डिजिटल अरेस्ट दाखवून महिलेचे ३२ कोटी लुटले

बंगळूरूमधील ५७ वर्षीय महिलेची केली फसवणूक

डिजिटल अरेस्ट दाखवून महिलेचे ३२ कोटी लुटले

बंगळूरूमधील एका महिलेची ‘डिजिटल अरेस्ट’ माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका ५७ वर्षीय महिलेची सहा महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या ‘डिजिटल अरेस्ट’ घोटाळ्यात सुमारे ३२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करत भामट्यांनी तिला सतत व्हिडिओ देखरेखीखाली ठेवले आणि १८७ वेळा बँक व्यवहार करण्यास भाग पाडले.

सप्टेंबर २०२४ मध्ये या महिलेच्या फसवणूकीला सुरुवात झाली त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या महिलेने तपासकर्त्यांशी संपर्क साधल्यानंतर, अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर तिला फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डीएचएलमध्ये एक्झिक्युटिव्ह असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीचा संबंधित महिलेला फोन आला. त्याने महिलेला सांगितले की, तिच्या नावाचे एक पार्सल, ज्यामध्ये तीन क्रेडिट कार्ड, चार पासपोर्ट आणि प्रतिबंधित एमडीएमए असून ते कंपनीच्या मुंबईतील अंधेरी सेंटरमध्ये आले आहे. सुरुवातील महिलेने आपला त्या पार्सलशी काहीही संबंध नाही असे सांगितले आणि आपण बंगळूरूमध्ये राहत असल्याचे स्पष्ट केले. तेव्हा फोन करणाऱ्याने वारंवार सांगितले की, तिचा फोन नंबर त्या पार्सलशी जोडलेला असून हे प्रकरण सायबर क्राइमचे असू शकते. त्यानंतर संबंधित कॉल सीबीआय अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करण्यात आला, ज्याने तिला सांगितले की सर्व पुरावे तुमच्याविरुद्ध आहेत.

यानंतर गुन्हेगार महिलेच्या घरावर पाळत ठेवत आहेत, असे सांगून भामट्यांनी महिलेला पोलिस ठाण्यात जाण्यास मज्जाव केला. तिच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची आणि मुलाच्या लग्नाची भीती असल्याने, तिने भामट्यांच्या सूचनांचे पालन केले. या वर्षी मे महिन्यात प्लॅटफॉर्म बंद होण्यापूर्वी तिला दोन स्काईप आयडी इन्स्टॉल करण्यास आणि सतत व्हिडिओ कॉलवर राहण्यास सांगण्यात आले. मोहित हांडा म्हणून ओळख असलेल्या एका व्यक्तीने दोन दिवस तिच्यावर लक्ष ठेवले, त्यानंतर राहुल यादवने आठवडाभर लक्ष ठेवले. आणखी एक बनावट व्यक्ती, प्रदीप सिंग, याने सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची ओळख करून दिली आणि तिचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला.

हेही वाचा..

दिल्ली स्फोटाचे धागेदोरे पश्चिम बंगालमध्ये; तुरुंगात असलेल्या आरोपींची चौकशी

सौदी अरेबियातील मदीनाजवळ बस आणि टँकरच्या अपघातात ४२ भारतीय यात्रेकरूंचा मृत्यू

बिहारमधील नव्या सरकारचा ‘या’ दिवशी होणार शपथविधी

पाक सैन्याच्या गोळीबारात जखमी झालेल्या जम्मूतील ‘गौरी’ला मिळाली नवसंजीवनी!

गेल्या वर्षी २४ सप्टेंबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान, महिलेने तिची आर्थिक माहिती त्यांना दिली आणि मोठ्या प्रमाणात पैसे हस्तांतरित करण्यास सुरुवात केली. २४ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत, तिने २ कोटी रुपयांची “जामीन रक्कम” जमा केली, त्यानंतर “कर” म्हणून आणखी व्यवहार केले. महिलेने अखेर तिच्या मुदत ठेवी मोडल्या, इतर बचतीही वापरल्या आणि फसवणूक करणाऱ्यांच्या सूचनेनुसार १८७ व्यवहारांमध्ये ३१.८३ कोटी रुपये हस्तांतरित केले. तिला वारंवार आश्वासन देण्यात आले की फेब्रुवारी २०२५ पर्यंत पडताळणी केल्यानंतर पैसे परत केले जातील. घोटाळेबाजांनी डिसेंबरमध्ये तिच्या मुलाच्या लग्नापूर्वी तिला मंजुरी पत्र देण्याचे आश्वासन दिले. पुढे तिची फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने तक्रार दाखल केली.

Exit mobile version