व्हाईट हाऊसचे वाणिज्य सल्लागार पीटर नावारो यांच्या ताज्या विधानामुळे अमेरिकेच्या राजकारणाचे किती पोतेरे झाले आहे, हे लक्षात येते. भारताकडून होणाऱ्या रशियन तेलाच्या खरेदीमुळे फक्त ब्राह्मणांचे उखळ पांढरे होत असल्याचा दावा नावारो यांनी केला आहे. जातीचे राजकारणाचे अमेरिकीकरण झाले की अमेरिकेच्या राजकारणाचे भारतीयकरण झाले हे कळायला मार्ग नाही. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. परंतु सोरोस यांची धोरणे मात्र ट्रम्प सुरू ठेवणारे यांचे संकेत नावारोव्ह यांच्या विधानामुळे मिळालेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीसाठी चीन दौऱ्यावर आहेत. आज ते मायदेशी परततील. ज्या भारताचा चीनविरोधात वापर करायचा होता, तो भारत चीनच्या सोबत ठामपणे उभा असल्याचे पाहून अमेरिकी नेतृत्वाला इंगळ्या डसणे स्वाभाविक होते. त्यामुळे मोदींच्या विरोधात किंवा भारताच्या विरोधात ट्रम्प प्रशासनाचे काही जहरी वक्तव्य अपेक्षित होते. ट्रम्प यांचे संजय राऊत म्हणजे पीटर नावारो यांनी या अपेक्षेची पूर्तता केली आहे. रशियन तेलाचे निमित्त करू भारताच्या जाती व्यवस्थेवर टीप्पणी करून घेतलेली आहे.
हे ही वाचा:
आशियामध्ये काम करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांमध्ये भारत अव्वल
हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांमध्ये प्रभावी ठरत आहे हे नवीन औषध
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ फसली
मराठा समाजाच्या कल्याणासाठी फडणवीस आणि शिंदेंचे सर्वाधिक योगदान!
महाराष्ट्रात मनोज जरांगे यांना पुढे करून ब्राह्मण मुख्यमंत्र्याच्या विरोधात शंख करायचा, दिल्लीत स्वत:ला दत्तात्रय गोत्रधारी, पंडीत म्हणवणाऱ्या राहुल गांधी यांची पाद्यपूजा करायची, असे महाराष्ट्रातील विरोधकांचे राजकारण आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांवर चालवण्यासाठी भात्यातील तर्काचे तीर संपतात, तेव्हा जात आठवते. महाराष्ट्रातील काय किंवा देशातील काय भाजपाचे विरोधक जातीचे हत्यार वापरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना नामोहरम करण्याचा प्रयत्न करतायत. जर जातीचाच विचार करायचा तर नरेंद्र मोदींना आजवर झालेला सर्वात दिग्गज ओबीसी नेता म्हणता येईल. परंतु भारतातील विरोधकांच्या राजकारणात तर्काला काडीमात्र स्थान नाही. अमेरिकेचेही काहीचे तसेच झाले आहे.
अमेरिकी गुप्तचर यंत्रणा भारतातील घडामोडींकडे मायक्रोस्कोपिक नजर ठेवतात हे लपलेले नाही. देशाच्या राजकारणातील जातवाद त्यांच्यापासून लपलेला नाही. धर्माच्या खालोखाल जात ही भारताची सगळ्यात मोठी महाराष्ट्रात फॉल्ट लाईन असल्याचे अहवाल सीआयएने ट्रम्प यांच्यापर्यंत नक्कीच नेले असतील. अमेरिकेच्या स्टेट डीपार्टमेंटचे जे अहवाल प्रकाशित होत असतात त्यातही भारतातील कथित धार्मिक असहिष्णूतेसोबत गेल्या काही वर्षात जातीचा मुद्दाही डोकावायला लागलेला आहे. अमेरिकी थिंक टॅंक भारताच्या जाती व्यवस्थेबाबत नियमितपणे अहवाल प्रसिद्ध करत असतात. कॅपेन फॉर जस्टीस एण्ड पीस यांच्या सारख्या एनजीओही त्यांना रसद पुरवत असतात.
भारतावर बी-२ बॉम्बर पाठवून बॉम्ब टाकता येणार नाही, हे अमेरिकेला ठाऊक आहे. त्यामुळे फोडा आणि झोडा हे ब्रिटीश तंत्र वापरण्याचा प्रयत्न अमेरिकेने केलेला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संविधान बदलणार, आरक्षण संपवणार असा प्रचार काँग्रेसने केला होता. त्याचा थोडाबहुत फायदाही काँग्रेसला मिळाला. भाजपाला हा खोडसाळ प्रचार रोखता आला नाही, त्याचे समाधानकारक उत्तरही देता आले नाही. त्याचा फटका त्यांना बसला. त्या काळात जॉर्ज सोरोस यांची ओपन सोयायटी आणि काँग्रेसमध्ये असलेले साटेलोट उघड झाले होते. ऑर्गनाईज्झड क्राईम एण्ड करप्शन रिपोर्टींग प्रोजेक्ट ही सोरोस प्रायोजित वृत्तसंस्था. याच वृत्तसंस्थेचे अहवाल वापरून केंद्र सरकारच्या विरोधात फैरी झाडण्याचे काम राहुल गांधी करीत असत. तेच सोरोस भारतातील जाती व्यवस्थेचा वापर करून फूटीची ही बीजे अंकूरत राहतील याचे प्रय़त्न करत होते. सोरोस आणि ट्रम्प यांचे तीळमात्रही सख्य नाही. उलट उभा वाद आहे.
