बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे पुत्र आणि माजी माहिती-तंत्रज्ञान सल्लागार सजीब वाझेद जॉय यांनी बांगलादेशातील सध्याच्या राजकीय आणि सुरक्षा परिस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, “बांगलादेश हळूहळू दुसरा पाकिस्तान बनत आहे आणि ही परिस्थिती भारतासाठीही धोक्याची आहे.” देशात वाढता अतिरेकी प्रभाव, कट्टरतावादी संघटनांचे बळ आणि दहशतवादाशी संबंधित व्यक्तींना मिळणारे स्वातंत्र्य हे संपूर्ण दक्षिण आशियाच्या सुरक्षेसाठी धोक्याचे संकेत असल्याचा दावा त्यांनी केला. शेख हसीना यांनी भारतातून डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतण्याची घोषणा केल्यानंतर जॉय यांची ही प्रतिक्रिया आली.
जॉय यांनी मुलाखतीत सांगितले की, बांगलादेशात कट्टरतावादी शक्तींना प्रोत्साहन मिळत असून त्याचा परिणाम भारतालाही भोगावा लागू शकतो. सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात धर्मनिरपेक्ष मूल्ये आणि लोकशाही संस्था कमकुवत होत असल्याचा आरोप करत भारताने या घडामोडींकडे गांभीर्याने पाहावे, असे त्यांनी म्हटले.
भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानताना जॉय म्हणाले की, शेख हसीना यांना भारताने सुरक्षित आश्रय दिला आहे. मात्र, त्यांच्या मायदेशी परतण्याचा निर्णय हा पूर्णपणे वैयक्तिक आणि राजकीय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दोन वर्षांपूर्वीच्या जनआंदोलनानंतर सत्तेवरून पायउतार झालेल्या शेख हसीना सध्या भारतात वास्तव्यास आहेत. त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असून न्यायाधिकरणाने त्यांना अनुपस्थितीत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. हे सर्व आरोप राजकीय सूडातून लावल्याचा दावा करत हसीना म्हणाल्या, “माझ्या लोकांसाठी मला परत जायचे आहे. अटक झाली किंवा जीव गेला तरी मी मागे हटणार नाही.” त्यांनी अवामी लीगवरील बंदी उठवण्याची, राजकीय कैद्यांची सुटका करण्याची आणि त्यांच्यावरील प्रकरणे मागे घेण्याचीही मागणी केली.
हे ही वाचा:
सुनेत्रा पवार प्रकरणावरून धनंजय मुंडेंना सुनील तटकरेंचा इशारा
अनधिकृत स्पर्धांवर पीसीबीचा चाप
पाकिस्तानसे गिरे, खजूर भारत मे अटके…किंमत ३ कोटी
बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदूच्या घराची टेहळणी
दरम्यान, हसीना यांच्या पत्रकार परिषदेनंतर बांगलादेश सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली. भारताने अशा कार्यक्रमाला परवानगी दिल्याबद्दल ढाकाने आक्षेप नोंदवत यामुळे द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असे म्हटले आहे. तसेच, स्थानिक माध्यमांना हसीना यांची विधाने प्रसारित न करण्याचा इशाराही देण्यात आला.
