकशी सुरू केली आहे. फ्लॅट भाड्याने घेताना सादर करण्यात आलेली कागदपत्रे आणि ओळखपत्रांचीही पडताळणी करण्यात येत असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
