सुप्रसिद्ध शास्त्रीय नृत्य गुरू पद्मविभूषण सोनल मानसिंग यांच्या हस्ते गायिका प्रभा यादव आणि चित्रकार चिंतामणी हसबनीस या दोघांना भरतमुनी सन्मान २०२५ प्रदान करण्यात आला. संस्कार भारतीच्या वतीने रविवार, १ फेब्रुवारीला गडकरी रंगायतन येथे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मानसिंह या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. व्यासपीठावर संस्कार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष व सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक मैसूर मंजुनाथ, संस्कार भारती अखिल भारतीय महामंत्री अश्विन दळवी, संस्कार भारती कोकण प्रांत अध्यक्ष-सुप्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान सादर झालेल्या दृष्टिबाधितांच्या चित्रवाचनाच्या प्रात्यक्षिकाने उपस्थित प्रत्येकाचेच डोळे पाणावले.
छत्तीसगडच्या वेदमती शैलीतील प्रख्यात पंडवांनी गायिका प्रभा यादव आणि पुण्यातील सुप्रसिद्ध चित्रकार चिंतामणी हसबनीस या दोघांना दीर्घकालीन कलासाधनेसाठी आणि त्या कलासाधनेला असलेल्या सामाजिक आयामासाठी ‘अखिल भारतीय भरतमुनि सन्मान २०२५’ने गौरवण्यात आले. स्मृतिचिह्न, प्रशस्तीपत्र आणि १,५१,००० रुपये रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या दिमाखदार पुरस्कार सोहळ्यास संस्कार भारती अखिल भारतीय संघटन मंत्री अभिजीत गोखले, ठाण्यातील आमदार निरंजन डावखरे, भारतीय स्त्री शक्तीच्या उपाध्यक्ष नयना सहस्रबुद्धे, अभिनेते प्रमोद पवार तसेच कला आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
सोनल मानसिंग यांनी आपल्या मनोगतात देशापुढील आव्हानांवर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, गेल्या काही वर्षांत समाजमाध्यमांमुळे माणसात निर्माण झालेली चंचलता दूर सारून स्थिर चित्त होण्यावर काम करण्याची गरज आहे.
हे ही वाचा:
गोवा विशेष : आदिवासींचा त्रास वाचवण्यासाठी कुशवती होणार नवा जिल्हा!
काँग्रेस मधील अंतर्गत गटबाजी पुन्हा उघड
ठाकूर-जायसवाल पुनरागमनाने मुंबई सज्ज!
“आत्मनिर्भर भारताचे स्वप्न वेगाने पूर्ण करणारा अर्थसंकल्प”
लोकव्यवहाराची पद्धत बदलली आहे. अशा काळात समरसतापूर्वक वर्तनाची प्रतिष्ठापना हे एक महत्त्वाचे कार्य आहे. सध्या देशात आव्हानात्मक काळ सुरू आहे. आज दक्षिणेतील सांस्कृतिक केंद्र मानली जाणारी राज्ये संस्कृतीविषयक आव्हानांना तोंड देत आहेत, पंजाबसारखा सुफल आणि ऐतिहासिक वारसा मिळालेला प्रदेश ही अमली पदार्थांच्या वर्चस्वाखाली आला आहे. त्यांना परदेशी शक्तींनी पाठबळ दिले आहे. सर्वत्र धर्मांधांनी रण माजवले आहे. तरीही आजवर अनेक साम्राज्ये आली, संकटे आली तरीही भारत दृढपणे कसा उभा आहे याचेच आश्चर्य अनेकांना वाटत आहे. पण, ज्या भूमीत आपण जन्मलो त्या संस्कृतीच्या रक्षणार्थ काम करण्याची आवश्यकता परत एकदा उत्पन्न झाली आहे. त्यासाठी नागरिकांनी संस्कार भारतीसारख्या संस्थांशी संलग्न होण्याची गरज आहे. कलांचा यथोचित सन्मान हा भारताला खऱ्या अर्थाने विश्वगुरू म्हणून प्रस्थापित करेल. संस्कार भारतीसारख्या संस्थांनी त्यासाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करावेत, असेही त्या म्हणाल्या. आज पद्मपुरस्कारात कलाकारांची संख्या कमी आहे, त्यात वाढ व्हावी त्याचप्रमाणे कलाकारांसाठी कोणतीही योजना नाही, त्या सुरू व्हाव्यात अशी अपेक्षाही त्यांनी या व्यासपीठावर व्यक्त केली.
