मुंबई पोलीस आयुक्तांच्या नावे ९९ लाखांची खंडणी

गॅस एजन्सी मालकाला आत्महत्येचा प्रयत्न करण्यास केले प्रवृत्त

मुंबई पोलीस आयुक्तांच्या नावे ९९ लाखांची खंडणी

मुंबईच्या मालाड परिसरातील एका ३९ वर्षीय गॅस एजन्सी मालकाला पोलीस आयुक्तांच्या नावाने धमकावून तब्बल ९९ लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अटकेच्या भीतीने या व्यावसायिकाने घर सोडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांनी वेळीच शोध घेतल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

मालाड पूर्व येथील रहिवासी असलेले एजन्सी मालक यांची कुरार परिसरात गॅस एजन्सी आहे. काही दिवसांपूर्वी ते घरातून बेपत्ता झाले होते, ज्यानंतर त्यांच्या पत्नीने पोलीस तक्रार केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्यांचा शोध घेतला असता, ते पालघरमधील डहाणू रेल्वे स्थानकावर सापडले. चौकशी दरम्यान गॅस एजन्सी मालक यांनी रडत रडत आपबिती सांगितली.

एजन्सी मालक यांच्या गोदामाजवळ राहणारा प्रवीण खेडेकर दरवर्षी गणपती उत्सवासाठी त्यांच्याकडून वर्गणी घ्यायचा. सप्टेंबर महिन्यात त्याने पैशांची गरज असल्याचे सांगून एजन्सी मालक यांच्याकडून १०,५०० रुपये घेतले.

त्यानंतर एजन्सी मालक यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने आपण ‘मुंबई पोलीस सह-आयुक्त’ असल्याचे सांगून खळबळजनक दावा केला की, “खेडेकर याने एकाचा खून केला असून, त्याची सुपारी तुम्ही (एजन्सी मालक) दिली आहे.” हे प्रकरण दाबण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली.

त्यानंतर आरोपींनी पुन्हा फोन करून सांगितले की, “तुम्हाला वाचवण्यासाठी आम्ही खेडेकरचा काटा काढला आहे (त्याला मारून टाकले आहे).” आता हा खुनाचा डाग पुसण्यासाठी २ लाख रुपये द्यावे लागतील. यानंतर आरोपींनी मर्यादा ओलांडली. एका व्यक्तीने थेट ‘मुंबई पोलीस आयुक्त’ असल्याचे भासवून गॅस एजन्सी मालक यांना फोन केला.

हे ही वाचा:

राहुल गांधी जर्मनीत भारतविरोधी लोकांना का भेटले?

मराठी पंतप्रधान होता होता राहिला!

भ्रष्टाचाराचे खटले हस्तांतरित करण्याची राबडी देवींची याचिका फेटाळली

सूर्यकुमार सरदार, मावळ्यांची फौज जाहीर

आरोपींच्या सततच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या एजन्सी मालक यांनी कोटक महिंद्रा, बजाज फायनान्स आणि टाटा कॅपिटल सारख्या संस्थांकडून कर्ज काढले. तसेच आपल्या गॅस एजन्सीच्या क्रेडिटवर पैसे उभे केले. त्यांनी एकूण ८० लाख रुपये रोख आणि १९ लाख रुपये ऑनलाइन असे एकूण ९९ लाख रुपये आरोपींना दिले.

जेव्हा आरोपींनी आणखी पैशांची मागणी सुरू केली, तेव्हा वैतागून आणि अटकेच्या भीतीने १५ डिसेंबर रोजी एजन्सी मालक यांनी घर सोडले आणि आत्महत्येचा विचार केला.
दिंडोशी पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०८ (खंडणी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या टोळीने एका ज्येष्ठ नागरिकाचा वापर करून पैसे स्वीकारल्याचे तपासात समोर आले आहे. पोलीस आता या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेत आहेत.

Exit mobile version