काँग्रेस नेते राहुल गांधी यांची निवडणूक आयोगाला धमकावणारी पत्रकार परिषद झाली. इंडिया आघाडीतील घटक पक्षांसाठी रात्री स्नेह भोजनही झाले. काँग्रेसने या स्नेहभोजनानिमित्त कोणती खिचडी शिजवली आणि घटक पक्षांच्या ताटात नेमके काय वाढले, हे जाणून घेण्याची गरज आहे. छाती ठोकून दावे करायचे, ते सतत उगाळत राहायचे आणि नंतर गुपचूप जाऊन न्यायालयात नाक रगडायचे, राहुल गांधींचे इथपर्यंत ठीक होते. परंतु आता त्याही पुढे जाऊन कुऱ्हाडीवर पाय मारून घेण्याचे प्रयोग ते करत आहेत. या कुऱ्हाडीला असलेल्या धारीची त्यांना बहुधा कल्पना नाही.
आधी निवडणूक आयोगाच्या तथाकथित भानगडींवर राहुल गांधींचे शरसंधान तर सुरू आहे. परंतु एकही शर निशाण्यावर लागताना दिसत नाही. आधी वर्तमान पत्रात लेख लिहिला. देवेंद्र फडणवीसांकडून त्याचे उत्तर मिळाल्यानंतर काही काळ तसाच गेला. त्यानंतर तेच मुद्दे घेऊन ताजी पत्रकार परिषद घेतली, तोच विषय पुन्हा इंडिया आघाडीतील सदस्यांसमोर मांडण्यात आला. राहुल गांधी यांच्या त्या न फुटलेल्या ॲटम बॉम्बची चर्चा यापूर्वी न्यूज डंकावर आम्ही केलेली आहे. मुद्दा तो नाही. त्यांच्या आरोपांना निवडणूक आयोगाने जे उत्तर दिले आणि त्या उपर जाऊन आव्हान दिले त्याची चर्चा करण्याची गरज आहे. हे जे दस्तेवज राहुल गांधी त्या पत्रकार परिषदेत फडफडवत होते, त्यांचे प्रमाणिकरण करून तुम्ही आम्हाला सादर करा, असे निवडणूक आय़ोगाने सांगितल्यावर राहुल गांधी म्हणाले, ‘हे मी जाहीरपणे सांगतोय, हेच ऑथेंटिकेशन समजा.’ त्यांना ‘अहम् ब्रह्मास्मी’चा बोध झालेला दिसतो, टपोरी भाषेत याला, ‘साला अपूनीच भगवान है’ असे म्हणतात. त्यामुळे मी बोलतो ते ब्रह्म वाक्य आहे, असे राहुल गांधींना वाटू शकते. परंतु तसे इतरांनाही वाटले पाहिजे.
असे बोलणे ही त्यांची मजबूरी आहे. प्रमाणिकृत करून ते पायावर धोंडा कसा पाडून घेतील? एखादी गोष्ट बोलणे आणि ती प्रमाणिकृत किंवा सत्यापित करून बोलणे यात फरक आहे. यूट्युबवर असे अनेक व्हिडीओ आहेत, त्यात दावा केला जातो की, नेहरु-गांधी कुटुंबाचा पूर्वज हा मुघलांचा कोतवाल होता. तो मुस्लीम होता. जोपर्यंत तुमच्याकडे पुरावे नाहीत, तोपर्यंत अशा बडबडीला गावगप्पा म्हणतात. अशा गावगप्पा मारल्याबद्दल राहुल गांधी यांनी आजवर तीन प्रकरणात नाक रगडून न्यायालयाची माफी मागितली आहे. परंतु निवडणूक आयोग तर त्यांना तुरुंगाचा दरवाजा दाखवून घाबरतो आहे. ते प्रमाणिकृत दस्तेवज मागतायत. कारण तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट प्रमाणिकृत करून देता तेव्हा ते सत्य आहे, याची तुम्ही जबाबदारी घेता. ही गोष्ट जर असत्य निघाली तर तुम्हाला लोकप्रतिनिधी कायद्याच्या अंतर्गत तुरुंगवास होऊ शकतो. दंड होऊ शकतो. भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत खोटे शपथपत्र दाखल केल्या प्रकरणी कलम २२७ अंतर्गत ३ वर्षे कैद आणि दंड होऊ शकतो. तुमच्या दाव्यामुळे एखाद्या निर्दोष व्यक्तिला जर शिक्षा होणार असेल तर ही कैद ७ वर्षांची असू शकते. निवडणूक आयोग तुमच्यावर निवडणूक लढवण्यास बंदी आणू शकतो. आधीच ज्या पंतप्रधान पदाची आस ते वर्षोनुवर्षे बाळगून आहेत, ते टप्प्यात नाही. हाती आलेले विरोधी पक्षनेते ते पद कशाला गमावतील?
