बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक पासपोर्ट काढले

माहिम पोलिसांत गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक पासपोर्ट काढले

मुंबईतील माहिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक पासपोर्ट मिळविल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ३७ वर्षीय नाझिया गिगानी यांनी मोहसिन रहीम उंद्रे याच्याविरोधात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

तक्रारीनुसार, मोहसिन उंद्रे याने स्वतःसह आपल्या कुटुंबीयांसाठीही खोट्या ओळखपत्रांच्या आधारे पासपोर्ट काढले असल्याचा आरोप आहे. पोलिस तपासात आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी मोहसिन यासीन अली, मोहसिन अब्दुल कादर मोतिवाला आणि मोहसिन अब्दुल रहीम उंद्रे अशी तीन वेगवेगळी नावे वापरल्याचे निष्पन्न झाले आहे.
तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, आरोपीने आपल्या १३ वर्षीय मुलासाठी पासपोर्ट मिळवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी नॉर्थ’ विभागाच्या नावाने बनावट जन्म प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र पडताळणीदरम्यान संबंधित जन्म प्रमाणपत्र महापालिकेच्या अधिकृत नोंदींमध्ये अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणात आरोपीची आई हमिदा रहीम उंद्रे हिच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मोहसिन आणि सना मोतिवाला हे अल्पवयीन असताना त्यांच्यासाठी बनावट शिधापत्रिका व जन्म प्रमाणपत्रांच्या आधारे पासपोर्ट काढून देण्यात तिने मदत केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात विक्रोळी येथील पार्क साईट पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल आहे.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, मोहसिन उंद्रे याच्यावर यापूर्वी डोंगरी पोलीस ठाण्यात बलात्कार (कलम ३७६), फसवणूक (कलम ४२०), खंडणी (कलम ३८४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

हे ही वाचा:

जीनत अमान यांनी शेअर केला लेटेस्ट फोटोशूटचा अनुभव

एनआयए प्रमुख सदानंद दाते महाराष्ट्रात परतणार

अल फलाह विद्यापीठाचा अल्पसंख्याक दर्जा रद्द होणार?

केएसवायअंतर्गत ९८ टक्क्यांहून अधिक गावांना दिवसा वीजपुरवठा

पोलिस तपासात सादर करण्यात आलेली जन्म प्रमाणपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले असून, आरोपीने सरकारी यंत्रणांची फसवणूक करून अनेक पासपोर्ट मिळविल्याचा आरोप आहे. सध्या आरोपी माहिम (पश्चिम) येथे वास्तव्यास असून, या मोठ्या बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात महापालिका किंवा पासपोर्ट कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. नव्या पुराव्यांच्या आधारे आरोपीची लवकरच चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Exit mobile version