गुरुपतवंत सिंह पन्नू  फसलेले स्पेशल ऑप्स? निखिल गुप्ताला शिक्षा, यादवचे काय?

गुरुपतवंत सिंह पन्नू  फसलेले स्पेशल ऑप्स? निखिल गुप्ताला शिक्षा, यादवचे काय?

आजचा दिवस खरोखरच काळा दिवस आहे. सात वर्षांपूर्वी आजच्या दिवशी पुलवामाचा हल्ला झाला होता. आजच्या दिवशी निखिल गुप्ता या भारतीयाला अमेरीकी न्यायालयाने दोषी ठरवल्याची वाईट बातमी आली आहे. अमेरिकी सरकारने गुप्ता यांना २१ ते २४ वर्षे कारावासाची शिक्षा व्हावी अशी कोर्टाला विनंती केली आहे. खलिस्तानी गुरुपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येच्या कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. विकाश यादव याने त्याला पन्नूचा काटा काढण्याचा काम सोपवले होते. हे भारतीय गुप्तचर संस्थेशी संबंधित आहेत, असा दावा अमेरिकी फेडरल न्यायालयाने केलेला आहे. भारताने या प्रकरणात कोणताही सहभाग नाकारला आहे.

१९८० मध्ये अमेरिकेत जोनाथन पोलार्ड या अमेरिकी नागरीकाला अटक झाला हा. ज्यू होता. त्याच्यावर इस्त्रायलसाठी हेरगिरी करण्याचा आरोप होता. जोनाथनला ३० वर्षांची सजा झाली. त्याचे देशात आगमन होईल तेव्हा मी त्याचे स्वत: स्वागत करेन असे इस्त्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतन्याहू यांनी जाहीर केले होते. इस्त्रायल हा अमेरिकेचा सामरीक भागीदार आहे, मित्र देश आहे. या दोन्ही देशांचे धोरण कायम एकमेकांना पूरक राहीलेले आहे. तरीही मोसादचे गुप्तचर अमेरिकेत हेरगिरी करतात ही बाब अनेकदा चव्हाट्यावर आलेली आहे.

निखील गुप्ता यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा हेरगिरीच्या जगाबाबत चर्चा सुरू झाली आहे. फेडरल न्यायाधीश सारा नेटबर्न यांनी निखिल गुप्ता यांना पन्नूच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. लवकरच त्यांच्या शिक्षेची सुनावणी होणार आहे.

अलिकडे विदेशात घडणाऱ्या अनेक घटनांबाबत भारतात चर्चा होते आहे. भारताच्या रिसर्च एण्ड एनालिसिस विंगचा या कारनाम्यांमध्ये सहभाग आहे, असा दावा केला जात आहे. पाकिस्तानमध्ये अज्ञात गनमॅन सक्रीय होतात, दोन डझनाहून अधिक अशा लोकांच्या हत्या करतात ज्यांच्या संबंध कधी काळी भारतविरोधी कारवाया किंवा दहशतवादात सहभाग होता. एकेकाला शोधून त्याला टिपले जात आहे. मोटार सायकल वरून हल्लेखोर येतात, बेछूट गोळीबार करतात आणि सावजाचा बळी घेऊन पळून जातात. नियोजन इतके अफलातून असते की एकही हल्लेखोर आजवर पकडला गेला नाही. पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा वारंवार या हत्या प्रकरणी भारताकडे बोट दाखवत असल्या तरी त्यांच्याकडे पुरावा नाही.

