सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर सेशेल्सला जाणार आहेत. सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात पंतप्रधान मोदी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. या दौऱ्याबाबत सेशेल्समध्ये उत्साहाचे वातावरण असून, भारत- सेशेल्स संबंधांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास तेथील भारताचे उच्चायुक्त रोहित राठीश यांनी व्यक्त केला.
रोहित राठीश म्हणाले की, पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर होत आहे. सेशेल्स आपल्या स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करत असून, या ऐतिहासिक सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान मोदींची उपस्थिती भारत-सेशेल्समधील दृढ आणि विश्वासार्ह संबंधांचे प्रतीक आहे. ते पुढे म्हणाले की, या दौऱ्यामुळे संरक्षण, सुरक्षा, आरोग्य, शिक्षण, क्षमता विकास (Capacity Building), सागरी सहकार्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांतील सहकार्य अधिक मजबूत होईल. भारत आणि सेशेल्स यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नसून ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि लोकांमधील परस्पर संबंधांवर आधारित आहेत. सेशेल्समध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय वंशाचे नागरिक वास्तव्यास असून, पंतप्रधान मोदी त्यांच्या भेटीदरम्यान भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत.
भारत आणि सेशेल्स यांच्यातील राजनैतिक संबंधांना यंदा ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. याबाबत बोलताना रोहित राठीश यांनी सांगितले की, दोन्ही देशांमधील भागीदारी सातत्याने अधिक मजबूत होत आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या शपथविधी सोहळ्यास भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष हर्मिनी यांनीही भारताचा दौरा केला. गेल्या नऊ महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली द्विपक्षीय संबंधांना नवी ऊर्जा आणि गती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
हिंद महासागर क्षेत्रातील सेशेल्सच्या भूमिकेबाबत बोलताना रोहित राठीश म्हणाले की, भारत आणि सेशेल्स हे दोन्ही देश हिंद महासागराशी निगडित असून, दोघांचीही आर्थिक आणि सागरी सुरक्षा मोठ्या प्रमाणावर या समुद्री क्षेत्रावर अवलंबून आहे. शतकानुशतके दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक संबंधही कायम आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘व्हिजन महासागर’ (MAHASAGAR) संकल्पनेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, या उपक्रमामध्ये व्यापार, सागरी सुरक्षा, क्षमता विकास आणि प्रादेशिक सहकार्याला प्राधान्य देण्यात आले आहे. या माध्यमातून हिंद महासागर क्षेत्राचे सामूहिक व्यवस्थापन करण्यावर भर दिला जात आहे.
हे ही वाचा:
व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचे ‘ऑपरेशन अमिस्ताद’
ऑपरेशन सिंदूरमधील सहा हुतात्म्यांची नावे प्रथमच जाहीर
राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरणानंतर चंपत राय यांचा राजीनामा
सिया दोषी असेल तर मृत्युदंडाची शिक्षा द्या!
रोहित राठीश यांनी सांगितले की, भारताचे उद्दिष्ट आपल्या भागीदार देशांची क्षमता अधिक सक्षम करणे आणि गरज भासल्यास ‘फर्स्ट रिस्पॉन्डर’ म्हणून मदत करणे हे आहे. हिंद महासागर क्षेत्रासमोर उभ्या असलेल्या अंमली पदार्थांची तस्करी, मानवी तस्करी आणि बेकायदा मासेमारी यांसारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत आणि सेशेल्स एकत्रितपणे काम करत आहेत. ते म्हणाले की, सेशेल्ससोबत भारताचे संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य आजवरच्या सर्वाधिक मजबूत टप्प्यावर पोहोचले असून, पंतप्रधान मोदींच्या आगामी दौऱ्यामुळे या संबंधांना आणखी बळकटी मिळेल.
