भारताबाबत हे भाकीत तर बाबा वेंगा पेक्षा भारी…

या लढाईत विरोधी पक्ष सोबत नसला तरी जनता मात्र मोदींच्या सोबत आहे.

भारताबाबत हे भाकीत तर बाबा वेंगा पेक्षा भारी…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आधी लादलेल्या २५ टक्के टेरीफवर आणखी २५ टक्के टेरीफ जाहीर केले आहे. ट्रम्प धमकीची घोषणा करतात. एक धमकी संपते न संपते तोवर दुसऱ्या धमकीचे सुतोवाच  करतात. म्हणजे एकता कपूरच्या सिरीयल सारखे. एपिसोड संपवताना शेवटी नवा ट्वीस्ट, जो प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरतो. ट्रम्प यांच्या व्यापार आणि परराष्ट्र धोरणातील उड्यांचे गुपित कोणाला उलगडत नाही. त्यांच्या अस्वस्थतेचे कारणही कळत नाही. कदाचित त्यांना शंभर वर्षांपूवीचे एक व्यंगचित्र छळते आहे. जे एका कम्युनिस्ट व्यंगचित्रकाराने काढले होते.

रॉबर्ट बर्कले उर्फ बॉब माइनर  हे एक प्रसिद्ध अमेरिकन राजकीय व्यंगचित्रकार, पत्रकार आणि अमेरिकेतील कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख सदस्य होते. त्यांचा जन्म १८८४ मध्ये सॅन अँटोनियो, टेक्सास येथे झाला. आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी एक सामान्य वृत्तपत्र कर्मचारी म्हणून केली. लवकरच ते एक प्रतिभावान व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये ते भांडवलशाही आणि साम्राज्यवादावर टीका करत असत.

१९२५ साली बॉब माइनर यांनी काढलेले एक व्यंगचित्र खूपच चर्चेत आहे. या व्यंगचित्रात, त्यांनी भविष्यात जागतिक सत्ता समीकरणात होणाऱ्या बदलांचे भाकीत केले होते. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स यांसारख्या पाश्चिमात्य राष्ट्रांकडे ‘पैसा’ आणि ‘बंदुका’ (शस्त्रे) आहेत, ज्यांच्या जोरावर त्यांनी जगभरात आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. भविष्यात हे चित्र १८० अंशाच्या कोनात बदलेले असे त्यांनी भाकीत केले होते.

त्यांच्या व्यंगचित्रात भारत, चीन आणि आफ्रिकेसारखे विशाल देश अर्धजागृत अवस्थेत दाखवले होते. प्रचंड मनुष्यबळाच्या आधारावर आज पाश्चिमात्य शक्तींच्या गुलामगिरीत असलेले हे देश भविष्यात जागृत होतील तेव्हा जगातील सत्ता संतुलन बदलेल. असा विश्वास व्यक्त करणारे शंभर वर्षांपूर्वीचे हे व्यंगचित्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे, ते ट्रम्प यांच्या टेरीफ नीतीमुळे.

शंभर वर्षांनंतर मायनर खरे ठरलेले आहेत. हे भाकीत एका भविष्यवेत्याचे नाही. भविष्यातील घडामोडी पाहू शकणाऱ्या बाबा वेंगा यांच्या भाकीतांची जगभरात चर्चा असते. परंतु एका व्यंगचित्रकाराच्या प्रतिभेला शंभरवर्षांपूर्वी हे पाहाता आले, ही खूपच विशेष बाब असते. ट्रम्प यांना चीनची असलेली भीती जगजाहीर आहे. भारताशी अमेरिकेची जवळीक याच भीतीतून झाली. गेली अनेक वर्षे भारत आणि अमेरिकेत ही सामरीक भागीदारी निर्माण व्हावी म्हणून दोन्ही बाजूंनी प्रयत्न झाले. अनेक मुत्सद्यांनी यासाठी आपली बौद्धिक शक्ती खर्च केली. अमेरिकेच्या जागतिक वर्चस्वाला चीनचा धोका असल्याचे अहवाल पेंटॅग़ॉनसह अमेरिकेच्या अनेक थिंकटॅंकनी जाहीर केलेले आहे. त्यातून भारताचे महत्व अमेरिकेच्या लक्षात आले.

हे ही वाचा:

‘हा युवा भारत आहे, झुकत नाही’

कॅन्सरसारख्या रोगांपासून संरक्षण देणारी सुंठ !

चीनवर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घाई नाही

उपराष्ट्रपती निवडणुक : अधिसूचना जारी

भारताच्या माध्यमातून चीनचा काटा ढिला करण्याची रणनीती अमेरिकेने तयार केली. क्वाड्रीलॅटरल सेक्युरीटी ग्रुपची स्थापनाही याच प्रेरणेतून झाली. आशियात चीनच्या वर्चस्वाला जर कोण मोडून काढू शकत असेल तर तो भारतच आहे, यावर अमेरिकी संरक्षण तज्ज्ञांचे कायम एकमत होते. त्यात समस्या एवढीच होती की भारत हा पाकिस्तान नाही. पाकिस्तानसमोर हाडूक फेकले आणि त्याला छू म्हटले तर पाकिस्तान कोणावरही भूंकू लागतो. चावायला धावतो, तसे भारताचे नाही. भारताची धोरणे भारताच्या राष्ट्रीय गरजेनुसार आकार घेतात. त्यामुळे भारताने चीनबाबत सावधपणाचे धोरण अवलंबिले, परंतु भारत तेवढाच सावध अमेरिकेबाबत होता. कारण अमेरिकेची धरसोड भारताला माहित होती. टू बी एनिमी ऑफ अमेरिका कॅन बी  डेंजरस, बट टू बी फ्रेण्ड इज इज फेटल ही अमेरिकेची नीती भारताला ठाऊक होती. त्यामुळे भारत अमेरिकेसोबत राहिला, परंतु त्यांच्या नादी लागला नाही. भारताने योग्य तेच केले. कालपर्यंत मोदी आणि भारताचे गोडवे गाताना न थकणाऱ्या ट्रम्प यांना भारतही चीनप्रमाणे धोकादायक वाटू लागला आहे.

