सोमवारी (२ जून) रात्री उशिरा पाकिस्तानच्या कराची शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘बच्चा जेल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालीर जिल्हा कारागृहातील २१६ कैद्यांनी कारागृहातून पळ काढला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कैद्यांना बॅरेकमधून बाहेर काढत असताना ही घटना घडली. यावेळी काही कैद्यांनी रक्षकांवर हल्ला केला, त्यांची शस्त्रे हिसकावून घेतली आणि तुरुंगाची भिंत तोडून पळून गेले. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. तुरुंग प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, गेल्या ४८ तासांत कराचीमध्ये ९ ते ११ वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
सिंध प्रांताचे पोलिस महानिरीक्षक गुलाम नबी मेमन म्हणाले, या भूकंपाच्या धक्क्यामुळे तुरुंगाची बाह्य भिंत कमकुवत झाली होती. याचा फायदा घेत कैद्यांनी भिंत तोडली आणि पळ काढला. ते पुढे म्हणाले, भूकंपानंतर मोजणीसाठी सुमारे २००० कैद्यांना बाहेर काढण्यात आले. या काळात २१३ कैदी पळून जाण्यात यशस्वी झाले, त्यापैकी ७८ जणांना परत ताब्यात घेण्यात आले आहे, तर १३८ अजूनही फरार आहेत. यावेळी गोळीबारात एका कैद्याचा मृत्यू झाला आणि फ्रंटियर कॉर्प्सचे तीन कर्मचारी आणि तुरुंगातील एक कर्मचारी जखमी झाला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कैदी रस्त्यावर धावताना दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये दोन कैदी असे म्हणत आहेत की ते अनेक वर्षे तुरुंगात होते आणि आता ते मोकळे आहेत. पोलिस, रेंजर्स आणि फ्रंटियर कॉर्प्सने परिसराला घेराव घातला आहे आणि पळून गेलेल्या कैद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम राबवली जात आहे.
हे ही वाचा :
