‘दीपू चंद्रदासविरोधात सहकाऱ्यानेच रचला कट; पोलिसांनीच दिले त्याला जमावाच्या ताब्यात’

तसलीमा नसरिन यांनी केला दावा

‘दीपू चंद्रदासविरोधात सहकाऱ्यानेच रचला कट; पोलिसांनीच दिले त्याला जमावाच्या ताब्यात’

निर्वासित बांगलादेशी लेखिका आणि मानवाधिकार कार्यकर्त्या तसलीमा नसरिन यांनी शनिवारी दावा केला की बांगलादेशमध्ये जमावाकडून ठार मारण्यात आलेल्या हिंदू युवक दीपू चंद्र दास याच्यावर खोटा ईशनिंदेचा आरोप लावण्यात आला होता. हा आरोप मयमनसिंह जिल्ह्यातील एका कारखान्यात काम करणाऱ्या त्याच्या मुस्लिम सहकाऱ्याने केल्याचे त्यांनी सांगितले.

तसलीमा नसरिन यांच्या मते, ही भीषण घटना तेव्हा घडली, जेव्हा दीपू पोलिसांच्या संरक्षणाखाली होता. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दीपूचा एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले, “दीपू चंद्र दास मयमनसिंहच्या भालुका येथील एका कारखान्यात काम करत होता. तो एक गरीब मजूर होता. एका किरकोळ वादानंतर त्याच्या मुस्लिम सहकाऱ्याने त्याला धडा शिकवण्याचे ठरवले. त्यामुळे जमावासमोर त्याने जाहीर केले की, दीपूने पैगंबरांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली आहे. एवढे सांगणेच पुरेसे होते.”

नसरिन यांनी लिहिले की यानंतर संतप्त जमावाने दीपूवर हल्ला करून त्याला अमानुषपणे मारहाण केली. नंतर पोलिसांनी त्याला जमावापासून वाचवून ताब्यात घेतले, म्हणजेच तो पोलिसांच्या संरक्षणात होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, दीपूने पोलिसांना संपूर्ण घटना सांगितली आणि स्पष्टपणे सांगितले की त्याने पैगंबरांबद्दल कोणतीही टिप्पणी केलेली नाही. हे सर्व त्याच्या सहकाऱ्याने रचलेले षड्यंत्र असल्याचेही त्याने सांगितले.

हे ही वाचा:

तोशाखाना प्रकरणात इम्रान खान आणि त्यांची पत्नीला १७ वर्षांची शिक्षा

भारताच्या शेरन्यांनी जिंकले ३ विश्वचषक

सीरियामध्ये ISIS विरुद्ध अमेरिकेचे ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’!

माणिकराव कोकाटेंना १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

तसलीमा नसरिन यांनी आरोप केला की, पोलिसांनी त्या सहकाऱ्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. त्यांनी म्हटले,
“पोलीस दलातील अनेक जण जिहादी विचारसरणीबद्दल सहानुभूती ठेवतात. कट्टर विचारांमुळे पोलिसांनी दीपूला पुन्हा जमावाच्या हवाली केले का, की कट्टरपंथीयांनी त्याला जबरदस्तीने पोलीस ठाण्यातून बाहेर काढले? त्यानंतर दीपूला बेदम मारहाण करण्यात आली, त्याला लटकवण्यात आले आणि जाळण्यात आले.”

त्या पुढे म्हणाल्या की दीपू हा आपल्या कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. त्याच्या उत्पन्नावर त्याचे दिव्यांग वडील, आई, पत्नी आणि मूल अवलंबून होते. आता या कुटुंबाचे काय होणार, हा मोठा प्रश्न आहे. दोषींना शिक्षा कोण देणार आणि कुटुंबाला मदत कोण करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नसरिन यांनी दुःख व्यक्त करत म्हटले की दीपूच्या कुटुंबाकडे इतकेही पैसे नाहीत की ते भारतात पळून जाऊन आपले प्राण वाचवू शकतील. गरीबांना कोणताही आधार नसतो — त्यांच्या जवळ ना देश उरतो, ना सुरक्षा, आणि अखेरीस धर्मही उरत नाही.

Exit mobile version