केंद्र सरकारने आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा सदस्य राघव चड्ढा यांना मोठा दिलासा देत ‘Z’ श्रेणीची सुरक्षा प्रदान केली आहे. गृह मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, ही सुरक्षा दिल्ली आणि पंजाब दोन्ही ठिकाणी लागू राहणार असून, अर्धसैनिक दल त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळतील. माहितीनुसार, हा निर्णय इंटेलिजन्स ब्युरो (IB)च्या ‘थ्रेट परसेप्शन’ अहवालाच्या आधारे घेण्यात आला आहे. गृह मंत्रालयाने सुरक्षेच्या सर्व बाबींचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतला.
पंजाबमधील ‘आप’ सरकारने राघव चड्ढा यांची राज्यस्तरीय सुरक्षा काढून घेतली होती. यापूर्वी, ते पंजाबमधून राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना राज्य सरकारकडून उच्चस्तरीय ‘Z+’ सुरक्षा देण्यात आली होती. गेल्या काही काळापासून राघव चड्ढा आणि आम आदमी पक्षाच्या नेतृत्वामध्ये मतभेद उघडपणे समोर येत आहेत. २ एप्रिल रोजी पक्षाने त्यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवल्यानंतर हा वाद अधिक तीव्र झाला. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना चड्ढा यांनी “मला गप्प करण्याचा प्रयत्न झाला, पण पराभूत करता आले नाही,” असे म्हटले होते.
अलीकडेच त्यांनी इन्स्टाग्रामवर ‘आवाज उठाई, कीमत चुकाई’ या शीर्षकाखाली एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी संसदेत उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांची झलक दाखवली. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, त्यांच्या संसदीय कामगिरीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना त्यांचे कामच उत्तर देईल.
हे ही वाचा:
अमरावती अश्लील व्हिडिओ प्रकरणी मुख्य आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई
अमरावती अश्लील व्हिडिओ प्रकरणी उजेर खान इक्बाल खानला अटक
खारघरमध्ये २० एकरांवर ‘आफ्रिका ट्रेड हब’ उभारण्याची CIDCOची योजना
राघव चढ्ढा यांच्या जागी निवडलेल्या मित्तल यांच्यावर ईडीचे छापे
आम आदमी पक्षाने त्यांना उपनेतेपदावरून हटवताना असा आरोप केला होता की, ते संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात पुरेसे ठामपणे बोलत नव्हते आणि स्वतःच्या प्रसिद्धीवर अधिक लक्ष देत होते. मात्र, राघव चड्ढा यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावत त्यांना खोटे ठरवले. त्यांनी सांगितले की, ते संसदेत गोंधळ घालण्यासाठी नव्हे तर लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी जातात. उपनेतेपदावरून हटवल्यानंतर ते सोशल मीडियावर सक्रिय असून, विविध पोस्ट आणि व्हिडिओद्वारे आपली भूमिका मांडत आहेत. सध्या, सुरक्षा वाढवण्याचा निर्णय त्यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात असला, तरी त्यांच्या आणि पक्षामधील वाढत्या दुराव्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरूच आहे.







