यूनस यांनाही चड्डी- बनियानवर पळावे लागणार

यूनस यांनाही चड्डी- बनियानवर पळावे लागणार

बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना नेसत्या वस्त्रांनिशी ढाका येथील त्यांच्या सरकारी निवासस्थानातून पळावे लागले होते. आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या अंतर्वस्त्रांसह जे जे मिळेल ते लुटले. तिच परीस्थिती बांगलादेशचे हंगामी सत्ताधीश मोहमद यूनसवर येणार आहे. तिथे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारामुळे संतापून हा इशारा भारताने दिला नसून अलिकडेच ठार झालेल्या शरीफ ओस्मान हादीच्या सख्या भावाने हा इशारा दिलेला आहे. हादीच्या मारेकऱ्यांवर ३० दिवसांत कारवाई करा
अन्यथा तुमच्यावरही शेख हसीना यांच्यासारखी वेळ आणू, असा इशाराही त्याने दिला आहे.

बांगलादेशचे हंगामी सत्ताधीश मोहमद यूनस सध्या वाघावर स्वार आहेत. वाघावर रपेट करण्याचा आनंद त्यांनी बराच काळ अनुभवला. वाघ असला तरी नियंत्रणात आहे, या भ्रमात असल्यामुळे सुरूवातीच्या काळात त्यांना मजा वाटली. परंतु या वाघाने आता अचानक डरकाळी फोडल्यामुळे त्यांची लुंगी ओली झाली आहे. इन्किलाब मंच नावाची संघटना चालवणारा विद्यार्थी नेता शरीफ ओस्मान हादी याच्यावर गोळीबार झाल्यानंतर उपचारासाठी खास एअर एम्ब्यूलन्सने त्याला सिंगापूरला पाठवले होते. तिथे झालेल्या त्याच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला होता. त्याच्या अंत्ययात्रेतही सहभागी झाले होते. हादीच्या मृत्यूचा आपल्याला धक्का लागलाय, असे दाखवण्याचा ते सर्वतोपरी प्रयत्न करत होते. या नाटकावर आता लवकरच पडदा पडण्याची चिन्हे आहेत.

हसीना यांचे सरकार उलथवण्यात जे विद्यार्थी नेते सहभागी होते, त्यात ओस्मान हादी आघाडीवर होता. यूनससत्तेवर आल्यानंतर तो अधिक पेटला. सतत भारतविरोधी विधाने करत होता. अशा परिस्थितीत हादीवर हल्ला झाला तर त्याचा ठपका भारतावर किंवा हसीना यांच्या अवामी लीगवर ठेवण्यात येणार हे उघड होते. झालेही तसेच. भारतावर
खापर फोडण्यात आले. हादीचे मारेकरी भारतात पळाल्याचा डांगोरा पिटण्यात आला. ढाक्यातील भारताचे हायकमिशनर प्रणय कुमार वर्मा यांना बोलावून, ‘हल्लेखोरांना आमच्या स्वाधीन करा’, अशी मागणी करण्यात आली. परंतु हे सर्व नाटक होते. या नाटकाचा पडदा पहील्यांदा बाजूला केला, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे नेते, खालिदा झिया यांचे पुत्र आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष तारीक रेहमान याने.

रेहमान १७ वर्षे यूकेमध्ये राहतात. त्यांनी तिथे आश्रय घेतलेला आहे. इतक्या प्रदीर्घ काळानंतर आज त्याचे ढाक्यात आगमन झाले. हादी याच्या हत्येमागे निवडणूक पुढे ढकलण्याचे कारस्थान आहे, असा दावा सर्वप्रथम रेहमान याने केला होता. या दाव्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. उघड उघड त्यांनी यूनस यांच्याकडे बोट दाखवले होते. भारत आणि शेख हसीना यांना क्लीनचिट दिली होती. हादीच्या हत्येमागे भारताचा हात नसून यूनस यांचे राजकारण आहे हे उघड केले होते. ते लोकांना सुचवत होते की, निवडणुका पुढे ढकलल्यामुळे बांगलादेशात फक्त एका व्यक्तिचा फायदा होणार होता. ती व्यक्ती म्हणजे मोहमद युनूस. रेहमान यांनी असा दावा करणे इथपर्यंत ठिक होते. परंतु आता हादीचा भाऊ ओमर याने ‘ओस्मानच्या हत्येमागे यूनससरकारमधील एका गटाचा समावेश आहे’, असा उघड आरोप केला आहे. ‘तुम्ही आधी ओस्मान हादीची हत्या केली, आता या घटनेचा फायदा उठवत तुम्ही बांगलादेशात १२ फेब्रुवारी रोजी होणारी निवडणूक टाळण्याचा प्रयत्न करीत आहात’, असा आरोपच ओमर याने केला आहे. रेहमान यांनी तर फक्त बोट दाखवले होते. ओमर याने तर नाव घेतले आहे. सरकारचा हात असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. एवढे बोलून ओमर थांबला नाही. तर, ‘३० दिवसात हल्लेखोरांचा छडा लावा नाही, तर तुमच्यावरही शेख हसीना यांच्यासारखी परिस्थिती ओढावेल’ अशी यूनसयांना धमकी दिली आहे.

