वाद आणि विरोधानंतर निर्माता विपुल अमृतलाल शाह यांचा वादग्रस्त चित्रपट ‘द केरळ स्टोरी २ गोज बियोंड’ शुक्रवारी प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी संथ सुरुवात झाल्यानंतर चित्रपटाच्या कमाईत शनिवारी मोठी वाढ झाली.
इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्क च्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी केवळ ७५ लाख रुपयांची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ५२०% वाढ नोंदवत ४.६५ कोटी रुपये कमावले. त्यामुळे देशांतर्गत एकूण कमाई ५.४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
हे ही वाचा:
१ मार्चला ४४४ उड्डाणे रद्द होण्याची शक्यता
ईरानने होर्मुज सामुद्रधुनी रोखली
एनएसईमध्ये गुंतवणूकदारांची खाती २५ कोटी (२५० दशलक्ष)
अफगाणिस्तानातील इस्त्रायली फूटप्रिंट्सचे पाकिस्तानला भय
शनिवारी चित्रपटाची एकूण हिंदी ऑक्युपन्सी १२.२०% होती. सकाळच्या शोमध्ये ६.४५%, दुपारच्या शोमध्ये ११.८८%, संध्याकाळी ११.४२%, तर रात्रीच्या शोमध्ये १९.०५% इतकी नोंद झाली. दिल्ली-एनसीआर भागात ८०६ शोसह १०.२५% ऑक्युपन्सी होती, तर मुंबईत ७७० शोसह १४.७५% ऑक्युपन्सी नोंदवली गेली.
या आकडेवारीची तुलना २०२३ मधील पहिल्या भागाशी केली असता सध्याची कमाई कमी असल्याचे दिसते. अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी, सोनिया बालानी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या पहिल्या चित्रपटाने पहिल्या दिवशी ८.०३ कोटी आणि दुसऱ्या दिवशी ११ कोटी रुपयांची कमाई केली होती. टीका आणि राजकीय वा असूनही त्या चित्रपटाने जागतिक स्तरावर ३०२ कोटी रुपयांची एकूण कमाई केली होती.
प्रदर्शनापूर्वी ‘द केरळ स्टोरी २’ला कायदेशीर अडथळ्यांनाही सामोरे जावे लागले. एका याचिकाकर्त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती मागितली होती. मात्र, केरळ उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अंतरिम स्थगिती उठवली. न्यायमूर्ती एस. ए. धर्माधिकारी आणि पी. व्ही. बालकृष्णन यांच्या खंडपीठाने एकलपीठाचा आदेश स्थगित केला. यापूर्वी न्यायमूर्ती बेचू कुरियन थॉमस यांच्या एकलपीठाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर दोन आठवड्यांची स्थगिती दिली होती आणि सेन्सॉर प्रमाणपत्राचा पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले होते.
दरम्यान, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) च्या कार्यकर्त्यांनी केरळमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात आंदोलन केले. चित्रपट राज्याची नकारात्मक प्रतिमा दाखवतो, असा आरोप त्यांनी केला. कोची, कोझिकोड आणि कोट्टायम येथील काही थिएटरमधील शो रद्द झाल्याचे वृत्त आहे.
दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली आणि सनशाइन पिक्चर्स यांच्या निर्मितीत तयार झालेल्या या चित्रपटात उल्का गुप्ता, अदिती भाटिया, ऐश्वर्या ओझा, सुमित गहलावत आणि अर्जन सिंग औजला यांच्या भूमिका आहेत.