हे ही वाचा:

मायक्रोसॉफ्टच्या व्यवसाय पद्धतींची अमेरिकेत चौकशी सुरू

बंगालमध्ये हरवलेल्या तृणमूल नेत्याची निर्घृण हत्या

मालेगावच्या उपमहापौरांनी लावला टिपू सुलतानाचा फोटो, वादानंतर हटवला

बेंगळुरूत एसयूव्हीने दुचाकीस्वाराला उडवत ट्रकला दिली धडक

कॅनडात हरदिप सिंह निज्जर या खलिस्तान टायगर फोर्सच्या दहशतवाद्याची हत्या केली जाते. याच दरम्यान झेकोस्लाव्हाकीयात अमेरिकेच्या इशाऱ्यावरून निखिल गुप्ता या व्यावयायिकाला अटक केली जाते. त्याच्यावर ठपका ठेवला जातो पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा. असे सांगितले जाते की, विकाश यादवने गुप्ताला ही कामगिरी सोपवली होती. त्यासाठी गुप्ताने एका कंत्राटी मारेकऱ्याला सुपारी दिली. रक्कम छोटीमोठी नव्हती १ लाख डॉलर्सची होती. म्हणजे भारतीय रुपयात सुमारे ९० लाख रुपये. सुपारी होती पन्नूचा काटा काढण्याची. हाच ठपका ठेवून गुप्ता यांना अटक केली जाते. तपासात विकाश यादव यांचे नाव समोर येते. अमेरिकी तपास यंत्रणांनी यांचा संबंध भारतीय गुप्तचर संस्थांशी जोडला आहे. भारताने मात्र याप्रकरणात आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

फेडरल कोर्टाच्या निकालानंतर आता प्रश्न हा निर्माण होतो की, खरोखर निखिल गुप्ता हा पन्नूचा काटा काढणार होता का? खरोखर विकाश यादव यांनी त्याच्यावर ही जबाबदारी सोपवली होती का? यादव महाशयांचा खरोखरच रिसर्च एण्ड एनालिसिस विंगशी काही संबंध आहे का? रॉने खरोखरेच पन्नूचा काटा काढण्याचे काही स्पेशल ऑपरेशन आयोजिले होते काय? हे ऑपरेशन फसले आहे का?

विदेशातील भूमीवर भारताकडून काही जणांना नियोजनबद्धरित्या संपवले जात आहे का? अशा गोष्टी कोणी जाहीरपणे करत नाही. आजवर पाकिस्तानमध्ये इतक्या दहशतवाद्यांचे बळी घेण्यात आले, परंतु ते आम्ही केले असा दावा भारताने कधीच केला नाही. हे बळी कोणी घेतले, हे कोणाला ठाऊक नाही. ते कधी समोर येण्याची शक्यताही नाही. गोपनीयता हाच या सगळ्या ऑपरेशनचा गाभा असतो. हा असा नियम आहे, जो अपरिवर्तनीय आहे. त्यात बदल अशक्य. त्यामुळे विदेशातील भूमीवर निखिल गुप्ता यांना अटक झाल्यानंतर तो आमचा आहे, असा दावा केला जाण्याची शक्यता शून्य होती. म्हणून अशा प्रकारच्या ऑपरेशन्सना कोव्हर्ट ऑपरेशन म्हटले जाते.

अमेरिकी तपास यंत्रणांवर विश्वास ठेवायचा तर निखिल गुप्ताने ज्याला सुपारी दिली तो, एफबीआयसाठी काम करणारा खबरी निघाला. निखिल गुप्ताने पन्नूची हत्या करण्यासाठी दिलेली आगाऊ रक्कम, त्याचे मेसेज, चॅट आणि ऑडीयो रेकॉर्डींग असल्याचा दावा अमेरिकी तपास यंत्रणांनी केला असून हे पुरावे कोर्टासमोर ठेवण्यात आले आहेत. अमेरिकेने तंत्रज्ञानाचे असे काही जाळे देशभरात निर्माण केले आहे की कोण काय बोलतो, कोण काय करतो, यावर अमेरिकी सुरक्षा यंत्रणांची बारीक नजर असते. कोणीही या जाळ्याच्या बाहेर नाही. निखिल गुप्ता यांच्यावर ठेवलेलेल आरोप खरे असतील तर त्यांचा गेम तर अमेरीकी गुप्तचर यंत्रणेच्या खबऱ्यानेच केलेला आहे. गुप्ता यांना व्यवस्थितपणे अडकवण्यासाठी त्याने सगळे पुरावे सुरक्षा यंत्रणांकडे सोपवले.

