सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथील ऐतिहासिक नागपंचमी उत्सवाला यंदा महत्त्वपूर्ण दिलासा मिळाला आहे. शिराळ्याच्या पारंपरिक नागपंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक आणि समाजप्रबोधनाच्या उद्देशाने ४१ ठिकाणी जिवंत नाग दाखवण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी २१ जणांना अशी परवानगी मिळाली होती. यंदा ही संख्या ४१ वर पोहोचल्याने शिराळ्यातील नागरिक आणि नागपंचमीशी जोडलेल्या मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
बत्तीस शिराळा हे देशभरात आपल्या आगळ्यावेगळ्या नागपंचमी उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवात नागाला धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विशेष स्थान आहे. मात्र, जिवंत नाग पकडणे, त्यांची पूजा करणे आणि मिरवणूक काढणे यावर २००२ पासून कायदेशीर निर्बंध असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हा पारंपरिक उत्सव पूर्वीच्या स्वरूपात साजरा करता आलेला नाही.
हे ही वाचा:
चमोलीतील बोगदा दुर्घटनेत मृतांचा आकडा ८ वर
अदानींचा ऊर्जा क्षेत्रात मोठा विस्तार; ₹८,५०० कोटींच्या प्रकल्पावर झेप
टीव्हीवरील जाहिरातींच्या मर्यादेला अखेर ब्रेक
ब्लिंकिट, झेप्टो , इन्स्टामार्टच्या केंद्रांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
गेल्या वर्षी तब्बल २३ वर्षांनंतर शिराळ्यात मर्यादित स्वरूपात जिवंत नागांचे दर्शन घडले होते. त्यावेळी २१ जणांना शैक्षणिक अभ्यास आणि समाजप्रबोधनाच्या उद्देशाने नाग पकडण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, या परवानगीसोबत नागांना कोणतीही इजा करणे, त्यांच्याकडून खेळ किंवा मनोरंजनाचे प्रकार करून घेणे तसेच व्यावसायिक वापर करणे यावर निर्बंध कायम ठेवण्यात आले होते. परवानगीच्या कालावधीनंतर नागांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे निर्देशही देण्यात आले होते.
यंदा ४१ ठिकाणी मिळालेली परवानगी ही शिराळ्याच्या पारंपरिक उत्सवासाठी महत्त्वाची मानली जात आहे. या माध्यमातून नागांविषयी वैज्ञानिक माहिती, सर्पसंवर्धन आणि जैवविविधतेचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे धार्मिक श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल राखत नागपंचमी साजरी करण्यावर भर राहणार आहे.
शिराळ्याची नागपंचमी ही केवळ धार्मिक परंपरा नसून या परिसराच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे जिवंत नाग दाखवण्यास मिळालेली मर्यादित परवानगी ही स्थानिकांसाठी भावनिकदृष्ट्याही महत्त्वाची ठरत आहे. मात्र, शासन आणि न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून नागांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागपंचमीचा उत्सव शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि वन्यजीव संरक्षणाच्या नियमांचे पालन करून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
