विधीमंडळ अधिवेशनाच्या आधी इंडीगो एअर लाईन्सचा गोंधळ सुरू होता. ज्यांनी इंडीगोचे बुकिंग केले होते, त्यांचे विमान उडेल की नाही, असा सवाल होता. म्हणून मुंबई आणि अन्य ठिकाणांवरून येणाऱ्या आमदारांनी इंडीयन एअरलाईन्स, समृद्धी महामार्ग असे विविध पर्याय स्वीकारले. बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी चार्टर्ड फ्लाईटचा पर्याय स्वीकारला. त्यांची सेल्फी व्हायरल झाल्यानंतर भाजपा नेते, केंद्रीय गृहमंत्री भडकल्याचे वृत्त आहे. विविध मीडीयातून ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे. अलीकडे माध्यमांच्या विश्वासार्हतेवर एवढे मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे, की एखादी बातमी वाचल्यानंतर वाचले ते सत्य आहे काय, इथपासून मनाक प्रश्न सुरू होतात. ही बातमी वाचल्यानंतर आमच्या मनात मात्र दुसरी प्रतिक्रीया आली ती आम्हालाच जास्त बोचते आहे.
माध्यमातून जो फोटो व्हायरल झालेला आहे, ते सगळे भाजपा नेते आहेत. भाजपा हा पक्ष एकेकाळी पार्टी विथ डीफ्रन्सही टॅग लाईन मिरवायचा. काळाच्या प्रवाहात ही टॅग लाईन विरघळून गेलेली आहे. २०१४ नंतर पक्षाचे दरवाजे सताड उघडण्यात आले. थोडीबहुत ताकद असलेला एखादा नेता पक्षात येतो आहे, असे म्हटल्यावर त्याचे स्वागत व्हायचे. घाऊक पक्ष प्रवेश सुरू झाले. २०१८ मध्ये त्रिपुराच्या निवडणुका झाल्या. विधानसभेत एकही आमदार नसलेल्या भाजपाचे दोन तृतीयांश आमदार विजयी झाले. कम्युनिष्टांचा सफाया झाला. परंतु यानंतर कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांचे घाऊक पक्ष प्रवेश झाले. त्यात स्थानिक पातळीवरील गुंडा-पुंडांचा सुद्धा समावेश होता.
या प्रवेशांमध्य अमित शहा यांची एक विचार होता. एखादा गुंड दुसऱ्या पक्षात राहुन आपल्याला त्रास देण्यापेक्षा आपल्या सोबत राहील. ताप सुद्धा कमी आणि बळ सुद्धा वाढले. शिवाय तो आपल्याकडे असल्यामुळे त्याला आपल्या कलाने वागावे लागेल. पहील्या दोन गोष्टींबाबत अमित शहा अगदी बरोबर होते. त्यांचा तिसरा तर्क मात्र चूक ठरलेला आहे. चार्टर्ड फ्लाईटमधील ती सेल्फी व्हायरल झाल्यानंतर अमित शहांनी व्यक्त केलेला संताप ही त्या चूकीची जाहीर कबूली आहे.
योगायोगाने या सेल्फीत प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे असे नेते होते, जे बाहेरून भाजपामध्ये आले आहेत. भाजपामध्ये दाखल होऊन बराच काळ लोटला असला तरी पक्षाची संस्कृती त्यांना कळलेली नाही. ते तीच संस्कृती पुढे नेतायत ज्या संस्कृतीतून ते आले आहेत. ज्या संस्कृतीत ते वाढले आहेत. काही वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना इकोनॉमी क्लासमध्ये प्रवास भाजपाच्या केंद्रीय कार्यालयातून केंद्रीय संघटनमंत्री बी.एल.संतोष, अमितभाई शहा यांनी या सेल्फीवर नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या नेत्यांना सुनावले.
अमित शहा यांची स्वत: ची जीवनशैली अत्यंत साधी आहे. साधे भोजन करतात. भरपूर प्रवास करतात. २४ तास पक्षासाठी वेळ देत असतात. भाजपामध्ये पक्षकार्याशिवाय ज्यांच्या डोक्यात कोणताही विचार नसतो, अशा समर्पित नेत्यांमध्ये त्यांचे स्थान वरचे आहे. भाजपाचे रणनीतीकार म्हणून त्यांनी संसदेच्या माध्यमातून भाजपाच्या मतदारांची, या देशाच्या नागरीकांची अनेक स्वप्ने पूर्ण केलेली आहेत. कलम ३७० हटवणे, वक्फ सुधारणा विधेयक. त्यांनी इतिहासात आपले नाव कोरून ठेवले आहेत. विचारधारा, पक्षशिस्त याबाबत कोणतीही तडजोड न करणारा हा नेता आहे. चार्टर्ड प्लेनमधील सेल्फीबाबत त्यांनी व्यक्त केलेल्या संतापाचे कारणही हेच आहे. कारण या सेल्फीत जे काही दिसते ती पक्षाची संस्कृती नाही.