२००१ त २००६ या काळात भारतात फायनान्शिअर टाईम्सचे ब्युरो चीफ राहीलेले एडवर्ड ल्यूस हे नामांकीत आर्थिक विश्लेषक आहेत. ते असे म्हणाले की, ‘इंडिया इज न्यू चायना इन ट्रम्प्स ट्रेड वॉर लॉजिक, द न्यू कम्पिटीटर स्टीलिंग अमेरिकाज जॉब.’

अर्थतज्ज्ञ जेफ्री सॅक्स म्हणाले होते. ‘ट्रम्प यांना कोणी तरी टार्गेट हवेच असते, आधी चीन होता, आता भारत आहे.’ जेफ्री जे म्हणाले होते, तेच वेगळ्या शब्दात एडवर्ड ल्यूस यांनी सांगितले आहे.

ट्रम्प जगभरातील देशांसोबत जे करतायत, त्याला अमेरिकी राजकारणाची किनार आहे. निवडणूक काळात ट्रम्प यांनी दिलेली आश्वासने त्यांना पूर्ण करता आली नाही. ना ते रशिया युक्रेन थांबवू शकले, ना अर्थकारण रुळावर आणू शकले. टेरीफ युद्धामुळे जगाला चटके बसतायत. अमेरिकी कंपन्याही त्याला अपवाद नाहीत. ट्रम्प यांना हे सगळे माहिती आहे. अमेरिकेत एक असा मोठा गट आहे, जो भारतीयांना अमेरिकेत मिळणाऱ्या नोकऱ्यांमुळे, त्यांच्या प्रगतीमुळे अस्वस्थ असतो. त्यांना तिथले भारतीय उपरे वाटतात. गुगल, मेटा अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यांना भारताचा ६ टक्के डीजिटल टॅक्स जाचक वाटतो. या कंपन्यांनी ट्रम्प यांच्या निवडणुकीसाठी भरभरून पैसा दिलेला आहे. हा कर कमी करण्यासाठी त्यांचा ट्रम्प यांच्यावर दबाव आहे. या सगळ्यांना खूष करण्यासाठी ट्रम्प भारतविरोधी भूमिका घेत आहेत.

भारत हा ट्रम्प यांच्यासाठी चीनसारखाच धोका झाला आहे, हे एडवर्ड यांचे म्हणणे योग्यच आहे. हेच बॉब मायनर यांनी १९२५ मध्ये त्या व्यंगचित्रातून सांगितले होते. भारत, आफ्रिका आणि चीन हे सगळे देश ब्रिक्सच्या मंचावर एकत्र आले आहेत. ट्रम्प यांनी ब्रिक्सची किती भीती वाटते आहे, ही बाब सर्वश्रुत आहे. ब्रिक्सची ही भक्कम एकजूट फोडण्यासाठी त्यांनी ब्रिक्स देशांवर १० टक्के टेरीफ लादण्याची घोषणा केली होती. ब्रिक्स गटामुळे ट्रम्प यांना घाम फुटणे स्वाभाविक आहे. हा गट म्हणजे जगाची ५५ टक्के लोकसंख्या आणि ३६ टक्के जीडीपी आहे. हे देश एकत्र येणे आणि मजबूतीने उभे राहणे म्हणजे अमेरिका आणि युरोपच्या वर्चस्वाची मृत्यू घंटा. या देशांचे एकत्र येणे, त्यांचा समन्वय सोपा नव्हता. विशेष करून चीनचा विस्तारवाद, भारत आणि चीनमध्ये असलेले पराकोटीचे वाद यामुळे ब्रिक्सची वाटचाल सोपी नव्हती. परंतु ट्रम्प यांनी महत्प्रयासाने हे चित्र बदलले. त्यांच्या कृपेमुळे चीन, भारत, रशिया एकत्र येऊन RICH हा नवा गट स्थापन करतील अशी शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परिषदेसाठी जाणार आहेत. तिथेच मोदी, शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादमीर पुतीन एका छता खाली येतील आणि ट्रम्प यांचा बंदोबस्त करण्यासाठी काही व्यूहरचना करतील अशी शक्यता आहे.

भारताला दमबाजी केली की मोदी दाती तृण धरून येतील आणि तडजोड करतील अशी ट्रम्प यांना आशा होती. मोदी असे काही करताना दिसत नाहीत. ते ठामपणे सांगतायत, कृषी आणि लघुउद्योगाबाबत कोणतीही तडजोड आम्ही स्वीकारणार नाही. कदाचित याची खूप मोठी किंमत मला चुकवावी लागेल, परंतु मी त्यासाठी तयार आहे. मोदी म्हणतायत ती किंमत राजकीय आहे. ट्रम्प यांच्या टेरीफ धोरणामुळे जर भारताचे नुकसान झाले तर ही भारताची लढाई आहे, एकत्र लढूया, अशी भावना व्यक्त न करता, विरोधक त्याचा फायदा उठवतील, असे मोदी सूचित करतायत. देशाचे नाक वाचवायचे कि अर्थकारण असा पेच त्यांच्या समोर आहे. मोदी दोन्ही वाचवतील असा विश्वास देशावासियांना आहे. या लढाईत विरोधी पक्ष सोबत नसला तरी जनता मात्र मोदींच्या सोबत आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version