कर्जाच्या वादातून घाटकोपरमध्ये महिलेचा गळा चिरला

शेजारील रिक्षाचालक अटकेत

कर्जाच्या वादातून घाटकोपरमध्ये महिलेचा गळा चिरला

घाटकोपर पूर्वेतील रायझिंग सिटी परिसरात ४१ वर्षीय महिलेच्या निर्घृण हत्येचे गूढ अखेर उकलले आहे. उसन्या दिलेल्या पैशांच्या वादातून शेजारी राहणाऱ्या रिक्षाचालकाने महिलेचा गळा चिरून खून केल्याचे तपासात उघड झाले असून पंतनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अमीनाबी सिद्दीकी असे मृत महिलेचे नाव आहे. ती के.टी.-९, रायझिंग सिटी येथे कुटुंबासह राहत होती. आरोपी मोहम्मद इरफान ऊर्फ चांद फकरेआलम अन्सारी (४२) हा तिच्याच शेजारी के.टी.-८ इमारतीत पत्नीसमवेत वास्तव्यास आहे. २४ डिसेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जेवणानंतर अमीनाबी नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र ती बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी पंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दरम्यान, २५ डिसेंबर रोजी सकाळी के.टी.-९ इमारतीसमोरील झुडपात अमीनाबीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. धारदार शस्त्राने गळा चिरून तिची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त हेमराजसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल १५ पथके तपासासाठी तयार करण्यात आली.

हे ही वाचा:

राजस्थानमधून १५० किलो स्फोटके जप्त

नववर्षासाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त

आर्मी हॉस्पिटलमध्ये पहिली आयस्टेंटसह ३डी फ्लेक्स एक्वस अँजिओग्राफी

लष्कराने साध्य केली आत्मनिर्भरता

सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि मानवी गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचून सोमवारी रात्री त्याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. मृत महिलेने आरोपीच्या पत्नींकडून तीन लाख रुपये उसने घेतले होते. हे पैसे परत न केल्याच्या रागातून आरोपीने तिच्यावर पाळत ठेवून ही निर्घृण हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

पंतनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार यांनी दिली.

Exit mobile version