तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माविरोधात केलेल्या द्वेषपूर्ण टिप्पणीचा मद्रास उच्च न्यायालयाने चांगलाच समाचार घेतला. न्यायालयाने बुधवारी निरीक्षण नोंदवले की सनातन धर्माबाबत २०२३ मध्ये त्यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्ये ही द्वेषपूर्ण ठरतात. या वक्तव्यांमुळे देशभरात मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.
मदुराई खंडपीठाने तीव्र शब्दांत निरीक्षण नोंदवत सांगितले की, गेल्या १०० वर्षांपासून द्रविड मुनेत्र कझगम (DMK) कडून हिंदू धर्मावर सातत्याने हल्ला केला जात आहे, आणि संबंधित मंत्री याच वैचारिक परंपरेतून आलेले आहेत. तसेच द्वेषपूर्ण भाषण करणाऱ्यांवर अनेकदा कोणतीही कारवाई होत नसल्याबद्दल न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली.
न्यायालयाने आपल्या निरीक्षणात म्हटले, “द्रविड कझगम आणि त्यानंतर द्रविड मुनेत्र कझगमकडून गेल्या १०० वर्षांपासून हिंदू धर्मावर स्पष्ट हल्ला होत असल्याचे दिसून येते. संबंधित मंत्री याच परंपरेतील आहेत. एकूण परिस्थितीचा विचार करता, याचिकाकर्त्याने मंत्र्यांच्या भाषणामागील लपलेला अर्थ प्रश्नार्थक पद्धतीने मांडला असल्याचे दिसते.”
हे ही वाचा:
डॉ. अशोक मोडक यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी श्रद्धांजली सभा
उद्योजक प्रशांत कारुळकर यांना देवरुखे भूषण पुरस्कार
आरोग्यदायी हिवाळ्यासाठी कोणत्या भाज्या खाव्यात?
दहा दिवसांत १.४ कोटींचा फैसला, कागद दाखवा मतदार व्हा…
न्यायालयाने पुढे नमूद केले, “या न्यायालयाला अत्यंत वेदनेने हे नोंदवावे लागत आहे की, जे लोक द्वेषपूर्ण भाषणाची सुरुवात करतात ते मोकळे फिरतात, तर त्यावर प्रतिक्रिया देणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगारला जातो. न्यायालये प्रतिक्रिया देणाऱ्यांना प्रश्न विचारतात, मात्र द्वेषपूर्ण भाषण सुरू करणाऱ्यांविरोधात कायदा कार्यान्वित करत नाहीत.”
तमिळनाडूत गुन्हा नाही, इतर राज्यांत प्रकरणे
उच्च न्यायालयाने हेही स्पष्ट केले की, तमिळनाडूमध्ये उदयनिधी स्टालिन यांच्याविरोधात द्वेषपूर्ण भाषणाबाबत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, मात्र इतर काही राज्यांमध्ये त्यांच्या वक्तव्यांविरोधात प्रकरणे दाखल झाली आहेत.
२०२३ मधील वादग्रस्त वक्तव्य
सप्टेंबर २०२३ मध्ये, मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचे पुत्र असलेल्या उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्मावर केलेल्या वक्तव्यामुळे देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता.
एका सार्वजनिक कार्यक्रमात ते म्हणाले होते, काही गोष्टींचा केवळ विरोध करता येत नाही, त्या नष्ट कराव्या लागतात. आपण डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोना यांचा विरोध करत नाही, तर त्यांचा नायनाट करतो. त्याचप्रमाणे, सनातनाचा विरोध न करता तो नष्ट केला पाहिजे.
तसेच त्यांनी असा आरोप केला होता की, सनातन धर्म सामाजिक न्याय आणि समानतेच्या विरोधात असून जात व धर्माच्या आधारावर विभाजन मजबूत करतो.
टीका आणि ‘नरसंहार’चा आरोप
या वक्तव्यांवर तीव्र टीका झाली. टीकाकारांनी म्हटले की, हे वक्तव्य सनातन धर्माचे पालन करणाऱ्यांच्या “नरसंहाराचे” आवाहन आहे. मात्र, उदयनिधी स्टालिन यांनी नंतर हा अर्थ फेटाळून लावला होता.
न्यायालयाचे स्पष्ट निरीक्षण
मात्र, मद्रास उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले की, उदयनिधी स्टालिन यांनी वापरलेली भाषा प्रत्यक्षात नरसंहाराचा अर्थ सूचित करते आणि ती द्वेषपूर्ण भाषण ठरते.
न्यायालय म्हणाले, जर सनातन धर्माचे पालन करणारा एक समूह अस्तित्वातच नसावा असा अर्थ निघत असेल, तर त्यासाठी योग्य शब्द ‘नरसंहार’ हाच आहे. जर सनातन धर्माला धर्म मानले, तर तो ‘धर्मनाश’ ठरतो. यात लोकांचे विविध पद्धतींनी उच्चाटन करण्याचा अर्थ अभिप्रेत आहे—ज्यात पर्यावरणनाश, तथ्यनाश आणि संस्कृतीनाश यांचाही समावेश होतो. त्यामुळे ‘सनातन ओझिप्पू’ हा तमिळ शब्द स्पष्टपणे नरसंहार किंवा संस्कृतीनाश सूचित करतो. अशा परिस्थितीत, मंत्र्यांच्या भाषणावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या याचिकाकर्त्याची पोस्ट द्वेषपूर्ण भाषण ठरत नाही.”