या कार्यक्रमात मैसूर मंजुनाथ म्हणाले की, भरतमुनी सन्मान या पुरस्काराची देशभरात अत्यंत मानाचा पुरस्कार म्हणून गणना होऊ लागली आहे. कला आणि संस्कृती या दोन्ही आपल्या देशाचा आत्मा आहेत. संगीत, नृत्य याची स्वतःची वेगळी अभिव्यक्तीची भाषा आहे. जी मानवी संपर्काच्या भाषेच्या पलिकडची अनुभूती देते. माणसाच्या आत्म्याला स्पर्श करते. संस्कार भारतीच्या पुरस्काराच्या माध्यमातून या कलाप्रकारांचा यथोचित गौरव केला जातो याचे अपार कौतुक वाटते. अश्विन दळवी यांनी पुरस्कार सुरू करण्यामागील भूमिका, भरतमुनींच्या नावे हा पुरस्कार का सुरू केला गेला यामागील विचार आपल्या प्रास्ताविकात मांडला.
पंडवानी ही लोकगीतशैली अत्यंत आगळीवेगळी असून महाभारत व रामायणातील कथांना जिवंत ठेवण्याचे व लोकांमध्ये मनोरंजनाच्या माध्यमातून या रामायण महाभारत पोहचवण्याचे कार्य ज्या लोकगीत गायकांनी केले, त्यात प्रभा यादव हे नाव अग्रणी आहे. वेदमती शैलीतील पंडवानी गायिका प्रभा यादव यांनी आपला पुरस्कार अत्यंत नम्रपणे आपल्या गुरुंना समर्पित केला.
२०१२ पासून चिंतामणी हसबनीस हे दृष्टिबाधितांना या कलेचा आस्वाद घेता यावा, चित्रकलेसारख्या आस्वाद्य कलेपासून त्यांनी वंचित राहू नये यासाठी विशेष चित्र काढतात. चित्रावरच छापलेल्या ब्रेल लिपी मजकुराच्या आधारे व स्पर्शज्ञानातून ते या चित्ररसिकांना चित्रांच्या आस्वादाच्या अनुभूतीचा आनंद मिळवून देतात. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे प्रत्यक्ष दर्शन उपस्थितांना घेता आले. मंचावर एका मोठ्या चित्राचे एका दृष्टिबाधित मुलीने केलेल्या वाचनाचा डेमो उपस्थितांना पाहता आला. जे कायमसाठी या कलेला मुकले या कल्पनेत आपण असतो, अशा दृष्टिबाधितांनी केलेले चित्रवाचन पाहून उपस्थितांची आश्चर्य आणि आनंद अशी संमिश्र मनस्थिती झाली होती. या उपक्रमाबद्दलची आपली भूमिका हसबनीस यांनी या डेमोदरम्यान व्यक्त केली.
पुरस्कार सोहळ्याच्या प्रारंभी संस्कार भारती कोकण प्रांत(निर्मिती) व कलांकुर ठाणे(प्रस्तुती) यांच्या माध्यमातून भरतमुनींवरील नृत्यनाट्याचे व लोककलेच्या माध्यमातून ‘वंदे मातरम् १५०’चे अत्यंत आगळेवेगळे सादरीकरण करण्यात आले. तर कोकण प्रांत अध्यक्ष सुनील बर्वे यांनी आभार प्रदर्शन केले.
