येत्या रविवारी संस्कार भारती भरतमुनी सन्मान सोहळा रंगणार

पंडवानी गायिका प्रभा यादव, चित्रकार चिंतामणी हसबनीस यांना पुरस्कार

येत्या रविवारी संस्कार भारती भरतमुनी सन्मान सोहळा रंगणार

कलाक्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना संस्कार भारतीच्या वतीने भरतमुनी सन्मानाने गौरवण्यात येते. यंदा हा अखिल भारतीय भरतमुनी सन्मान सोहळा राम गणेश गडकरी रंगायतन येथे संपन्न होत आहे. रविवार, १ फेब्रुवारी २०२६ या दिवशी सकाळी १०:३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्तीसगडच्या वेदमती शैलीतील प्रख्यात पंडवांनी गायिका प्रभा यादव आणि पुण्यातील सुप्रसिद्ध चित्रकार चिंतामणी हसबनीस या दोघांना दीर्घकालीन कलासाधनेसाठी आणि कार्यक्षेत्रातील विशेष योगदानासाठी ‘ अखिल भारतीय भरतमुनि सन्मान २०२५’ने गौरवण्यात येणार आहे. स्मृतिचिह्न, प्रशस्तीपत्र आणि १,५१,००० रुपये रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

या पुरस्काराविषयी माहिती देताना संस्कार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री अभिजीत गोखले म्हणाले की, “कलाकारांना पुरस्कार देणाऱ्या अनेक संस्था आहेत, ज्यात त्यांच्या कलासाधनेचा गौरव होतो. संस्कार भारतीद्वारे दिला जाणारा भरतमुनी सन्मान हा केवळ कलेतील योगदानासाठी दिला जात नाही हे विशेष लक्षात घेतले पाहिजे. भरतमुनींनी आपल्या नाट्यशास्त्रात नाटकाची केवळ कला म्हणून चर्चा केलेली नाही. तर कलाकाराच्या कलासाधनेद्वारे सामाजिक जबाबदारीचीही मांडणी केली आहे. याच दृष्टीकोनातून कलासाधनेसह सामाजिक जबाबदारी पार पाडणाऱ्या तसेच प्रसिद्धीपासून दूर असलेल्या असामान्य कलाकारांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. त्या कलाकारांच्या सामाजिक कार्याची माहिती या पुरस्काराच्या निमित्ताने नागरिकांपर्यंत पोहोचते.”

हे ही वाचा:

“युरोपशी झालेल्या करारामुळे भारत भू-राजकारणाच्या शिखरावर”

ॲपलचा फोल्डेबल आणि प्रीमियम आयफोनवर अधिक भर

अँड्रॉइड ऍप ‘विंगो’ घोटाळा; फसवणूक करणारे ऍप, टेलिग्राम चॅनेल ब्लॉक

शाळांमध्ये विद्यार्थिनींना मिळणार मोफत सॅनिटरी नॅपकिन्स

अत्यंत भव्यदिव्य स्वरुपात संपन्न होणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमास सुप्रसिद्ध शास्त्रीय नृत्य गुरू, पद्मविभूषण व माजी राज्यसभा सदस्य विदुषी सोनल मानसिंग प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. मानसिंग यांच्या हस्ते तसेच संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष व सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक मैसूर मंजुनाथ यांच्या विशेष उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संस्थेच्या वतीने दृश्यकला, मंचीय कला, साहित्य, लोककला यांपैकी दोन कलाप्रकारात दर वर्षी पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून यंदा लोककला आणि चित्रकला म्हणजेच दृश्यकला विभागात हा पुरस्कार दिला जात आहे. यावर्षी संस्कार भारती कोकण प्रांताकडे या कार्यक्रमाचे आयोजकत्व आहे.

संगीत, नृत्य, नाट्य, चित्र-शिल्प-हस्त कला अशा विविध कलांच्या संवर्धनासाठी संस्कार भारती दीर्घकालापासून कार्यरत आहे. कलाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारांना संस्थेच्या माध्यमातून मागील दोन वर्षांपासून नाट्यशास्त्र ग्रंथाचे रचनाकार महर्षी भरतमुनि यांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरवले जात आहे.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण

भरतमुनी पुरस्कार – २०२५चे प्राप्तकर्ते चित्रकार चिंतामणी हसबनीस हे दृष्टिबाधितांसाठी चित्र काढतात. दृष्टिबाधितांना या कलेचा आस्वाद घेता यावा, रसग्रहण करता यावे, चित्रकलेसारख्या आस्वाद्य कलेपासून त्यांनी वंचित राहू नये यासाठी त्यांनी हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. चित्रावरच छापलेल्या ब्रेल लिपी मजकुराच्या आधारे व स्पर्शज्ञानातून ते या चित्ररसिकांना चित्रांच्या आस्वादाच्या अनुभूतीचा आनंद मिळवून देतात. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे प्रत्यक्ष दर्शन(लाईव्ह डेमो) उपस्थितांना मंचावरून घेता येणार आहे. त्याचप्रमाणे संस्कार भारती कोकण प्रांत(निर्मिती) व कलांकुर ठाणे(प्रस्तुती) यांच्या माध्यमातून भरतमुनी नृत्यनाट्याचे व लोककलेच्या माध्यमातून ‘वंदे मातरम् १५०’चे सादरीकरण केले जाणार आहे.

हा संपूर्ण कार्यक्रम कलाकारांसाठी आणि रसिकांसाठी सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे. जास्तीत जास्त रसिकांनी या पुरस्कार सोहळ्याकरिता उपस्थित राहावे, तसेच +91 98206 20148 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन संस्कार भारती कोकण प्रांत अध्यक्ष सुनील बर्वे आणि कार्याध्यक्ष मुकुंद मराठे यांनी केले आहे.

Exit mobile version