अलिकडे सोरोस यांच्या विरोधात ट्रम्प यांनी तोफ डागलेली आहे. अमेरिकेत सरकारविरोधात होणाऱ्या आंदोलनांमागे सोरोस असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे संकेत दिले होते. हे दोघेही वैरी आहेत, परंतु मोदी हे या दोघांचे शत्रू आहेत.
भाजपाला झोडण्यासाठी तथाकथित ब्राह्मणवाद किंवा मनुवाद हे मोठे उपयुक्त हत्यार आहे, याची जाणीव ट्रम्प यांना झाली असल्यामुळे ते मोदींच्या विरोधात सोरोस यांनी वापरलेले शस्त्र वापरण्याच्या तयारीत आहेत. नावारो यांनी रशियन तेलामुळे भारतातील सर्वसामान्य जनतेचा फायदा होत नसून फक्त ब्राह्मणांचा फायदा होत असल्याचा केलेला दावा त्यातूनच करण्यात आला आहे. विवेक रामास्वामी याने कपाळाला हात लावला असेल.
नावारो यांचे विधान ऐकून कुणाला असे वाटू शकेल की अमेरिकी राजकीय नेत्यांना जातीबाबत काय कळते? वस्तूस्थिती वेगळी आहे. भारतातील जाती व्यवस्थेबाबत अमेरिकेत सतत खल सुरू असतो. अनेक अहवाल प्रसिद्ध होत असतात. तथाकथित उच्च जाती आणि दलितांबाबत सर्वे रिपोर्ट प्रसिद्ध होत असतात. त्यातून सोयीचे निष्कर्ष काढण्याचे काम अमेरिकी समाजिक आणि राजकीय नेते करत असतात. कार्नेजी इन्डॉवमेंट फॉर इंटरनॅशनल पीस या संस्थेच्या २०२४ च्या अहवालाचे उदाहरण देता येईल.
भारतात धार्मिक असहिष्णूता वाढते आहे, अशा प्रकारचे अहवाल अमेरिकेतील तथाकथित थिंक टॅंक नियमितपणे प्रकाशित करत असतात, त्यात धर्तीवर भारतात उच्चवर्णीयांकडून दलितांचे कसे शोषण होते आहे, असे अशाप्रकारचे अहवाल येत्या काही वर्षात प्रकाशित झाले तर नवल वाटायला नको.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाची सूत्रे आल्यापासून जॉर्ज सोरोस आणि त्यांच्या ओपन सोसायटी फाऊंडेशन ही त्यांची संस्था भारतातील जाती या विषयावर सतत अहवालांचा रतीब टाकला. अमेरिकेत मोठ्या संख्येन भारतीय असल्यामुळे जातीव्यवस्थेचे अमेरिकेत कसे लोण पसरले आहे, यावर अमेरिकेत बरेच चर्वितचर्वण सुरू असते. जी लाईन सोरोस यांनी घेतली होती तीच ट्रम्प पुढे नेतील अशी कुणाला अजिबात शक्यता वाटत नव्हती. कारण दोघांचे विळ्या भोपळ्याचे नाते. मोदी धमक्यांना भिक घालत नाहीत, अजिबात जुमानत नाहीत हे आता ट्रम्प यांच्या बऱ्यापैकी लक्षात आले आहे. त्यामुळे धमक्या बंद करून आता त्यांनी भारताच्या विरोधात तेच खेळ खेळायला सुरूवात केली आहे जे बायडन प्रशासनाच्या काळात सोरोस यांना हाताशी धरून खेळले जात होते. हे खेळ देशात फूट पाडण्याचे आहे. हे खेळ देशात भाषिक, जातवादी, धार्मिक तंटे घडवण्याचे आहेत.
येत्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अस्थिर कऱण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू होणार आहेत. येत्या काळात भारतात मोठ्या प्रमाणात दंगे घडवण्याचे प्रयत्न केले जातील. जातीच्या, धर्माच्या आणि भाषेच्या आधारे देशात फोडाफोडीचे राजकारण जोरात सुरू होईल. देशात अराजक निर्माण करण्याचे प्रयत्न होतील. त्यामुळे नावारो यांचे विधान ही त्याची सुरूवात आहे, असे मानायला हरकत नाही. जे बायडन प्रशासनाच्या काळात बांगलादेशात घडले ते भारतात घडवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होईल.
दरम्यान भारतातील अमेरिकेच्या दूतावासाने आज एक्सवर पोस्ट अपलोड केली. त्यात भारत आणि अमेरिकेतील नाते नव्या उंचीवर जाईल हे २१ व्या शतकातील सगळ्यात महत्वाचे नाते असेल अशा आशयाची पोस्ट केली आहे. संशोधन, व्यापार, संरक्षण या क्षेत्रातील द्वीपक्षीय संबंध मजबूत होतील, असा या पोस्टचा आशय आहे.
कडवट गोळ्या खाताना तोंड कडू होऊ नये म्हणून त्यावर साखरेचे आवरण लावले जाते. ही पोस्ट म्हणजे तसाच प्रकार आहे. मोदींनी एससीओ परीषदेला उपस्थित राहून अमेरिकेला प्रचंड दुखावले आहे. अमेरिका त्याचे उट्टे काढणार हे निश्चित. शस्त्रक्रीया करण्यापूर्वी भूल दिली जाते. अमेरिकी दूतावासाने केलेली ही पोस्ट म्हणजे तशीच भूल आहे. सावध रहा.
