चीनमध्ये चांदी $१०० पार दर कडाडण्यामागे भारताचाही हात

चीनमध्ये चांदी $१०० पार दर कडाडण्यामागे भारताचाही हात

१६ जानेवारी २०२६ रोजी पहाटे वर्ल्ड सिल्व्हर सर्वेचा डेटा आला. यातून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. २०२५ मध्ये भारताने जागतिक बाजारातून ६२४७ मे.टन चांदीची आयात केली. औंसाच्या प्रमाणात सांगायचे तर २० कोटी औस. म्हणजे जागतिक बुलियन मार्केटमध्ये गेल्या वर्षी चांदीची जी विक्री झाली त्याच्या सुमारे २० ते २५ टक्के चांदी भारताने विकत घेतली. जगात चांदीच्या शुद्धीकरणाबाबत चीनचा क्रमांक एक आहे, तर भारत हा जगातील चांदीचा सगळ्यात मोठा खरीददार बनला आहे. चीनच्या शांघाय एक्सचेंजमध्ये चांदीची किंमत $१०० प्रति औस झाली आहे. भारतात चांदी प्रति किलो ३ लाखाच्या दारावर उभी आहे.

चांदीच्या चढ्या दराच्या कारणांची आतापर्यंत बरीच चर्चा झाली आहे. मागणी जास्त पुरवठा कमी, औद्योगिक वापर वाढला आहे. महत्वाची बाब म्हणजे चांदीचा भुगर्भातील साठा मर्यादीत असला तरी येत्या काळात ईव्ही, सोलार, संरक्षण सामुग्री, उपग्रह, आदीसाठी चांदीचा वापर वाढत जाणार. येत्या काळात चांदीशिवाय पान हलणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर जगातील सगळेच देश चांदी ताब्यात घेण्यासाठी कामाला लागले. अमेरिकेने सुरूवात केली. चांदीचा समावेश रेअर मिनरल्सच्या यादीत केला. चीनने १ जानेवारीपासून चांदीच्या निर्यातीवर कठोर निर्बंध आणले आहेत. भारतात अत्यंत मर्यादीत प्रमाणात चांदीचे उत्पादन होते असले तरी हे प्रमाण अगदीच फुटकळ आहे. आपण आजही मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून आहोत.

चीन आणि अमेरिकेत चांदीवरून रस्सीखेच सुरू झालेली आहे. त्यामुळे भारताने आक्रमकपणे चांदीची खरेदी केली आहे. जेणे करून येत्या काळात आपल्या उद्योगांना चांदी कमी पडू नये. २०२६ मध्येही हा ट्रेंड कायम राहणार आहे.

चीनच्या शांघाय एक्सचेंजमध्ये चांदीचा भाव अमेरिकेच्या कोमेक्स आणि युकेमधील लंडन बुलियन एक्सचेंजच्या तुलनेत जास्त आहे. मागणीनुसार शांघायचा भाव या दोन्हीच्या तुलनेत ३ ते ८ डॉलर चढा असतो. कारण शांघायमध्ये चांदीची खरेदी विक्री केल्यानंतर प्रत्यक्षात माल दिला घेतला जातो. कोमेक्स आणि लंडन बुलियन एक्सचेंजमध्ये मात्र व्यवहार मोठ्या प्रमाणात कागदावर होतात. सप्टेंबर २०२५ च्या दरम्यान चांदीचे भाव ५५ डॉलर प्रति औंसच्या आसपास होते. आज ते जागतिक बाजारात $ ९१-९२ असून भारतीय बाजारात २ लाख ९५ हजार प्रति किलो झालेले आहेत.

दर वर्षी चांदीची मागणी आणि पुरवठा यात सध्या सुमारे १८० दशलक्ष औसचा फरक आहे. हा तुटवडा कायम राहीला तर चांदीचे भाव येत्या काळात चढे राहणार ते $ १०५ ते $११५ पर्यंत वधारतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्या लोकांनी स्वस्तात चांदी विकत घेतली आहे, ज्यांना खूप चांगला फायदा झाला आहे, अशांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली तर काही प्रमाणात भाव घसरतील. परंतु दीर्घ कालावधीचा विचार केला तर चांदीची चढती कमान कायम राहण्याची शक्यता आहे. तीन लाखांचा टप्पा गाठायला २०२६ चा डिसेंबर महिना उजाडावा लागेल असे चित्र तीन ते चार महिन्यांपूर्वी होते. हे लक्ष पहील्या महिन्यातच गाठले गेल्याचे दिसते आहे. आता लोक ४ लाखांपर्यंतची चर्चा करतायत.

१ जानेवारी २०२५ रोजी चांदीचा दर प्रति किलो ९० हजार होता. १ जानेवारी २०२६ रोजी हा दर २ लाख ३४ हजार रुपये प्रति किलो झाला. १७ जानेवारी रोजी हा दर २ लाख ९५ हजार रुपये प्रति किलो आहे. १७ दिवसात दरात सुमारे ६० हजार रुपये प्रति किलोची भर पडली.

