एलटीटीईच्या मार्गावर बलोच

एलटीटीईच्या मार्गावर बलोच

इराणचे काय होणार? या प्रश्नाचे उत्तर मिळण्यापूर्वी पाकिस्तानचे काय होणार? या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे. बलोचिस्तान लिबरेशन आर्मीने आता आपल्या नौदलाची घोषणा केली आहे. हम्मल मेरीटाईम डीफेन्स फोर्स असे त्याचे नामकरण कऱण्यात आले असून मंगळवारी सकाळी १० वाजता जिवनी भागातील मिल तियब येथे पाकिस्तानी कोस्टगार्ड्सला त्यांनी पहीला धक्का दिला आहे. तटरक्षक दलाच्या तीन जवानांना यमसदनी पाठवले आहे. बीएलएने नौदल उभारण्याची सुरूवात केली आहे, याचा अर्थ बलोच बंडखोरांकडे आता मोठी आर्थिक रसद आलेली आहे.

लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम या बंडखोर संघटनेच्या नौदल शाखेने श्रीलंकेत केलेल्या उत्पात आठवला तर बलोचांचे नौदल पाकिस्तानला किती जड जाऊ शकेल याची कल्पना येऊ शकते.

बलोचांचे नौदल पाकिस्तानसाठी दु:स्वप्न ठरण्याची शक्यता आहे. इराणने होर्मुज स्ट्रेटची नाकाबंदी करून जगावर संकट आणले. त्यासाठी फार मोठ्या नौदल शक्तीची इराणला गरज भासली नाही. फार खर्चही करावा लागला नाही. छोट्यामोठ्या स्पीड बोट आणि समुद्री सुरूंगांनी काम भागले. होर्मुजची नाकाबंदी करून इराणने जगाचे नाक दाबले आहे. इथून क्रिप्टो करन्सीमध्ये टोलवसुलीही सुरू केली आहे. अमेरिकेचे बलाढ्य नौदल त्यांचे काही वाकडे करू शकलेले नाही. हे स्वस्तातील युद्ध आहे.

कमी पैसा खर्च करून शत्रूला मोठा आर्थिक फटका देण्याची क्षमता या युद्धात आहे. युद्ध सुरू झाल्यापासून इराणचे झालेले नुकसान मोठे आहे. परंतु इराणही युद्धभूमी आहे. अमेरिका ही युद्धभूमी नसताना त्यांचे झालेले नुकसान मोजले तर स्वस्त युद्धाची उपद्रव क्षमता लक्षात येऊ शकेल. नौदलाच्या माध्यमातून बलोच हे करू शकतात. त्याची सुरूवात झालेली आहे.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार? पण ते म्हणतात तथ्य नाही!

लैंगिक छळ, खाजगी फोटो लीक करण्याच्या धमक्या

दिल्ली कोर्टाकडून मनी लॉन्डरिंग प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांना समन्स

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली; ४८ तासांच्या तणावानंतर जागतिक व्यापाराला दिलासा
पाकिस्तानचे अर्थकारण कधीही कोसळेल अशा स्थितीत आले आहे. बलोचांनी नौदलाचा प्रयोग प्रभावीपणे केला तर पाकिस्तानचे दोन्ही बाजूने नुकसान आहे. एक तर नौदलाच्या हल्ल्यामुळे त्यांच्या नौदल जहाजांचे आणि व्यापारी जहाजांचे नुकसान होणार. दुसऱ्या बाजूला बलोचांचा उपद्रव नियंत्रणात ठेवण्यासाठी पाकिस्तानला नौदलाच्या मजबूतीसाठी खर्च करावा लागणार. मुळात आहे ते टिकवून ठेवण्यासाठी होणारा खर्च पाकिस्तानला परवडणारा नसेल तर जादा खर्चासाठी पैसा आणणार कुठून ? पाकिस्तानचे देणेकरीही त्यांना भीक देऊन थकले आहेत. पाकिस्तानमध्ये चायना पाकिस्तान इकोनॉमिक कोरीडोअरसाठी मोठी गुंतवणूक कऱणाऱ्या चीननेही आता हात वर केलेले आहेत. त्यामुळे बलोचांचे समुद्री संकट पाकिस्तानला जड जाणार आहे.

जगात अनेक दहशतवादी संघटना आहेत. त्यापैकी अलकायदाने समुद्री हल्ले केले आहेत. इराणचे समर्थन असलेल्या हमास आणि हौती बंडखोरांकडे नौदलाची ताकद आहे. मूठभर ताकदीचा वापर करून हौती बंडखोरांनी लाल समुद्रात निर्माण केलेला उत्पात पाहिला तर त्यांची उपद्रव क्षमता लक्षात येऊ शकेल. होर्मुजमध्ये उपद्रव नंतर सुरू झाला. त्याची चाचपणी आधी लाल समुद्रात झाली. बलोच पाकिस्तानचे किती वाईट हाल करू शकतात हे यावरून लक्षात यावे.

एक दहशतवादी संघटना आणि एका देशाच्या सामर्थ्याची खरे तर तुलना नाही. परंतु नेतृत्व जर खणखणीत असेल तर एक दहशतवादी संघटना एखाद्या देशाला गुडघ्यावर आणू शकते हे लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलमचा नेता व्ही. प्रभाकरन याने दाखवून दिलेले आहे.

एलटीटीईकडे अत्यंत संघटीत असे गणवेशधारी नौदल होते. वेगवान बोटी होत्या, रडार यंत्रणा होती. छोटेखानी पाणबुड्याही होत्या. त्यांनी श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्व समुद्रावर वर्चस्व निर्माण केले होते. श्रीलंका नौदलाच्या अनेक जहाजांना त्यांनी जलसमाधी दिली होती, अनेक जहाजांचे नुकसान केले होते. मालवाहू जहाजे बुडवली होती. समुद्रात त्यांनी टोलवसूलीही सुरू केली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून बलोच चालू शकतात. त्या इतिहासाची पाकिस्तानात पुनरावृत्ती करू शकतात.