काठमांडू विमान अपहरण प्रकरणातील एक आरोपी जहूर इब्राहीम मिस्त्री, पठाणकोट हल्ल्याचा मास्टर माईंड शाहीद लतीफ याच्यासारखे दोन डझन दहशतवादी पाकिस्तानातील अज्ञात हल्लेखोरांनी ठोकल्यानंतर कोणी तरी याचा सूत्रधार आहे अशी चर्चा होणे स्वाभाविक आहे. निज्जरला मारल्यानंतरही अशी चर्चा झाली होती. बहुधा निज्जर याच्या अटकेनंतर अमेरिकी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असाव्यात. त्यांनी त्यांच्या खलिस्तानी असेटच्या सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त केला. काही पावले उचलली, त्यातूनच कदाचित निखिल गुप्ताला अटक झाली असावी. कारण कॅनडामध्ये निज्जरची हत्या १८ जून २०२३ रोजी झाली आणि निखिल गुप्ताला अटक झाली ३० जून रोजी. फक्त १२ दिवसाच्या अंतराने.

पन्नू हा भारतासाठी ताप झाला होता. त्याला थंड करणे गरजेचे झाले होते. परंतु अमेरिकेच्या भूमीवर त्याला ठोकण्यासाठी एखादे ऑपरेशन खरोखरच रचण्यात आले होते काय, या प्रश्नाचे उत्तर मिळणे कठीण आहे. कारण गुप्तहेर शत्रूच्या भूमीवर काम करत असतात. या काळात पकडले गेल्यास सरकार हात वर करणार, आमचा काही संबंध नाही, असे जाहीर करणार हे त्यांनाही माहित असते. हे क्षेत्रच असे खडतर आहे. तुम्ही यशस्वी झाला तर तुम्हाला श्रेय घेता येत नाही, अपयशी ठरलात तर तुम्हाला वाचवण्यासाठी कोणी पुढे येत नाही. अनेकदा मोरारजी देसाई, इंदरकुमार गुजराल, हमीद अन्सारी यांच्या सारखे राजकीय नेतेच या धुरंधरांच्या गळ्याचा फास बनतात.

न्यूयॉर्क फेडरल कोर्टाच्या न्यायाधीशांनी निकालपत्रात टिप्पणी केली आहे की आमची कारवाई व्यक्तिच्या विरोधात आहे, देशाच्या विरोधात नाही. एफबीआयच्या आरोप पत्रात विकाश यादव यांचा उल्लेख सीसी१ असा आहे. ते भारतातच आहेत. त्यांना अमेरिकेच्या हवाली करण्यास भारताने नकार दिलेला आहे.

गुप्ता प्रकरणात तीळमात्र सत्य असले तर त्याचा अर्थ असा आहे की, भारताचे शत्रू विदेशातील भूमीवर फार काळ सुरक्षित नाहीत. त्यांना शोधले जात आहे, त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी मोहिमा आखल्या जात आहेत. निखिल गुप्ता यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप खरे असतील, नसतील. परंतु हे सगळे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर पन्नूची दातखीळ बसली असेल हे नक्की त्याला हे लक्षात आले असेल की आपण भारताच्या रडारवर आहोत. आपल्याला पुढे काही वर्षे जगायचे असेल तर आपल्याला बिळात राहावे लागेल. हा इशारा फक्त पन्नूला नाही. देश विदेशात राहणाऱ्या प्रत्येक देशद्रोह्याला, दहशतवाद्याला आहे. भारताच्या विरोधात कारवाया करणाऱ्यांसाठी पाकिस्तान असो, युरोप, कॅनडा किंवा अमेरिका, कोणतीही भूमी यापुढे सुरक्षित नाही.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version