रिच डॅड पुअर डॅडचे लेखक रॉबर्ट कियोसाकी याने एका ताजी पोस्ट करत गुंतवणूकदारांना सचेत केले आहे की चांदीच्या दरांमध्ये विक्रीच्या दबावामुळे अल्पकाळ घसरण शक्य आहे. त्यामुळे ज्यांनी चढ्या दराने खरेदी केली आहे, त्यांनी सावधान राहण्याची गरज आहे. चढ उतार होत राहीले तरी दीर्घकाळात हे दर वाढणारच आहेत. कारण मागणीच्या तुलनेत पुरवठा नाही. पुरवठा वाढण्याची शक्यता नाही. मागणी मात्र वाढतच राहणार ही बाब निश्चित. हे तेच किओसाकी आहेत, ज्यांनी दीर्घ काळात चांदीचे दर $५०० प्रति औस पर्यंत जातील अशी शक्यता वर्तवली होती.

चांदीचे चढे दराचे परीणाम अर्थकारणावर होऊ नयेत म्हणून भारत इतक्या चढ्या दराने चांदीची खरेदी करतो आहे. फक्त २०२५ नाही तर २०२४ मध्येही भारताने ७ हजार मे.टन चांदीची खरेदी केली होती. म्हणजे २०२५ मध्ये तसे पाहाल तर आपण २५० मे.टन चांदी कमी खरेदी केली आहे. परंतु सलग दोन वर्षे आपण बाजारात एकूण जी निर्मिती आहे, त्यातुलनेत २० ते २५ टक्के चांदीची खरेदी करीत आहोत.

हे ही वाचा:

ग्रीनलँडवरून अमेरिका – युरोप आमनेसामने

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ

भारताकडून ११४ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीला मोठी मंजुरी

उत्पादन आणि डीपटेकवर लक्ष द्या

ही खरेदी म्हणजे साठेबाजी नाही. आपल्या उद्योगांची काळजी घेण्यासाठी चांदी मोठ्या प्रमाणात आयात केली जात आहे. वाहन निर्मिती क्षेत्रातील भारतातील प्रत्येक बडी कंपनी ईव्ही कारची निर्मितीत सहभागी झालेली आहे. ईव्ही कारच्या बॅटरीसाठी मोठ्या प्रमाणात चांदी लागते. आपण मोठ्या प्रमाणात सोलार पॅनलची निर्मितीही करीत आहोत. क्षेपणास्त्र, रडार, उपग्रहांच्या निर्मितीसाठी तुम्हाला चांदी लागते. चांदीचा तुटवडा निर्माण झाल्यास हे सगळे ठप्प होणार आहे. चीन आणि अमेरिकेने ज्या प्रकारे चांदीची साठेबाजी सुरू केली आहे, ते पाहाता भारताने सतर्क होऊन चांदीची मोठ्या प्रमाणात आयात सुरू केली आहे. भारत २०१४ पर्यंत चीनकडून एकूण गरजेच्या २५ टक्के चांदी आय़ात करत होता. आज हे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत गेले आहे. चीनचे आणि भारताच्या दरम्यान असलेले प्रेम संबंध पाहील्यास भारतासाठी हे किती धोकादायक आहे हे आपल्या लक्षात येऊ शकेल.

टेस्लाचे सर्वेसर्वा इलॉन मस्क याने चांदीच्या चढ्या दराबाबत चिंता व्यक्त केली आहे. चांदीच्या दरामुळे अनेक कंपन्यांचे अर्थकारण बदलेले आहे. अनेक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. त्या हाताबाहेर जातील अशी शक्यता आहे. अनेक अमेरिकी कंपन्या आता बुलियन एक्सचेंजमधून चांदी खरेदी न करता थेट खाण कंपन्यांशी करार करत आहेत. त्यामुळे चांदी बाजारात न येता थेट त्या कंपन्यांच्या गोदामात जात आहे.

चांदीच्या चढ्या दराचा थेट चांदीमध्ये किंवा इटीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगलाच फायदा झाला आहे. एका वर्षात इटीएफच्या गुंतवणुकीवर मिळालेला परतावा १८८ टक्के आहे. २०२५ च्या पहील्या आठवड्यात इटीएफ फंडांनी ९५ दशलक्ष औंस चांदीची खरेदी केली. एकूणच चांदीची जी चमक २०२५ मध्ये पाहायला मिळाली ती २०२६ मध्येही कायम राहील. चांदीच्या चढ्या किंमतीमुळे उद्योगांवर काही परीणाम होऊ नये, चांदी अभावी उद्योगांचे काम ठप्प होऊ नये या दिशेने सरकार काम करताना दिसते आहे. भारत सरकार थेट चांदीची खरेदी करत नसले तरी धोरणे बनवून खरेदी विक्रीला दिशा देण्याचे काम सरकार करत असते. चांदीची चमक येत्या काळात किती जणांना तारते आणि मारते हे पाहणे औत्सुक्याचे राहील.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version