नौदल उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो. ज्या प्रकारची शस्त्रे बलोच बंडखोर वापरतात तशी शस्त्र पाकिस्तानी सैन्याकडेही नाहीत, अशी कबूली त्यांचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिलेली आहे. याचा अर्थ बलोचांना आर्थिक रसदीची चिंता नाही. विदेशी समर्थक किंवा समर्थक देशांकडून मदतीच्या स्वरुपात त्यांना मोठा पैसा मिळत असतोच. बलोचांनी स्वत:ची आर्थिक यंत्रणाही उभारली आहे. खंडणी आणि तस्करी हे त्यांचे पैशाचे मोठे स्त्रोत आहेत.

बलोचिस्तानात काम करणाऱ्या कंपन्यांकडून कंत्राटदारांकडून बलोच मोठ्या प्रमाणात खंडणी गोळा करतात. इराण सीमेवरून मोठ्या प्रमाणात तेलाची तस्करी आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरून शस्त्र आणि ड्रग्जच्या तस्करीमध्ये बलोच मोठ्या प्रमाणात सामील आहेत. यातून मिळणारा पैसा मोठा असतो त्यामुळे छोटेखानी नौदल उभारणे हा त्यांच्यासाठी फार जड विषय नाही.

कराची आणि ग्वादर हे दोन बंदरे पाकिस्तानकडे आहेत. यापैकी ग्वादर बंदर बलोचांच्या रडारवर आहेच कारण ते बलोचिस्तानमध्ये आहे. चायना पाकिस्तान इकोनॉमिक कोरीडोअरचा हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. इथे यापूर्वी बलोचांनी मोठे हल्ले केलेले आहेत. कराची आणि ग्वादर बंदरावर येजा करणाऱ्या मालवाहू जहाजांना बलोचांनी लक्ष्य केले तरी पाकिस्तानला मोठा फटका बसू शकतो.

बलोचिस्तानला लाभलेली किनारपट्टी सुमारे ७७० किमीची आहे. याला मकरान किनारपट्टीही म्हणतात. कराचीतील हब नदीपासून इराणच्या ग्वादरच्या खाडीपर्यंत याचा विस्तार आहे. कराची हे पाकिस्तानातील महत्वाचे बंदर आहे. ते सिंध प्रांतात येते. पाकिस्तानचा ९० टक्के व्यापार कराची बंदरातून होतो. बलोचिस्तानातील असलेले ग्वादर बंदर चीनच्या दृष्टीने महत्वाचे. होर्मुजपासून अगदी जवळ आहे. त्यामुळे सामरिक आणि व्यापारीदृष्ट्या हे खूप महत्वाचे आहे. ग्वादर बंदर हे खोल पाण्याचे बंदर आहे. चायना पाकिस्तान इकोनॉमिक कोरीडोअरचा हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. हे बंदर भारतापासून अवघ्या ४५० किमी अंतरावर आहे. चीनला या बंदराचा वापर करून आखाती देश आणि होर्मुजवर रडारद्वारे लक्ष ठेवणे शक्य आहे.

पाकिस्तानी लष्करावर एक मोठा हल्ला करण्यासाठी जेवढे नियोजन, मेहनत आणि साधने लागतात त्यातुलनेत स्पीड बोटीत स्फोटके लादून एखाद्या मालवाहू जहाजाला धडक देणे खूप सोपे आहे. त्यातून होणारे नुकसान काही बड्या हल्लांच्या बरोबरीचे असेल.

बलोचांनी आपेल उद्दीष्टही स्पष्ट केले आहे. बलोचिस्तानच्या सागरी सीमांवर असलेला पाकिस्तानचा ताबा त्यांना संपवायचा आहे. याचा अर्थ व्यापक आहे. इथला व्यापार त्यांना नियंत्रित करायचा आहे.

मकरान किनारपट्टीचा भुगोल खडतर आहे. बराच भाग खडकाळ आहे, निर्जन आहे. अनेक छोट्या खाड्या असल्यामुळे लपण्याची ठिकाणे बरीच आहेत. समुद्री गनिमीकाव्यासाठी अत्यंत उपयुक्त. हल्ला करून परतलेल्या छोट्या बोटी इथे सहज लपवता येउ शकतील. काही भाग इतके दुर्गम आहे की रडारच्याही टप्प्यात येणार नाहीत. त्यामुळे इथे टेहळणी करणे सोपे नाही.

बलोचांनी इथे टोलवसुली सुरू केली किंवा हल्ले केले तर ते रोखणे पाकिस्तानला जड जाणार आहे. त्याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे त्यासाठी लागणारी साधने, मनुष्यबळ यांचा पाकिस्तानमध्ये सध्या तुटवडा आहे. पाकिस्तानला आपल्या नौदलाला, तटरक्षक दलाला मजबूती द्यावी लागेल. त्यासाठी पैसा खर्च करावा लागेल. जो सध्या पाकिस्तानकडे नाही. अलिकडे पाकिस्तानला भिक मिळायचीही बंद झाली आहे. त्यामुळे बलोचांचे हे नवे आव्हान पाकिस्तानसाठी दुष्काळात तेरावा महिना ठरण्याची शक्यता आहे.

सध्या बलोच जमीनीवरून जेवढे घातक हल्ले करतायत तेवढे जर समुद्रावरून सुरू झाले तर पाकिस्तानला पळताभूई थोडी होईल. व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्यात आले तर पाकिस्तानचे अर्थकारण भुईसपाट व्हायला वेळ लागणार नाही.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version