लढाऊ विमाने, तोफखाना आणि भूदलातील सैन्य यांच्यात दोन दिवस चाललेल्या प्राणघातक सीमेपलीकडील संघर्षांनंतर कंबोडियाने शुक्रवारी (२५ जुलै) थायलंडसोबत “तात्काळ युद्धबंदी” करण्याचे आवाहन केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बंद दाराआड झालेल्या आपत्कालीन सत्रानंतर बोलताना, कंबोडियाचे राजदूत छिया केओ म्हणाले की त्यांच्या देशाला युद्ध नव्हे तर शांतता आणि मुत्सद्देगिरी हवी आहे.
“कंबोडियाने बिनशर्त तात्काळ युद्धबंदीची मागणी केली आणि आम्ही वादाचे शांततापूर्ण निराकरण करण्याचे आवाहन करतो,” असे राजदूतांनी सभागृहाबाहेर पत्रकारांना सांगितले. “सुरक्षा परिषदेने दोन्ही पक्षांना जास्तीत जास्त संयम दाखवण्याचे आणि राजनैतिक तोडगा काढण्याचे आवाहन केले. आमचीही तीच मागणी आहे,” छिया केओ पुढे म्हणाले.
दरम्यान, थायलंडने युद्धबंदी प्रस्तावावर सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी, त्यांनी कंबोडियन सीमेवरील आठ जिल्ह्यांमध्ये मार्शल लॉ लागू केला होता. गुरुवारी सुरू झालेल्या या संघर्षात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे आणि डझनभर जण जखमी झाले आहेत, असे थायलंडच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर थायलंडच्या सीमावर्ती शहरांमधील १,३८,००० हून अधिक रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
दरम्यान, थायलंड आणि कंबोडिया त्यांच्या ८१७ किमी लांबीच्या सीमेवरील वादग्रस्त भागांवरून अनेक दशकांपासून संघर्ष करत आहेत. या वादाच्या केंद्रस्थानी ‘ता मोआन थोम’ आणि ‘प्रेह विहार’ या प्राचीन हिंदू मंदिरांच्या मालकीचा मुद्दा आहे.
हे ही वाचा :
राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, शाळा बंद, अलर्ट जारी!
आयटी कंपनी इंटेलच्या २५ हजार कर्मचाऱ्यांना कपातीचा धोका
