ते दोन अज्ञात मृतदेह बोलतील काय ?

या प्रकरणात निर्दोषांना गुंतवणाऱ्यांवर कारवाई करून सरकारने न्याय करावा

ते दोन अज्ञात मृतदेह बोलतील काय ?

एटीएसचे निवृत्त अधिकारी मेहबुब मुजावर यांनी केलेले खुलासे आणि न्यूज डंकाला दिलेल्या मुलाखतीत न्यायालयाने मालेगाव प्रकरणात निर्दोष मुक्तता केलेले सुधाकर चतुर्वेदी यांनी केले खुलासे खळबळजनक आहे. दोघांच्या वक्तव्यातील काही कड्या जोडल्या की एक मोठ्या कटाचे चित्र उघड होते. मुंबईवर २६ /११ चा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सापडलेल्या दोन अज्ञात मृतदेहांच्या रहस्यांवरूनही कदाचित पडदा उठू शकतो. याचा संबंध निश्चितपणे भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठी तत्कालीन राज्य सरकार आणि केंद्र सरकारने रचलेल्या षडयंत्राशी आहे.

मालेगाव बॉम्पस्फोटाचा संपूर्ण तपास ज्या पद्धतीने केला गेला ते पाहीले की तपास करणारे एटीएसचे अधिकारी होते की सराईत गुन्हेगार असा प्रश्न पडतो. या प्रकरणात अनेक तथाकथित आरोपी आणि साक्षीदार गायब झाले आहेत. हत्या करून त्यांचे मृतदेह नष्ट करण्यात आले असावेत असे मानायला वाव आहे. दिलीप पाटीदार, रामजी कालसांगरा, संदिप डांगे यांचे काय झाले कुणाला माहित नाही. रामजी कालसंगरा आणि डांगेबाबत मेहबुब मुजावर यांनी खुलासा केलेला आहे. या दोघांची हत्या करून त्यांचे मृतदेह २६ /११  च्या दहशतवाद्यांसोबत गाडण्यात आले असे त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांनी दिलेले चुकीचे आदेश पाळण्यास नकार दिला म्हणून मेहबुब मुजावर यांचे आयुष्य बर्बाद करण्यात आले. त्यांनाही खोट्या प्रकरणात गुंतवून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. काही जुन्या बातम्या चाळल्या की, तर मुजावर जे काही म्हणतायत, त्यात तथ्य आहे, असे वाटू लागते.

मुंबईवर २६ /११ चा दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी पाकिस्तानमधून अजमल कसाब याच्यासह ९ दहशतवादी आले होते. कसाब जिवंत सापडला, त्याच्यासोबत असलेले सगळे दहशतवादी ठार झाले. कसाबच्या हातात कलावा होता. त्याच्याकडे जे ओळखपत्र सापडले, त्यावर बंगळुरूचा पत्ता होता. समीर चौधरी हे नाव होते. अर्थ उघड आहे, हा दहशतवाद हिंदूंनी घडवला असे षडयंत्रकाऱ्यांना दाखवायचे होती. हे कटवाले काही पाकिस्तानात बसले होते काही भारतात. दहशतवाद्यांच्या मृतदेहासोबत रामजी कालसांगरा आणि संदिप डांगे यांचे मृतदेह का टाकण्यात आले असतील?  कारण षडयंत्रकाऱ्यांना  दहशतवादी हल्ल्याचे आरएसएस कनेक्शन सिद्ध करायचे होते. सगळा बनाव तयार होता. काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे, पी. चिदंबरम, शरद पवार, दिग्विजय सिंह यांनी आधीच भगव्या दहशतवादाबाबत सतत बोलून वातावरण निर्मिती केली होती. डांगे आणि कालसंगरा यांचे मृतदेह दहशतवाद्यांच्या सोबत दाखवले की हा हल्ला पाकिस्तानने घडवला नसून संघानेच घडवला हे सिद्ध करायचे आणि संघावर बंदी आणायची, सरसंघचालक मोहनराव भागवत यांच्यापासून संघाच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड करायची. २०१४ च्या निवडणुकी आधी सगळे मैदान साफ करायचे, असा कट असण्याची शक्यता आहे.

सुधाकर चतुर्वेदी यांची न्यूज डंकाने जी मुलाखत घेतली, त्यातही त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ आणि सरसंघचालक मोहनराव भागवत यांचे नाव घ्यावे यासाठी मला प्रचंड मारहाण झाली. परंतु मी दबावासमोर झुकलो नाही. तुकाराम ओंबळे यांचे महाराष्ट्रावर थोर उपकार आहेत, त्यांनी जर अजमल कसाबला जिवंत पकडले नसते, ते काँग्रेसच्या नेत्यांनी जे ठरवले असते ते प्रत्यक्षात आले असते. कसाबला पकडल्यामुळे पाकिस्तानचा या कटातील हात सिद्ध करता आला.

