अमेरिकेत कौटुंबिक वादातून भारतीयाने पत्नीसह तिघांना संपवले

प्रसंगावधानामुळे तिन्ही मुलांचे प्राण वाचले

अमेरिकेत कौटुंबिक वादातून भारतीयाने पत्नीसह तिघांना संपवले

अमेरिकेतील अटलांटा शहराजवळील लॉरेन्सव्हिल परिसरात घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटनेने भारतीय समुदायासह संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. कौटुंबिक वादातून भारतीय वंशाच्या एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि तीन नातेवाईकांवर गोळीबार करून चौघांची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री सुमारे अडीचच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, ५१ वर्षीय विजय कुमार याने आपल्या पत्नी मीमू डोगरा (वय ४३) तसेच घरात उपस्थित असलेल्या तीन नातेवाईकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात चौघांचाही जागीच मृत्यू झाला. प्राथमिक तपासात हा प्रकार दीर्घकाळ चाललेल्या कौटुंबिक वादातून घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
भारताचा ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर मजबूत

कमाल आर खानने इमारतीत केला गोळीबार

पाकिस्तानमध्ये लग्नसमारंभात आत्मघाती स्फोट

भारतीय पासपोर्टचे जागतिक स्थान सुधारलं

घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेली तीन लहान मुले मात्र सुदैवाने बचावली. गोळीबार सुरू होताच एका लहान मुलाने प्रसंगावधान राखत इतर दोन भावंडांसह घरातील कपाटात लपून घेतले आणि ९११ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून मदत मागितली. मुलांच्या या धाडसी कृतीमुळे पोलिसांना तात्काळ घटनेची माहिती मिळाली आणि पुढील अनर्थ टळला.

आपत्कालीन कॉल मिळताच ग्विनेट काउंटी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचली. घरात चार मृतदेह आढळून आले, तर आरोपी विजय कुमार घटनास्थळावरून फरार झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी परिसरात व्यापक शोधमोहीम राबवत काही वेळातच विजय कुमारला जवळच्या भागातून ताब्यात घेतले. सध्या त्याच्यावर चार जणांच्या हत्येचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेनंतर अटलांटा येथील भारताचे वाणिज्य दूतालय यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. पीडित कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही दूतावासाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही घटना कौटुंबिक वादाचे भयावह परिणाम अधोरेखित करणारी असून संपूर्ण भारतीय समुदायासाठी ती अत्यंत वेदनादायक ठरली आहे.

Exit mobile version