चार्टर्ड फ्लाईटमधून हे अलिकडच्या काळात फार दुर्मीळ राहीलेले नाही. अनेक उद्योगपती, बॉलिवूडचे स्टार चार्टर्ड फ्लाईट बाळगून आहेत. अनेक जण भाडे मोजून चार्टर्ड फ्लाईटने ये जा करत असतात. त्यामुळे या चार्टर्ड वारीचा इतका बभ्रा झाला नसता. परंतु इंडीगोची कित्येक फ्लाईट रद्द झाली किंवा बिलंबाने उडत होती. देशभरात हजारो प्रवाशांना मनस्ताप झाला. लोक अक्षरश: रडकुंडीला आले होते. लहान मुले, वृद्ध आणि महिलांचे तर प्रचंड हाल झाले. प्रवाशांपैकी अनेकजण तर असे होते की, जे अत्यंत महत्वाच्या कामासाठी परवडत नसताना विमानातून प्रवास करणार होते. वेळवर न पोहोचल्याने त्यांचे नुकसान झाले. अशा परीस्थितीत सत्तेचे उब मिळालेले काही नेते, चार्टर्ड प्लेनमधून प्रवास करत असतील, सेल्फी काढून मिरवत असतील तर त्याचा अर्थ असा आहे, की लोकांना झालेल्या त्रासाचे, त्यांच्या वेदनांचे त्यांना देणेघेणे नव्हते. हजारो लोक त्रस्त असताना त्यांना फरक पडत नव्हता. आम्ही शॉकप्रुफ आहोत, वेगळ्या पातळीवर आहोत, हे दाखवण्याची त्यांना संधी मिळाली होती. लोक भरडले जात असले तरी आमच्याकडे पैशाची ताकद आहे, या झळा आमचे काहीही बिघडवू शकत नाहीत, आमच्याकडे पैशाची ताकद आहे, असे सूचित करणारी ही सेल्फी होती.
गेली काही वर्षे एक नवे फॅड सुरू झालेले आहे. असे उपरे नेते भाजपामध्ये आले की त्यांना कधी एकदा गणवेश चढवून संचलनात उतरवतो, याची संघाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना प्रचंड घाई असते. यातले काही नेते संघाचा गणवेश घालून संचलनात मिरवताना दिसतात. संघाचे पदाधिकारीही अनेकदा प्रवासात यांच्या घरी भेट देतात. परंतु हे नेते खासगी जीवनात संघाचा साधेपणाचा संस्कार अजिबात अंगाला लावून घेत नाहीत. भाजपामध्ये नेत्यांची अशी काही जमात निर्माण झाली आहे, ज्यांना आपण कोणी तरी वेगळे आणि ग्रेट आहोत, हे सतत दाखवायचे असते. त्यांच्या एकूणच व्यवहारात भपका आणि दिखावा असतो. सर्वसामान्य माणसं त्यांना किरकोळ आणि फालतू वाटतात. मतदार संघात आणि बाहेर फिरताना अनेकांच्या सोबत खासगी सुरक्षा रक्षकांची फौज असते. आपण आमदार आहोत, म्हणजे मतदार संघ नावाच्या संस्थानाचे राजे आहोत, असा त्यांचा थाट असतो. सर्वसामान्य नागरीकापेक्षा आपण काही तरी वेगळे आहोत, हे दाखवण्याचा त्यांना प्रयत्न असतो.
जे मूळचे भाजपाचे आहेत, संघ,अभाविपच्या माध्यमातून भाजपामध्ये दाखल झालेले आहेत, अशा नेत्यांना या संस्कृतीची भुरळ पडू लागली आहे. यात काही गैर आहे, चुकीचे आहे, असे वाटेनासे झालेले आहे. सरकारमध्ये सहभागी झालेल्या अन्य दोन पक्षांमध्ये तर अशा नेत्यांची अजिबात कमतरता नाही. टेस्ला जेव्हा भारतात दाखल झाली तेव्हा शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी आपला नातवाला टेस्ला गिफ्ट केली. यांच्यावर ईडीची कारवाई झाली होती. सरकारमध्ये असले तरी बहुधा त्यांना अद्याप क्लीनचिट मिळालेली नाही.
राजकारणात सगळेच भ्रष्ट असा आमचा अजिबात दावा नाही. अनेक जण त्यांच्याकडून काही शिकावं अशा योग्यतेचे असतात. जनता आणि त्यांच्यात काही फरक जाणवू नये, आपल्याकडे येताना लोकांच्या मनावर कोणत्याही भपक्याचे दडपण असू नये असा त्यांचा प्रयत्न असतो. हे असे नेते भाजपामध्येही भविष्यात अल्पसंख्यांक होतील अशी भीती भाजपा समर्थकांना. अनेक राजकीय नेत्यांची श्रीमंती राजकारणातूनच आलेली असते. सरकारी कंत्राटे, टेंडर, एसआरएचे प्रकल्प, त्यासाठी केलेली दलाली हाच त्यांच्या श्रीमंतीचा मार्ग असतो. काही अपवाद आहेत, त्यांचे पिढीजात व्यवसाय असतात, काहींनी स्वकष्टानेही काही लोकांनी उद्योग उभारलेले आहे.
राजकारणी पैसा फक्त वाम मार्गाने कमावतात, अशातला भाग नाही. पैसा कसाही कमावला असला तरी त्याचे सार्वजनिक जीवनात त्याचे किळसवाणे प्रदर्शन टाळले पाहीजे हा भाजपाचा संस्कार आहे. भाजपामध्ये असे अनेक नेते आहेत, जे रोल्स रॉईस घेऊन फिरू शकतात, परंतु ते इनोव्हाच्या पलिकडे जात नाहीत.
कारण हे नेत लोक प्रतिनिधी असतात, आजूबाजूला गरीबी, हलाखीत जीवन जगणारे हजारो लोक असताना, त्यांना पोटापुरते अन्न मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना तुम्ही श्रीमंतीचे किळसवाणे प्रदर्शन कसे घडवू नये हा हेतू त्यामागे आहे. अमित शहांना भडकले या बातमीत काडीचेही तथ्य असेल तर त्याची कारणे यापेक्षा वेगळी असण्याचे कारणच नाही. अमितभाई भाजपामध्ये सुरू असलेली घाऊक भरती बंद करणे हाच याचा उपाय आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