२६ /११ सुरू असताना रामजी आणि संदिप डांगे यांना पोलिसांनी ठार केले, त्यांचे मृतदेह दहशतवाद्यांच्या मृतदेहांसोबत टाकले. तोपर्यंत अजमल कसाब जिवंत पकडला गेला याचा बोभाटा झाला होता, त्यामुळे हा हल्ला म्हणजे हिंदू दहशतवाद आहे, असे म्हणण्याची सोय नव्हती. दहशतवाद्यांच्या मृतदेहासोबत दोन अज्ञात मृतदेह सापडले, अशी बातमी काही मोजक्या इंग्रजी वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाली होती. त्यांना अजमलचा साथीदार अबू इस्माईल याने मारल्याचे या बातमीत म्हटले होते. हा बहुधा तपास यंत्रणांचा नाईलाज होता. कसाब जिवंत सापडला होता म्हणून चित्र बदलले, अन्यथा हेही दहशतवादी होते आणि त्यांचा संघाशी संबंध होता, अशी बोंब ठोकत काँग्रेसचे नेते थयथय नाचले असते.

हिंदू दहशतवादाची थिअरी मांडण्यासाठी यूपीए सरकारच्या नेत्यांनी केलेली मेहनत साफ पाण्यात गेली. याचे आणखी काही पुरावे आता हळुहळु बाहेर येतायत. सुधाकर चतुर्वेदी यांच्या कोठडीत एक टेप रेकॉर्डर ठेवला होता. हेमंत करकरे नियमितपणे चतुर्वेदी यांच्या कोठडीत येत असत. ते इथे अनेकदा फोनवर बोलत असत. अनेकदा तुमच्या फोनवर समोर बोलणाऱ्याचा आवाजही ऐकू येत असतो. असेच काही फोन या टेपमध्ये रेकॉर्ड झाले. करकरे यांच्या हत्येनंतर के.पी.रघुवंशी यांनी त्यांची जागा घेतील. करकरे यांच्या काळात तयार झालेले आरोपपत्र जसेच्या तसे न्यायालयाच्या समोर ठेवण्यात आले. त्यात ती चतुर्वेदी यांच्या सेलमध्ये ठेवण्यात आलेल्या टेप रेकॉर्डरची कॅसटही होती.

हे ही वाचा:

आक्षेपार्ह पोस्टमुळे दौंड तालुक्याच्या यवतमध्ये दोन गट आमनेसामने!

“मतांसाठी हिंदूंना दहशतवादी म्हटले”

शुभमन गिलची ऐतिहासिक कामगिरी – गावस्कर आणि सोबर्सच्या विक्रमांवर मोहर!

कोलकातामध्ये बांगलादेशी मॉडेलला अटक!

२०१३ साली चतुर्वेदी यांनी या कॅसेटची न्यायालयाकडे मागणी केली. या कॅसेटमध्ये करकरेंशी बोलणाऱ्या दिग्विजय सिंह यांचा आवाज रेकॉर्ड झालेला आहे. मध्यप्रदेशातील काँग्रेस नेते दिग्विजय सिंह जे सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यांच्या संपर्कात करकरे का होते? दिग्विजय सिंह त्यांना काय सुचना देत होते, त्यांच्याकडून काय माहिती घेत होते? असे अनेक प्रश्न चतुर्वेदी यांच्या गौप्यस्फोटामुळे निर्माण होतात. करकरे यांच्या हत्येनंतर त्यांचा सीडीआर कधीच न्यायालयासमोर ठेवण्यात आला नाही. त्यांना कोणाकोणाचे फोन येत होते, ही बाब झाकून ठेवण्यासाठी हे घडले असण्याची शक्यता आहे. एस.एम.मुश्रीफ यांच्यासारख्या लोकांच्या माध्यमातून पाकिस्तानचे दहशतवादी येणार होते हे कळल्यावर एटीएसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांची हत्या करण्यासाठी संघाच्या लोकांनी समांतर हल्ला केल्याची थिअर मांडण्यात आली.

खरे तर करकरे यांच्याकडे राज्य आणि केंद्र सरकारची इतकी गुपिते होती की ते जिवंत राहाणे हे भगवा दहशतवादाचे षडयंत्र रचणाऱ्यांसाठी धोकादायक होते. २६/११ च्या हल्ल्यातून पाकिस्तानला बाजूला ठेवून संघाला गोवण्याचा हा सगळा कट होता. कदाचित पाकिस्तान आणि काँग्रेसचे काही नेते यांचा हा संयुक्त कार्यक्रम असण्याची शक्यता होती. त्यामुळे हे प्रकरण फक्त राजकीय नसून देशद्रोहाशी संबंधित आहे.

आज तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील, हेमंत करकरे हयात नाहीत. परंतु शरद पवार, त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे, दिग्विजय सिंह, सुशील कुमार शिंदे, पी.चिदंबरम हे सगळे जिवंत आहेत. ज्या तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणी खऱ्याचे खोटे केले तेही जिवंत आहेत. म्हणूनच हे सगळे प्रकरण खणून काढण्याची गरज आहेत.

जे मृतदेह अज्ञात म्हणून पुरण्यात आले, त्यांच्या मृतदेहांचे अवशेष थडग्यातून पुन्हा काढण्याची गरज आहे. त्यांची डीएनए टेस्ट करण्याची गरज आहे. कारण ते रामजी कालसंगरा आणि संदिप डांगे असण्याची शक्यता आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी दिलीप पाटीदार बेपत्ता असल्याचा पोलिसांचा दावा असून याप्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने एटीएसच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात अटक वॉरण्ट काढले आहे. त्यांना अटक करून त्यांची चौकशी होण्याची गरज आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता करून न्यायालयाने न्याय दिलेला आहे. आता या प्रकरणात निर्दोषांना गुंतवणाऱ्यांवर कारवाई करून सरकारने न्याय केला पाहिजे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version