आता ओमर हादीच्या वक्तव्यामागचा घटनाक्रम समजून घ्या. हसीना यांच्याविरोधात जे आंदोलन झाले, त्या आंदोलनातील काही विद्यार्थी नेत्यांना यूनसयांनी त्यांच्या सरकारमध्ये सामावून घेतले. या विद्यार्थ्यांनी ‘नॅशनल सिटीझन पार्टी’ची स्थापना केली. ओस्मान हादी या पक्षात गेला नाही. त्याने ‘इन्किलाब मंच’ नावाची वेगळी चूल मांडली आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली. ढाक्यातून तो निवडणूक लढवणार होता. कदाचित जिंकलाही असता. आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असलेले एक सत्ता केंद्र निर्माण होते आहे, हे यूनसयांच्या लक्षात आले होते. ‘नॅशनल सिटीझन पार्टी’च्या नेत्यांनाही हे खटकत होते. हादी हा त्यांच्यासाठी डोके दुखी बनला होता. याच कोंडाळ्याला हादीचा कडेलोट हवा होता. भारताच्या विरोधात वातावरण निर्मितीसाठी त्याचा वापर होऊ शकतो, असा विचार करून हादीचा बळीचा बकरा बनवण्यात आला.

यूनससरकारवर आरोप करताना, ओमरने आणखी एक दावा केला आहे. ‘हे सरकार जनतेचे भले होईल अशी कोणतीही प्रगती करू शकलेले नाही’. ही बाब महत्वाची आहे. यूनस सत्तेवर आल्यानंतर स्वर्ग आणि ७२ हुर नावाचे प्रकरण बांगलादेशात अवतरेल अशी वातवरण निर्मिती करण्यात आली होती. त्यात अर्थात यूनसआघाडीवर होते. प्रयत्यक्षात झाले भलतेच. बांगलादेश कट्टरतावादाकडे झुकला. परकिय शक्तिंच्या हातचे बाहुले बनला. आज चीन, अमेरिका, पाकिस्तान, युरोपिय देशांच्या गुप्तचर यंत्रणांसाठी बांगलादेशची जमीन अत्यंत सुपीक झालेली आहे. प्रत्येक देश इथे आपला अजेंडा चालवण्याचा प्रयत्न करतो आहे. लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात यूनसयांना अपयश आले आहे. ही भावना ओमरने बोलून दाखवली आहे. बांगलादेश अधोगतीच्या दिशेने जातो आहे, ही खदखद लोकांच्या मनात होतीच, ती हादीने बोलून दाखवल्यामुळे यूनसयांची येत्या काळात कबर खोदली जाणार ही बाब निश्चित आहे. जनता विरोधात होती. हादीच्या मृत्यूचे खापर भारतावर फोडून देशात भारतविरोधी आगडोंब निर्माण करायचा जेणे करून आपल्याविरोधात असलेली नाराजी वाहून जाईल असा यूनस यांचा होरा होता. त्यामुळे हादी याच्या अंत्ययात्रेत सामील झालेल्या यूनसयांनी केलेल्या भाषणात भारतविरोधी विखार होता. तुझ्या अत्यंयात्रेत सहभागी झालेले आम्ही सगळे शपथ घेतो की, ‘तु जे जे काही म्हणालायस ते आम्ही प्रत्यक्षात आणू.’ हादी भारताच्या विरोधात बरेच काही म्हणाला होता. त्याला ग्रेटर बांगलादेश बनवायचा होता. त्यासाठी ईशान्य भारत तोडायचा होता. यूनस जेव्हा त्याच्या अंत्ययात्रेत म्हणाले की, ‘तो जे जे म्हणालायत ते प्रत्यक्षात आणू’, याचा अर्थ भारताचा ईशान्य भाग तोडू असाच होता. अर्थात हे एक मोठे नाटक होते. ही बाब आता हादीच्या भावानेच उघड
केलेली आहे.

हे ही वाचा..

थायलंड- कंबोडिया सीमेवर विष्णू मूर्तीची विटंबना; भारताने काय म्हटले?

अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या शिक्षकाची कॅम्पसमध्ये गोळ्या घालून हत्या

रायपूरमध्ये खासदार क्रीडा महोत्सवाचा भव्य समारोप

कर्नाटकमध्ये ट्रकची स्लीपर बसला धडक; आग लागून नऊ प्रवासी दगावले

बांगलादेश हिंदूंसाठी सुरक्षित नव्हता ही बाब स्पष्टच आहे. तो आता यूनसयांच्यासाठीही असुरक्षित बनला आहे. ओमर हादीने जी धमकी दिली आहे, ती यूनस यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. तुमची शेख हसीना करू ही काही सामान्य धमकी नाही. भारताच्या कृपेमुळे हसीना बांगलादेशातून निसटल्या. जर त्या निसटल्या नसत्या तर काय झाले असते हे त्या पळाल्यानंतर त्यांच्या शासकीय निवासात आंदोलनकर्त्यांनी घातलेल्या धुडगूसावरून स्पष्ट झाले. हसीना यांची अंतर्वस्त्र त्यांच्या कपाटातून बाहेर काढून आंदोलन कर्त्यांनी तीही कॅमेराच्या समोर मिरवली.

जनता विरोधात, विद्यार्थी नेते विरोधात, अशा परिस्थितीत ताटा खालचे मांजर बनलेल्या काही विद्यार्थी नेत्यांच्या बळावर यूनससरकार दिवस काढते आहे. त्यांना पाकिस्तान आणि अमेरिकेचा टेकू आहे ही बाब सत्य आहे. परंतु, हसीना यांच्यावर वाईट वेळ आली तेव्हा सख्खा शेजारी असलेला भारत त्यांच्यासाठी धावून आला. चीन, पाकिस्तान, अमेरिका तर कोसो दूर आहेत. जेव्हा यूनसयांचे धिंडवडे निघतील तेव्हा त्यांना कोण वाचवणार?

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version