हे राहुल गांधी यांना ठाऊक आहे. त्यामुळे ते प्रमाणिकृत दस्तेवज सादर करणार नाहीत. आधीच त्यांच्यासाठी नॅशनल हेराल्ड, ब्रिटिश नागरीकत्व, अशा अनेक प्रकरणांचे खड्डे खणलेलेच आहेत. आणखी एक खड्डा आपल्या हाताने खणण्याचे काम ते करणार नाहीत. त्यामुळे पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी जी खिचडी शिजवण्याचा प्रय़त्न केला तरी ती शिजणार नाही. परंतु तीच अर्धी कच्ची खिचडी त्यांनी इंडिया आघाडीच्या सदस्यांसमोर वाढली.
२०१४ मध्ये काँग्रेसने केंद्रातील सत्ता गमावली. त्यानंतर आज ११ वर्षांचा काळ लोटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी न होता वाढतेच आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसने मात्र लोकप्रियतेचा तळ गाठलेला आहे. त्यामुळे काँग्रेसला स्वबळावर सत्ता आणण्याची खात्री नाही. कसे तरी यूपीए सारखे कडबोळे बनवायचे आणि राहुल गांधी यांना घोड्यावर बसवायचे असे प्रयत्न सुरू आहेत. अर्थात ही काँग्रेसची रणनीती आहे. बाकी पक्षांचा त्याला पाठिंबा असण्याचे काही कारण नाही.
महाराष्ट्र निवडणुकातील पराभवानंतर इंडिया आघाडी थंड्या बस्त्यात गेली होती. ते पुन्हा एकत्र आले कारण त्यांना विशेष करून काँग्रेसला एक आशेचा किरण दिसू लागला आहे. हा किरण आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा वेडाचार. ट्रम्प भारताच्या अर्थकारणावर आघात करत आहेत. कदाचित भारतामध्ये त्यांना भविष्यातले स्पर्धक दिसू लागला आहे. भारतासोबत व्यापार करार कऱण्यासाठी ट्रम्प भारतावर दबाव आणत आहेत. काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांना असे वाटते आहे की मोदी कात्रीत सापडले आहेत. कारण ट्रम्प यांच्या अटी मान्य केल्या तर मोदी कमजोर आहेत, त्यांनी देशहिताशी तडजोड केली असा बोभाटा करायला राहुल गांधी मोकळे. असे होण्याची शक्यता अजिबात नाही. मोदींनी ऐकले नाही, तर ट्रम्प भारताचे अर्थकारण बुडवण्याचा प्रयत्न करणार. दोन्ही परिस्थितीचा फायदा घेणे शक्य आहे. त्यामुळे हीच ती वेळ हाच तो क्षण असे राहुल गांधी यांना वाटले तर त्यात नवल ते काय. एरव्ही अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांचे पक्ष इंडिया आघाडीशी फटकून वागत असतात. परंतु दिल्लीची सत्ता गमावल्यानंतर बुडणारे केजरीवाल काडीच्या शोधात आहेत. ममता बॅनर्जी यांच्यासमोर २०२६ च्या मार्च-एप्रिलमध्ये विधानसभा निवडणुकीचे आव्हान आहे. त्यामुळे उगाच कशाला काँग्रेसला दुखवा असा विचार करून या बैठकीला भगवंत मान आणि डेरेक ओब्रायन हजर होते. ओमर अब्दुल्लाही हजर होते. हे सगळे पक्ष जेवणावळी किंवा बैठकांपुरतेच एकत्र येतात. निवडणुकीत जमेल तेवढे काँग्रेसला ठोकतात, हा अनुभव असून सुद्धा त्यांना एकत्र करण्यासाठी काँग्रेस नेते वारंवार पुढाकार घेत असतात. एकत्र बसून जेवायला काहीच हरकत नाही, निवडणूक आल्यावर बघू, असा विचार हे घटक पक्षही करत असतील. त्यामुळे जेवण्यासाठी त्यांचीही ना नसते. या बैठकीत उबाठा गटाला मानाचे पान मिळाले नाही, त्यांना मागील रांगेत बसवले अशी ओरड भाजपावाले करत आहेत. त्यांना दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालण्याची काहीच गरज नाही. मोदींना समर्थ पर्याय देण्याची जबाबदारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खांद्यावर घेतली आहे. ती पार पाडण्यासाठी ते कोणत्याही अपमानाचे हलाहल प्यायला तयार आहेत. मागील रांगेत बसणे, अगदी पक्षाचे बस्तानही न बसलेल्या कमलहासनच्या मागे बसणे या सगळ्या क्षुल्लक गोष्टी आहेत.
ट्रम्प आणि मोदी यांच्यातील समीकरण असे काही बिनसले आहे की, काँग्रेसच्या मनात आशा निर्माण झाली आहे. ज्यो बायडन यांच्या कार्यकाळात राहुल गांधी व्हाईट हाऊसमध्ये गोपनीय गाठीभेटी करून आले होते. ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या आशा पार मावळल्या होत्या. परंतु ट्रम्प यांच्या कृपेनेच आशेच्या नव्या लाटा त्यांच्या मनात उचंबळल्या आहेत. मोदींना हटवण्यासाठी एखादा नवा जॉर्ज सोरोस मिळतोय का या प्रतीक्षेत राहुल गांधी असू शकतात.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
