भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रथमच वंदे भारत एक्स्प्रेसने केवळ प्रवाशांनाच नाही, तर एका व्यक्तीच्या नव्या आयुष्याची आशाही आपल्या वेगवान प्रवासासोबत वाहून नेल्या आहेत. गुजरातमधील सुरत येथून अहमदाबादपर्यंत प्रत्यारोपणासाठी जिवंत मानवी हृदय वेळेत पोहोचवून भारतीय रेल्वेने आरोग्यसेवा क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. या यशस्वी मोहिमेमुळे आपत्कालीन अवयव वाहतुकीसाठी रेल्वे हा विश्वासार्ह आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो, हेही सिद्ध झाले.
या ऐतिहासिक मोहिमेची सुरुवात सुरत सिव्हिल रुग्णालयातून झाली. ब्रेन-डेड घोषित करण्यात आलेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबीयांनी अत्यंत धाडसी आणि संवेदनशील निर्णय घेत हृदय दानास संमती दिली. त्यानंतर हे हृदय अहमदाबादमधील यू. एन. मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रत्यारोपणासाठी पोहोचवणे ही वेळेशी सुरू असलेली शर्यत होती. कारण हृदय जितक्या लवकर रुग्णापर्यंत पोहोचेल, तितकी प्रत्यारोपण यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते.
यासाठी मुंबई सेंट्रल– गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी क्रमांक २०९०१)ची निवड करण्यात आली. सुरत ते अहमदाबाद हा संपूर्ण मार्ग ‘ग्रीन कॉरिडॉर’ म्हणून तयार करण्यात आला. रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा बल (RPF), सरकारी रेल्वे पोलीस (GRP), स्थानिक पोलीस आणि वैद्यकीय पथक यांनी अत्यंत बारकाईने नियोजन करत प्रत्येक टप्प्यावर समन्वय साधला. त्यामुळे हृदय कोणत्याही विलंबाशिवाय सुरक्षितपणे अहमदाबादला पोहोचले.
आजवर अशा प्रकारच्या अवयव वाहतुकीसाठी प्रामुख्याने हवाई मार्गावर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, या मोहिमेने वेगवान रेल्वे सेवांचाही तितकाच प्रभावी वापर होऊ शकतो, हे दाखवून दिले. विशेषतः कमी अंतराच्या प्रवासासाठी वंदे भारतसारख्या आधुनिक रेल्वेगाड्या आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
भारतीय रेल्वेने या यशाला केवळ वाहतूक व्यवस्थेतील नव्हे, तर आरोग्यसेवा क्षेत्रातीलही एक महत्त्वाचा टप्पा म्हटले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अवयव प्रत्यारोपणात प्रत्येक मिनिट अमूल्य असते. त्यामुळे अशी जलद, अचूक आणि समन्वयित व्यवस्था भविष्यात अनेक गंभीर रुग्णांना जीवनदान देऊ शकते.
हे ही वाचा:
‘आप’ नेता ताहीर हुसेनला अंकित शर्मा हत्येप्रकरणी जन्मठेप
कोकण रेल्वेचे तिकीट नाही…तीन गाड्या, चाकरमानी वाऱ्यावर; बेलापूरमध्ये उपोषण
पश्चिम बंगालमध्ये जैशच्या संशयित दहशतवाद्याला अटक
ममतांच्या काळातील जमीन लीज व्यवहारांची होणार छाननी
प्रवाशांना वेगवान प्रवास देण्यासाठी सुरू करण्यात आलेली वंदे भारत एक्स्प्रेस आता एका रुग्णासाठी नवजीवनाची वाहक ठरली आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हा पहिला प्रयोग यशस्वी ठरल्याने भविष्यात देशातील विविध शहरांदरम्यान अवयव वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर अधिक व्यापक प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







